जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध | Jahirati Che Samarthya Essay In Marathi

 जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध | Jahirati Che Samarthya Essay In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध बघणार आहोत. असं म्हणतात की परमेश्वर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असतो. हे वर्णन अगदी तंतोतंत कोणाला लागू पडत असेल, तर जाहिरातींना. जलात पोहोणारी बाई हात वर करून सांगत असते, सिर्फ तीनसौ रुपया मे वॉटरप्रूफ घडी. 


कोणत्याही स्थळी जा, तुमचं स्वागत करायला जाहिरात हजर. खांब्यावर जाहिरात, फाटकावर जाहिरात, जाहिरातीवर जाहिरात. घाटातून जाताना एखादा मोठा पाषाण दिसतो. त्या पाषाणावर लिहिलेलं असतं; 'सातारी जर्दा खा ! असा दम दिलेला असतो. 


पृथ्वीवर तीन चतुर्थांश पाणी आहे आणि एक चतुर्थांश जमीन आहे. मला वाटतं जाहिरातीचे प्रमाणही तेच असावं. टीव्हीचं उदाहरण घ्या ना. टीव्ही जाहिरातीसाठीच असतो. सगळ्या जाहिराती; मधून-मधून वेळ मिळालाच तर एखादा आचरट नाहीतर रटाळ कार्यक्रम दाखवतात.


मानवी जीवनात, टी.व्हीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. टी.व्ही विना जीवन म्हणजे आत्म्याविना कुडी. जाहिराती आपल्याला ज्ञानसंपन्न आणि अनुभवसमृध्द करतात. हेच पहा ना, कोणती नटी, कोणता साबण वापरून फेअर अँड लव्हली बनते, 


हे जाहिराती नसत्या तर आपल्याला कळलं असतं का? आपण अज्ञानीच राहिलो असतो ना ? हे जाहिरातींच ‘सुरक्षा चक्र' आपल्याभोवती नसतं, तर जीवनातली सारी मौजच नाहीशी झाली असती. बिचाऱ्या गरीब लोकांना अंडी खायला मिळत नाहीत, त्यांना माहीत नाही की अंडी शांपूत असतात. 


त्यांनी शांपू वापरला, तर अंडी त्यांच्या पोटात नाही, पण निदान डोक्यात तरी गेली असती.दुसऱ्याला मामा कसे बनवावे, हे आपल्याला जाहिराती शिकवतात. 'रोज एक रुपया भरा आणि महिना अखेर पाचशे एक घ्या.' मी एकदा भरला हो रोज एक रुपया. 


महिना अखेर पाचशे रुपये मागायला गेलो तर त्याने चक्क माझ्या हातावर पाचशे एक' साबणाची वडी ठेवली हो.काही जाहिराती भंपक असतात. काही जाहिराती तद्दन खोट्या असतात. काही जाहिराती राजकीय असतात. आमचाच पक्ष कसा तारणहार आहे, हे त्या कोकलून सांगत असतात. 


एका साखर कारखान्याने, एकदा अशी जाहिरात दिली की आमची साखर खाल्ली असता, मधुमेह होत नाही. काही जाहिराती मोहात पाडणाऱ्या असतात. चित्रपटात मुळीच नसलेली, उघड्या - नागड्या बायांची मादक चित्रं छापून तुम्हाला तो भिकार चित्रपट पहायला लावतात.


पण काही काही जाहिराती मात्र संतापजनक असतात. काही काही जाहिरातींमध्ये सौंदर्य असतं, सामर्थ्य असतं. पण केव्हा केव्हा त्यांच्या सौंदर्याची घृणा येते, किळस येते. काही जाहिराती उत्तान स्त्रीसारख्या वाटतात. केवळ जाहिरातीसाठी, परमेश्वराने दिलेल्या सौंदर्याचं आणि लावण्याचं, ओंगळ, बीभत्स प्रदर्शन करणाऱ्या बाया पाहिल्या की तळपायाची आग मस्तकाला जाते. 


जी सिगारेट कॅन्सरला आमंत्रण करते, त्या सिगारेटची जाहिरात करता ? जी दारू माणसाला पशू बनवते, त्या दारूची जाहिरात करता ? स्त्रियांच्या बाबतीत जे अनिवार्य म्हणून पुटपुटायचं (व्हिस्पर) त्याचा निर्लज्ज आणि गलिच्छ आरडा-ओरडा करता ? 


काय म्हणाव माणसाच्या जीवनात शेण कालवणाऱ्या या जाहिरातींना ? जाळून टाकलं पाहिजे हे जाहिरात - विश्व. असल्या जाहिरातीविरुद्ध मी एक खंबीर संघटना उभी करणार आहे. पण त्या संघटनेची मी पण एक जाहिरात देणार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद