एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Bharat Marathi Nibandh

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Bharat Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण एकविसाव्या शतकातील भारत  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  कालचक्र हे अविरत फिरते. सारखा काळ चालला पुढे. काळ जसजसा पुढे सरकतो. तसतसा मानवी प्रगतीचा आलेख उंचावतो. 


देशाने केलेल्या प्रगतीवरून, त्या देशातील उंचावलेले राहणीमान, देशातील संपत्ती यावरून देश प्रगत आहे की अप्रगत आहे, हे समजते. जागतिक बाजारपेठेत भारताची पत काय आहे, जगात भारताला किती प्रतिष्ठा आहे, ह्यावरून आजची भारताची प्रगती अजमावता येईल. 


प्रगतीच्या निकषांचा विचार करायचा झाला, तर पर्यावरण-रक्षण, रोगप्रतिबंधक उपाय, आरोग्य-संवर्धनाचे कार्यक्रम, अंमली पदार्थांना आळा, अण्वस्त्रांना आवर, दहशतवादाशी मुकाबला, गरिबी, मागासलेपणाविरुद्ध लढा, याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्य व सामंजस्य-वाढ, संहारक शस्त्रास्त्रे कमी करण्याचे नवे प्रयत्न, या सर्व बाबतींत भारताने प्रगती करून त्यावर विजय मिळविला आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. 


उत्तर होकारात्मक असेल, तरच आपण २१ व्या शतकातील आव्हाने समर्थपणे पेलली आहेत, असे म्हणता येईल.भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीविषयक परिस्थिती आज समाधानकारक आहे का, ह्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. 


हरितक्रांती होऊन आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलो आहेत; पण ते निर्यात करून परकीय चलन मिळविण्याच्या बाबतीत मात्र अजून मागे आहोत. आज परंपरागत शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती होणे गरजेचे आहे. 


धान्याचा कस वाढला पाहिजे. केवळ रासायनिक खतांमुळे धान्य अधिक येणे, ही बाब प्रगतीची मानता येणार नाही.एकविसाव्या शतकात पदार्पण करूनही देशातील आर्थिक विषमताही चिंतेची बाब आहे. गरीब अधिक गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होऊन ही विषमतेची दरी अधिकच रुंदावत आहे. 


अजूनही १००% साक्षरता नाही. जगाने एवढी प्रगती केलेली आहे; पण भारत मात्र साक्षरतेच्या बाबत उदासीन आहे. साक्षरतेचा प्रसार झाल्याशिवाय राजकीय लोकशाही बलाढ्य होऊ शकत नाही. संपूर्णपणे रोगांचे उच्चाटन झालेले नाही. 


चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू यांसारखे नवीन रोग उद्भवत आहेत. एड्स्वरही नियंत्रण झालेले नाही. आरोग्य-संवर्धनाचे कार्यक्रम व्यवस्थित राबवले गेले पाहिजेत. ते केवळ कागदोपत्री असून काय उपयोग? दहशतवादी हल्ले रोखण्यात आपण अपयशी ठरलेले आहोत. 


जर्मन बेकरी, मुंबई, दिल्ली या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले, यावरून आपण याही बाबतीत अपयशीच ठरलेले आहोत. अंमली पदार्थांची चोरटी विक्री थांबली नाही, तर तरुण पिढी व्यसनाधीन बनून देश खिळखिळा बनेल, याची राज्यकर्त्यांनी दखल घेतली पाहिजे. 


भ्रष्टाचारामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते, हे सर्वानीच लक्षात घेतले, तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल. एक प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्र होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.प्रगत तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या प्रगतीचे द्योतक आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची आशा आहे. परंतु त्यासाठी भारताची अर्थव्यवस्था भक्कम होणे आवश्यक आहे.


पंचवार्षिक योजना व प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय सहकार्य व सामंजस्य वाढल्यास व्यापार, तंत्रज्ञान यांबाबत प्रगतीचे पाऊल पुढे पडेल.जगात महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संहारक शस्त्रे, अणुबॉम्ब बनविणे घातक ठरेल. 


संहारक शस्त्रांमुळे जगातील दबदबा वाढत असला, तरी त्यावरील खर्च व वाढ घातकही ठरू शकते. लष्कर व संरक्षण या क्षेत्रांत प्रगत व स्वावलंबी होणे आवश्यकआहे.असा आहे आपला एकविसाव्या शतकातील भारत !मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Bharat Marathi Nibandh 




२१ वे शतक?' खरं तर एवढ्यातच हा निबंध पूर्ण होतो. ह्या प्रश्नचिन्हातच ह्या निबंधाची सुरुवात व शेवट दडलेला आहे. नुकतेच २१ वे शतक सुरू झाले, नाही का? जसं दर वाढदिवसाच्या दिवशी, आपण एक वर्षाने मोठे होतो तसं एकदम शंभर वर्षांनी मोठं झाल्यासारखं वाटू लागलंय.


खरंच, जग विविध जागतिक घटनांनी खच्चून भरलंय. २० वं शतक, विज्ञान, तंत्रज्ञान या माध्यमांतून मानवाची भौतिक प्रगती साधणारं होतं, इराणइराकच्या युद्धाचं होतं, दुसऱ्या महायुद्धातील आण्विक संहाराचं होतं. भारताच्या स्वातंत्र्याचं होतं. एकीकडे वैज्ञानिक संस्कृतीच्या रोपणाचं तर दुसरीकडे माणुसकीच्या हासाचं होतं.


आता २१ वं शतक आपल्याला कोठे नेईल? या शतकाला सामोरे जाताना अनेक भीषण प्रश्न 'आ' वासून उभे आहेत. प्रत्येक सामान्य माणसाकडे कालनिर्णयासारखे संगणक असतील मग प्रश्नच राहणार नाहीत का?
 छे! ह्या गोड गैरसमजात राहण्याचे हे दिवसच नाहीत. 


सर्वात भीषण समस्या आहे ती लोकसंख्या विस्फोटाची' आज पृथ्वीची लोकसंख्या पाच अब्ज आहे. ती होण्यास तिला पाच अब्ज वर्षे लागली, त्यातली एक अब्ज एकट्या भारताची! पुढील दहा वर्षांत...हीच दहा अब्जांवर जाईल. वृक्षतोड, कमी पर्जन्य, निकस जमीन, पशुहत्या ह्याने आधीच बेजार, निरुत्तर झालेल्या मानवाची कल्पनाच करवत नाही. माणसाला पुरेसे अन्नधान्य ही धरित्री देऊ शकेल?


दुसरा प्रश्न आहे वैज्ञानिक
प्रगतीचा! विज्ञानाने मानवाला वरदान दिलंय की शाप? अणुबाँबचा शोध लावून सर्व जगाच्या डोक्यावर एक टांगती तलवारच लटकतेय... क्षेपणास्त्रांच्या बळावर काही राष्ट्रे पुन्हा साम्राज्यवादाकडे झुकू लागली आहेत, त्यामुळे राजकीय नकाशातही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. 


समाज विघटनाची प्रक्रिया जोरात सुरू होईल. दुर्दैवाने अराजकी हुकुमशाहीचा राजकीय क्षितीजावर उदय होईल. २१ वे शतक घाईचे युग असेल, क्षणाक्षणाला महत्त्व असेल. आजच आपण बघतो शहरातून ठिकठिकाणी ‘फास्ट फूड' चे स्टॉल्स दिसतात. पुढे तर न्युट्रिशन पावडर, टॅबलेटसही मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या असतील आणि पंगत' हा विषय तर कालबाह्य झाला असेल.



साक्षरतेचे महत्त्व जाणून शासन
त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे २१ व्या शतकात  अशिक्षित माणूस दाखवा, एक कोटी रुपये मिळवा! अशा घोषणाही शासन देऊ लागेल. या शतकात सारी भौतिक सुखे मानवापुढे हात जोडून उभी असणार आहेत. 


संगणक साथीला आहेच पण यंत्रमानवही अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे 'काय हुकूम आहे मालक?' म्हणत चुटकीसरशी काम करणार आहे. हवा, जल, भूमी, ध्वनी प्रदूषणाबरोबरच मानसिक व सामाजिक प्रदूषणही फोफावत असेल. 


त्यासाठी ताजमहाल, कुतुबमिनार, कोणार्क सुवर्णमंदिर यांपासून १,००० कि.मी. अंतरापर्यंत कारखान्यांच्या स्थापनेस बंदी असेल. ठिकठिकाणी दिसणाऱ्या एस.टी.डी. बूथची जागा ‘ऑक्सिजन बूथ ने घेतली असेल. आत्ताच मुंबईत असा एक ‘ऑक्सिजन बूथ' सुरू झाला असून तेथे वीस मिनिटे श्वासोच्छ्वासासाठी दोनशे रुपये द्यावे लागतात.


लहान मुलांना ये रे ये रे पावसा म्हणावं लागणारच नाही, कारण कृत्रिम पाऊसच त्यांना माहिती असणार. गडद निळे, गडद निळे जलद भरून आले ह्याचा अर्थच त्यांना कळणार नाही. वैद्यकीय क्षेत्रातही प्रगती झाली असेल. 'एडस्'चा विषाणू, देवी, पोलिओ यांच्या सूक्ष्मजीवासारखा प्रयोगशाळेत जतन करून ठेवला असेल व एड्सवरील उपचार शोधला गेला असेल. 


त्याचबरोबर इतरही नवीन रोगांनी डोकी वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवाश्म इंधनाचा साठा संपुष्टात आल्याने सौरऊर्जा, पवनऊर्जा, भरतीऊर्जा अशा अपारंपारिक ऊर्जासाधनांना महत्त्व प्राप्त झाले असेल.
 अवकाशातील चंद्र, इतर ग्रह, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, अवकाशस्थानके माणसांनी फुलून जातील व त्यांच्यावरील हक्कांसाठी' युद्धेही उद्भवतील. 


मंगळ, बुधावरच्या रॉयल्टीसाठी रस्सीखेच सुरू होईल. दिवाळीच्या सुट्टीत मुले चंद्रावर जाण्याचाही बेत आखतील. भारताचे पंतप्रधान कोजागिरी चंद्रावर साजरी करतील व त्याचे थेट प्रक्षेपण इंटरनेटवर उपलब्ध होईल.
 तसेच रेडिओ तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असेल की, पंधरा ते वीस प्रकाशवर्ष अंतरापर्यंतच्या ताऱ्यांचा वेध घेता येऊ शकेल व विश्वाचा शोध घेण्याच्या मोहिमेत भारत आघाडीवर राहील.


२१ व्या शतकातील 'हॅलो', 'हाय', 'बाय',
अशा पाश्चात्य संस्कृतीत भारत आपला सांस्कृतिक ठसा टिकवू शकेल काय? हाही एक प्रश्नच आहे. पण एवढं नक्की की, जग जवळ येऊनही माणूस एकाकी होईल. कुटुंबवत्सलता, भावनिक नातेसंबंध, सहृदयता हे शब्द 'लॉक' केले जातील. 



आत्मकेंद्री माणसाकडे व्यवहारिकता व तांत्रिकता शिल्लक राहतील... भावना नव्हेत! म्हणूनच वाटते हे शतक संगणकाचेही नाही, जैवतंत्रज्ञानाचेही नाही तर पर्यावरण संवर्धन व रक्षणाचे असावे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक न्याय व राष्ट्रीय सुरक्षितता ह्यांचे असावे. 


गेल्या शतकात विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने वसुंधरेचा चेहरामोहराच झपाट्याने विकृत केलाय. तो तिला परत द्यायचाय ह्या शतकात. तम साराया दूर आजचा सूर्य उद्याचा उजळू आभाळाच्या इंद्रधनुशी खुशाल फुगडी खेळू माणुसकीचे बीज तरीही अखंड पेरत जाऊ संगणकाच्या नव पर्वाचे गाणे नवीन गाऊ।। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद