हरवलेले बालपण मराठी निबंध | Haravlele Balpan Essay In Marathi

हरवलेले बालपण मराठी निबंध | Haravlele Balpan Essay In Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हरवलेले बालपण मराठी निबंध बघणार आहोत.

 “लहानपण देगा देवा, 

मुंगीसाखरेचा रवा.” 

संतांना लहानपण म्हणजे निरागसपणा हवा असतो. निरागसपणामुळेच सर्व म्हणत असतील - रम्य ते बालपण'. मला तर ही गोष्ट पटतच नाही. आजकाल बालपणाला कोण म्हणेल रम्य? जन्माला आल्या-आल्याच आपण मोठे होतो.आईचे बोट धरून चालणारे मूल आईचे बोट सोडते, केवळ दोन वर्षांचे वय होत नाही, तोच. कारण, 


आजकाल दोन वर्षांचे मूल झाले, की ते लगेच शाळेची पायरी चढते. अहो, मीदेखील दोन वर्षांचा असल्यापासून शाळेत जातोय. काय तर म्हणे, त्याला घरात खेळायला कोणी नाही. तिथे मुलांच्यात खेळेल. खरे कारण असते, आईची तेवढीच दोन तास सुटका ! शाळेतील बाई आणि त्या मावशी आम्हा मुलांना सांभाळतात ना !


चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून काय तो आटापिटा ! मुलांना येता-जाता प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडतात. मला आठवतोय तो दिवस. माझी मुलाखत होती. आई मला घेऊन गेली. मला खूप झोप येत होती. मग मी जेव्हा बाईंच्या समोर गेलो, तेव्हा काहीच उत्तर न देता बाहेर पळून आलो. मग काय, आईने एवढा त्रागा केला, की बस! काय हो कळत होते तेव्हा? तशीच स्थिती सगळ्याच मुलांची.


मला तर खरेच नाही वाटत, की आपण लहानपणातील रम्यपणा अनुभवलाय. माझ्या तर मते आजकाल मुलांचे बालपण हरवतच चाललेय. खेळायचे असते, मनसोक्त हुंदडायचे असते; पण तो गृहपाठ आमचा हा आनंद हिरावून घेतो. एवढ्याशा वयात केवढा तो अभ्यास? केवढे मोठे ते दप्तराचे ओझे? स्पर्धा तर जन्मापासूनच सुरू. 


आईबाबांना वाटते, माझ्या सोन्याने उत्तम अभिनेता व्हावे, उत्तम चित्रकार व्हावे, उत्तम वादक व्हावे, उत्तम गायक व्हावे, शिवाय अभ्यासातही एवढे हुशार व्हावे की, मीच पहिला आलो पाहिजे. आम्ही मुले म्हणजे काय यंत्र आहोत का? जे टाकाल, ते ते बाहेर यावे. यंत्राला भावना नसतात; पण आम्हाला असतात ना!


आता बघा, सुटीतं तरी आनंद उपभोगता येतो का? सुटीत आमची रवानगी कोणत्या ना कोणत्या शिबिरात. निवासी शिबिर तर फारच उत्तम. पाठांतर स्पर्धेच्या निमित्ताने अर्थहीन पाठांतर करावेच लागते. म्हणे काय, तर जिभेला वळण लागते. कसले वळण घेऊन बसलात? 


वळणावळणावर आमची पिळवणूक. खेळायला जागा नाही, रोज संध्याकाळी जा मैदानावर. मैदानावर जातोयस ना, मग सचिन तेंडुलकर बनूनच बाहेर ये. त्या छंदवर्गांचा तर मी धसकाच घेतलाय. आवड-निवड काही असते की नाही?


जरा इयत्ता वाढली, की बाहेरची शिकवणी. शाळा संपली, की शिकवणी, शाळेआधी शिकवणी.सारा दिवस नुसती फरपटच. कधी कधी टीव्ही पहावासा वाटला, की 'अभ्यास कर' म्हणून हुकूम.आता तुम्हीच सांगा, ह्या बालपणाला रम्य म्हणाल की हरवलेपण? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद