जीवनातील विनोदाचे स्थान निबंध मराठी | Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh

 जीवनातील विनोदाचे स्थान निबंध मराठी | Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh | 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जीवनातील विनोदाचे स्थान मराठी निबंध बघणार आहोत. माणसाच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यातली मला एक मार्मिक वाटते. 'हसणारा प्राणी तो माणूस. कधी कुणी कुत्र्याला हसताना पाहिलं आहे का ? कुणी अशी तक्रार ऐकली आहे का की 'हा गाढव मला हसतो.'


विनोदाचे मुख्य प्रकार दोन. एक आचारावर आधारलेला, दुसरा विचारावर आधारलेला. आचारनिष्ठ आणि विचारनिष्ठ. विदूषक, नकलाकार यांचा विनोद विचित्र हाव - भाव, हास्योत्पादक अंगविक्षेप यांचा आधार घेऊन साधलेला असतो. हा प्रकार काही कमी मोलाचा नाही.


विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे. जिथे - जिथे आपल्याला विसंगती दिसते, तिथे - तिथे आपल्याला हसू येतं. नवरा बायकोत, अंगकाठी, उंची - जाडी, वर्ण यात अनुरूपता पाहिजे. पण जेव्हा आपण एखादं असं जोडपं पहातो की, त्यातली बायको भोपळ्यासारखी गरगरीत आहे. आणि तिच्या शेजारून चालणारा तिचा नवरा पडवळासारखा उंच आणि किडकिडीत आहे, 


तेव्हा आपल्याला हसू येते कारण त्याच्यात संगती नाही. ते जोडपं विसगंत आहे.उपप्रकार खूप आहेत. प्रसंगनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, शब्दनिष्ठ.एखाद्या प्रसंगावर विनोद आधारलेला असेल, तर प्रसंगनिष्ठ. एका माणसाचं पोट इतकं मोठं आणि फुगलेलं होतं, की त्याला पोट खाजवायची वेळ आली तर हात लांब करून पोट खाजवावं लागे. 


हा व्यक्तीवर आधारलेला तेव्हा तो व्यक्तिनिष्ठ. काही शब्दनिष्ठ म्हणजे शब्दामुळे झालेला विनोद. कै. रा. ग. गडकरी आपल्या ठकी या मानसकन्येबद्दल सांगतात  'आमची ठकी अगदी लतेसारखी नाजूक आहे आणि लतेवर जसं फूल असतं, तसं आमच्या ठकीच्या डोळ्यात एक फूल आहे.' 


शब्दनिष्ठ विनोदात एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ज्या शब्दावर विनोद साधलेला असतो, तो शब्द बदलला तर विनोद विनोद रहात नाही. या विनोदात 'फुल' ह्या शब्दा ऐवजी सुमन असा शब्द वापरला, तर विनोद संपला.


विनोदात अतिशयोक्ती, अपेक्षाभंग, श्लेष, कोटी असे नानाप्रकार आहेत. एक इंग्लिश माणूस अमेरिकन माणसाला म्हणाला, 'आमच्याकडे अशी यंत्रे आहेत की त्यांत, एखादा बोकड घातला की त्याचं मांस, कातडी, हाडे आपोआप विभक्त होतात.' आणि बोकडाचं मांस डब्यात भरून डबे बाहेर पडतात. 


अमेरिकन माणूस म्हणाला, 'हे तर काहीच नाही. आमच्याकडे अशी यंत्रे आहेत, की बोकडाच्या मांसाने भरलेला तुमचा डबा आम्ही यंत्रात घातला, की दुसऱ्या बाजूने बोकड बाहेर पडतो.' (अतिशयोक्ती). एकदा आयार्च अत्रे भाषण देत होते. 


ते म्हणाले, 'मित्रहो, मामा वरेरकरांसारखा उत्तम लेखक अख्ख्या जगात नाही.' लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांचा आवाज शमल्यावर अत्रे मिस्कीलपणे पुढे म्हणाले, "असं त्यांचं; स्वतःचं मत आहे.' (अपेक्षाभंग) कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा एक मुसलमान नोकर होता. 


तो 'आज काय चलता वारला', 'आज काय मावशी वारली', 'आज काय आजी वारली', अशी कारणं सांगायचा; आणि त्यांच्या दफनक्रियेसाठी पैसे मागायचा. तो मागायचा तेव्हा - तेव्हा कोल्हटकर पैसे द्यायचे. पण त्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत असं आढळल्यावर एकवेळ कोल्हटकर त्याला म्हणाले, 


'हे बघ, मी तुझ्या नातेवाईकांना पुरून उरणार नाही.' इथे 'पुरून उरणे' या वाक्प्रचारावर कोटी आहे. श्लेष आहे. विनोदाला मारक गोष्टी चिकार असतात. काही - काही विनोद पटकन शिळे होतात. एका वेळी एखाद्या प्रसंगावर आधारलेला विनोद तो प्रसंग विस्मृतीत गेला की त्यातला विनोद संपतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे भाषणं देताना. अनेक कोट्या करीत, चुटके सांगत, आता ती चळवळ, तो काळ निघून गेला. 


तेव्हा अत्र्यांच्या त्या कोट्या ते चुटके लोकांना कळत नाहीसे झालेत. काही विनोद ठराविक काळापुरते असतात. ते लोकांच्या अभिरूचीवर अवलंबून असतात. एक वेळ कोल्हटकरांची नाटके अत्यंत विनोदी म्हणून गाजली. आज ती नाटकं वाचायला लागलं, की प्रेक्षक कुठे हसत असत, हेच कळत नाही. 


त्यांनीच लिहिलेल्या 'सुदाम्याचे पोहे' या बाबत मात्र अशी परिस्थिती नाही.) भाषा बदलत जाते. अभिरुची बदलत जाते. मग एकवेळचा विनोद-विनोद रहात नाही. 'खडाष्टक' (लेखक - शं. प. जोशी) या नाटकातलं वक्रतुंड हे पात्र त्यावेळच्या प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावी. 


आज त्यातले विनोद तेवढेसे रंगतदार वाटत नाहीत. वक्रतुंड म्हणतो, 'आताच फुलांचा प्रातर्विधी करून आलो.' हे अनेकांना अनाकलनीय वाटतं. केव्हा केव्हा विनोद करताना विनोद करणाऱ्याचं तारतम्य सुटतं आणि नको तिथे विनोद होतो. 


कै. रा. ग. गडकऱ्यांनी आपल्या भावबंधन या नाटकात इंदू आणि बिंदू यांच्या काळ्या रंगावर असा विनोद केलाय की अनेकांना तो खटकतो. नाटक पाहायला एखादी काळी व्यक्ती आली असेल तर? विनोद करणारा लोक हसायला लागले की पुष्कळ वेळा वाहत जातो आणि मनावर आघात करणारा विनोद करतो. 


आपल्या हातातोंडाशी आलेल्या मुलाला स्मशानात पोचवायला त्याचा वयस्कर बाप येतो. अनुचितपणे फटकन कोणीतरी म्हणतं, 'काय कमाल आहे! त्याने तुम्हाला पोहोचवायला यायचं, तर तुम्हीच त्याला पोचवायला आलात.'


विनोद हे दुधारी शस्त्र आहे. एका धारेने ते जसे हसवते, तसे दुसऱ्या धारेने कापत जाणारी जखम करते. कै. प्र. के. अत्रे यांनी कै. माधव ज्युलियनांवर एवढी विनोदी टीका केली की, त्यांना अक्षरशः रडवलं. केव्हा केव्हा विनोदी माणूस असा विनोद करतो की, त्याची गणना क्रूर विनोदात करायला हवी. 


एका विख्यात विनोदी लेखकाने विचारले, 'ग. दि. माडगूळकरांना काय झालंय?' त्यावर उत्तर मिळालं, 'कॅन्सर.' त्या विनोदवीराने लागलीच कोटी केली, 'कॅन्सर? मग नो आन्सर. याला क्रूर विनोदच म्हटले पाहिजे, नाही का? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद