ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

 ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध बघणार आहोत.

"ग्रंथ माझा कल्पतरू 

ज्ञानाचा महामेरू तरूनि नेई

भवसागरू सकल जीवनाचा आधारू

असा ग्रंथ माझा गुरू" 

'ग्रंथ' हा शब्द उच्चारताच नकळत माझ्या शब्दांची अशी गुंफण होते.आपल्या वाईट परिस्थितीत आपली सोबत न सोडणारा, आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखविणारा ग्रंथ हा एकमेव सोबती आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा, भगवद्गीता हे ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनाचे दीपस्तंभ आहेत. 


ग्रंथ आपल्याशी हितगुज करतात.ग्रंथ भेदभाव करत नाहीत.ग्रंथाना काळाची बंधने नाहीत. ग्रंथवाचनाने माणूस बहुश्रुत होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व समृध्द होते.अडचणीवर मात करण्याची कला ग्रंथातून शिकायला मिळते. माणूस चिंतनशील बनतो. 


ठराविक चाकोरीबाहेरचे जग, वेगवेगळे अनुभव यांची जाणीव ग्रंथ करून देतात.मनोरंजनाबरोबर ज्ञान प्रदान करतात.टॉलस्टॉयच्या नाना प्रयोगांची ओळख बापूंनां ग्रंथातून झाली. मॅझिनीच्या चरित्रातून सावरकरांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले.


“पुस्तकं नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं'' अस प्रसिद्ध विचारवंत जॉन रस्किन यांनी म्हटले आहेच.डॉ.आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात होते. 'समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथांनीच जवळ केले. 


मला जगात त्यांच्याइतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही' या त्यांच्या शब्दातून त्यांचे ग्रंथप्रेम व्यक्त होते. त्यांच्या 'राजगृह' या ग्रंथालयात बावीस हजार ग्रंथ होते."जीवनाच्या अभ्यासातूनच ग्रंथ निर्माण होतात" असे साने गुरूजी म्हणत 'शारदा', 'इंदू काळे', 'सरला भोळे', तसेच 'एकच प्याला' यासारख्या समस्याप्रधान ग्रंथांनी सामाजिक समस्या मांडल्या त्यांची उकल करण्याची दृष्टी आपल्याला दिली. 


'अपूर्वाई', 'पूर्वरंग' हे पु.ल.देशपांडे यांचे ग्रंथ तसेच काकासाहेब कालेकर व गंगाधर ग्रंथाविषयी लिहितांना हैद्राबादच्या उदार ग्रंथदात्याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्यांचं नाव 'शामराज बहादुर' त्यांचे ग्रंथप्रेम जगावेगळे होतं. अगदी पदरमोड करून अनेक ग्रंथाचा संग्रह त्यांनी केला होता. 


किती ग्रंथ विकत घ्यायचे, याला बंधन नव्हतं तसंच कोणत्या विषयांचे ग्रंथ घ्यायचे यालाही बंधन नव्हंत.शिसवी आलमाऱ्यासंह हा प्रंचड ग्रंथसंग्रह त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला दिला.आपल्या व्यक्तिगत संग्रहापेक्षा विद्यापीठासारख्या ज्ञानतीर्थात याचा अधिक उपयोग होईल हे जाणून 'असं ही एक दातृत्व त्यांनी समाजापुढे ठेवले.


ग्रंथ जीवन घडवितात, फुलवितात, सुगंधित करतात. हा कस्तुरी सुगंधाचा मधुघट जीवनात ज्ञान, संस्कार , खरी समृद्धी यांची गोडी निर्माण करतो हेच खरे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद