चित्रपट नसते तर मराठी निबंध | CHITRPAT NASTE TR MARATHI NIBANDH

चित्रपट नसते तर मराठी निबंध | CHITRPAT NASTE TAR MARATHI NIBANDH


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण चित्रपट नसते तर  मराठी निबंध बघणार आहोत. चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक साधन. प्रचार-प्रसाराचे उत्तम साधन. काही कालावधीत बराच काळ दाखवता येणारे साधन. समाजातील सगळ्या समस्या मोठ्या खुबीने लोकांपुढे मांडण्याचे कौशल्य या माध्यमातून साध्य होते. 


समाजात घडणारे बदल, बदलती संस्कृती लोकांसमोर आणण्याचे चित्रपट हे माध्यम आहे. अशा या माध्यमावर बंदी म्हणजे मनोरंजनाला मुकावे लागण्यासारखेच आहे.मनोरंजनातून शिक्षण देणे खूप उपयुक्त असते. अर्धशिक्षित, निरक्षर लोक वाचू शकत नाहीत; त्यामुळे त्यांना जगात घडणाऱ्या घडामोडी समजत नाहीत. 


वर्तमानपत्रातील घटना चित्ररूपाने चित्रपटाच्या माध्यमातून पाहावयास मिळतात. सहज, सोप्या पद्धतीने शिक्षण मिळण्याचा तो एक मार्ग आहे. चित्रपटाच्या माध्यमातून संगीत, नृत्य, अभिनय, कविता, फोटोग्राफी इ. सर्व कलांना प्रोत्साहन मिळते. 


जर चित्रपट बंद झाले, तर इतिहासाच्या घटना आपण सजीव रूपात बघूशकणार नाही. शिवाय, सर्व कला एकत्रितपणे कशा पाहू शकणार ? जगभरातील विविध स्थळे कशी पाहणार?चित्रपटाच्या माध्यमातून गावाची स्वच्छता, शेती, नवीन शोध, सामाजिक प्रथा, पद्धती, यांबाबत माहिती मिळते. 


सरकारी कामकाज, सरकारी योजना यांची-देखील ओळख होते. जर चित्रपटच नसते, तर समाजातील सगळ्या थरांतील लोकांचे मनोरंजनातून प्रबोधन कसे होणार? राष्ट्रभाषेच्या प्रचारासाठीदेखील चित्रपट हे माध्यम उपयुक्त आहे. 


चित्रपटांवर लावलेले कर म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचे साधन. आज तर या चित्रपटव्यवसायातून लेखक, तंत्रज्ञ, कलाकार, गायक, प्रचारक या सगळ्यांचा उदरनिर्वाह चालतो. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून अनेकांना रोजगार मिळण्याचे साधन आहे.


चित्रपटांमुळे जसे फायदे होतात, तसे तोटेदेखील संभवतात. काहींच्या मते चित्रपटांमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे आणि त्यांचे नैतिक अध:पतन होत आहे.चित्रपटांमध्ये कधी-कधी भडक, हिंसक व अश्लील दृश्ये दाखविली जातात. 


अंगविक्षेप करून कमी व तंग कपड्यांतील नृत्ये तरुणांच्या मनावर वाईट संस्कार करतात. कधीकधी विद्यार्थी शाळा बुडवून चित्रपटांना जातात. चित्रपट पाहण्यासाठी चोरीदेखील करतात. खोटे बोलतात. वाईट गोष्टींच्या युक्त्या त्यांना समजतात. 


त्यातून वाममार्गाला जाण्याच्या मुलांची काही उदाहरणे आहेत. चित्रपट नसते, तर या वाईट गोष्टी घडल्या नसत्या.हे तोटे असले, तरी शेवटी आपल्याला मान्य करावेच लागेल की, चित्रपट नसते तर.... लोकप्रबोधनही झाले नसते.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद