एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध | EKA PUTLYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI.

 एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध | EKA PUTLYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. नीट आठवत नाही, शंभर वर्षं झाली असतील, नाहीतर व्हायची असतील. काही लोकांनी मला इथे उभं करून ठेवलंय. मी उभा आहे; पण मला उभा करून ठेवणारी ती मंडळी गेली कुठे ? पहिली ८/१० वर्ष ती मंडळी नित्यनेमाने यायची. 


माझं कौतुक करायची. या शहरातल्या प्रत्येक गोष्टीवर म्हणे माझी सही आहे. आगगाडी आणण्यात मी पुढाकार घेतला, वीज माझ्याच प्रेरणेने या शहरात आली, जगाला वस्त्र पुरविणाऱ्या गिरण्या मीच चालू केल्या आणि हे सारं करण्यासाठी या शहराचा विस्तार, शहरवासियांचा विकास, लोकांची समृध्दी अशी ध्येयं होती. 


आता फारसं कोणी येत नाही. कशाला आणली वीज ? त्या विजेच्या लख्ख प्रकाशात काय पहायचं ? गलिच्छ, बकाल आणि ओंगळ शहर ? माझा वाडा होता. आता त्या वाड्याच्या ठिकाणी एक २०/२५ मजल्याची इमारत उभी आहे. 


बरं झालं, त्या उंच इमारतीमुळे दुसऱ्या बाजूला झोपडीत किड्या-मुंग्यासारखी रहाणारी माणसं मला दिसत नाहीत. हल्ली फारसं कोणी इकडे फिरकत नाही. पक्षी निर्भयपणे माझ्या अंगाखांद्यावर बसून घाण करीत असतात. केव्हातरी येतो एखादा दारुड्या, बसतो मला खेटून कुणाला तरी शिव्या देत. 


हो, आणि केव्हातरी एखादा भिकारी येतो, दोन - चार उकिरड्यावरचं अन्न गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारीत बसतो. एकदा तर मी चक्रावून गेलो. माझ्या समोर प्रचंड गर्दी जमली होती. मला कळेना का जमलेत हे लोक ? मग कळलं, कुठलीशी निवडणूक आली होती आणि कुठल्यातरी पक्षाला माझी आठवण झाली होती. 


घसा फुटेपर्यंत भाषण देत होते. मधून  मधून माझे नाव घेत होते. प्रमुख पाहुण्याने तर कमाल केली. मला उद्देशून तो बोलत होता. आपल्या देशासाठी हा माणूस चंदनासारखा झिजला. भारतमातेचा हा 'थोर सुपुत्र....' मधेच थांबला आणि अध्यक्षांच्या कानात त्याने विचारले, 


'काय हो, काय या माणसाचं नाव ?' मग माझ्या नावाचा चुकीचा उच्चार करून भडाभडा बोलत होता, 'याचं महान कार्य तुम्हाला माहिती आहेच. तेव्हा मी ते सांगण्याची गरज नाही. काय सांगणार ? माझं कार्य त्यालाच ठाऊक नव्हतं.


त्यांची भाषणं ऐकून मला माझे सहकारी आठवले. काय माणसं होती हो ती. पोलादी हृदयाची, पर्वताच्या कड्यासारखी उत्तुंग, गंगामाईच्या जलासारखी पवित्र, प्रामाणिक, पारदर्शी, कुठे गेली ती ? कुठे आहेत त्यांचे भाग्यवान वंशज ? 


आज गोरा गेलाय  केव्हा ना केव्हा तरी त्याला जावंच लागेल, हे आम्हाला ठाऊक होतं. पण त्याच्या जागी आलेली काळी माणसं - ? ती माणसं कशी कळवळून बोलायची, तळमळून काम करायची ! मला फुटणारा पाझर तुम्हाला दिसणार नाही. कारण मी पाषाणहृदयी आहे ना ? 


माझ्या बालमित्रांनो, एक सांगतो. ऐकाल ? तुम्ही मोठे झाल्यावर कुणाचाही, कुठेही, कधीही पुतळा उभा करू नका. कारण त्याला 'त्याचि डोळा' पदोपदी, त्याचं मरण पहावं लागतं. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद