कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh

 कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कलावंत नसते तर मराठी निबंध बघणार आहोत. नुकतंच मान्यवर लेखिका ‘योगिनी जोगळेकर' लिखित 'रेषा' हे पुस्तक वाचण्यात आले. लेखिकेने लिहिले आहे की, “कलाकार फक्त कलेचाच ताबेदार असतो. आणि तो फक्त तिच्याच तालावर नाचत असतो. 


अचानक मनाने मला विचारलं, हे सारे कलावंत संपावर गेले तर....? बापरे! काय हा प्रश्न? कला हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कलेशिवाय जीवन जगणं निरस ठरेल .


कलावंत त्याच्या कलेतून जगतो, वाढतो.... व बहरतो. कला आणि कलावंत दोन नसतातच मुळी! समाजात , जगात कलावंताचे स्थान मोलाचे आहे. त्यांनी संप पुकारला तर जीवनातलं सौंदर्य संपेल. वाळवंटासारखं रूक्ष जीवन हाती येईल. 


अप्रतिम, भव्य सौंदर्य जे कलेत ओपप्रोत भरलेलं आहे ते लुप्त होईल. मन प्रसन्न राहणार नाही. कागदी फुलातही सुगंध निर्माण करण्याचं सामर्थ्य कलेत आहे. कारण कला जन्म घेते हृदयात . हृदय व भावना यांचे अतूट नाते आहे. त्याला कल्पकतेची जोड आहे. वास्तव काय आहे. 


यापेक्षा ते वास्तव कलाकाराच्या कुंचलेत किंवा शब्दात किंवा कृतीत कसे बध्द झाले आहे. हे महत्त्वाचे आहे. ती अनमोल आनंदाची गुरुकिल्ली आहे. जीवनाचा मधुघट घडवितांना कलावंताची कला जादू करून जाते. झरझर बरसणारं सौंदर्य, आनंदाची पखरण, प्रसन्न वातावरण, एक वेगळंच रम्य विश्व याची प्रचीती मनाला येते. 


कला थकल्या-भागल्या जिवाचा विसावा आहे. मरगळलेल्या मृत मनासाठी ती अमृतमय संजीवनी आहे. माणूस मर्त्य असला तरी कला अमर असते. ती कला जो साकारतो त्याला तर अमर करतेच पण त्याचबरोबर ती ज्याला साकारते त्यालाही अमर करते. 


कलेचा आविष्कार म्हणजे 'सत्यम शिवम् सुंदरम्' यांचा मनोज्ञ मिलाफ होय. कलावंत संपावर गेले तर जीवनाचा प्रकाशच मावळेल. कारण कला जीवनाचा प्रकाश आहे. - साहित्य, नाटके, चित्रपट, चित्रप्रदर्शने, हस्तकलेचे नमुने, काव्य, ग्रंथ, नक्षीकामाची इतर कलानमुने ऐतिहासिक इमारती या सर्वांमध्ये कला ओतप्रोत भरलेली आहे. 


भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळांकडे समर्थपणे पाहण्याची दृष्टी कलावंताकडे आहे. मोठा विषय छोट्या आशयातून व्यक्त करण्याची कला त्याच्याकडे आहे. त्यामुळे रूक्ष विषयही रंजक झाले आहेत. कलावंतांनी संप पुकारला तर स्नेहसंमेलने, नाटके, चित्रपट, आकाशवाणी, दूरचित्रवाणी सारेच बंद पडेल. 


कारण कलावंतामळेच त्यांचे अस्तित्व आहे. कला कोणतीही असो, ती सौंदर्य व प्रसन्नता घेऊनच अवतरते. ती प्रदीर्घ आहे. जीवनभर ती साथ देते. माणसातल्या गुणांचा ती विकास करते. कलेत लपवाछपवी नाही. 


ती सरळ सरळ हृदय उघड करते . कला चैतन्यमय आहे. मनाला हिरवेपण देण्याचे कसब कलेत आहे. कलेतून अव्यक्त मनही व्यक्त होते. जीवन निर्मल , सुंदर, आनंदमय बनत जाते. वेळेचा सदुपयोग केला जातो. 


या विश्वाला सुंदर बनविण्यात कलावंताचा मोठा वाटा आहे. लेण्या, प्राचीन मंदिरे , ऐतिहासिक स्मारके आजही या गोष्टीची साक्ष देत आहेत . मन म्हणू लागले "स्वर रूसले, संगीत लोपले, झंकारली वीणा शब्द गोठले, सौंदर्य हरवले, कागद झाला सुना रंग विरले, कुंचलेविण चित्रही मावळले 


आनंद जन्मेना विश्वि आता, कलावंत हे रूसले! नाही अभिनय, नाही चित्रकारी नाही बासुरी-तबला , नाही संगीतलहरी आनंद लोपला, कृत्रिम जीवन झाले. अवचित घडले कसे, कलावंत संपावर का गेले?" 


कलेला जन्म देऊन कलावंत स्वतः जेवढा आनंदी होतो त्यापेक्षा कित्येक पटीने तो त्या कलेच्या रूपाने दुसऱ्यांना अधिक आनंद प्रदान करीत असतो. कलेची किंमत पैशात करता येत नाही. 


हल्ली बाजारात कलेचाही व्यापार होतो. ही शोकांतिका आहे. कलेची खरी कदर केली गेली तर कलावंत संपावर जाणार नाहीत. कलेशिवाय ते जगूच शकत नाहीत आणि त्यांच्या या कलेनेच आपणही जीवनात आनंदाचे नंदनवन फुलवित असतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद