खेड्यांची दुरवस्था मराठी निबंध | KHEDYANCHI DURVYAVSTHA ESSAY IN MARATHI

 खेड्यांची दुरवस्था मराठी निबंध | KHEDYANCHI DURVYAVSTHA ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेड्यांची दुरवस्था मराठी निबंध बघणार आहोत. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी खेड्यांमध्येच भारतातील बहुतांश जनता राहत होती. पण जशी औद्योगिक क्रांती झाली, तशी माणसे काम-धंदा मिळावा, या आशेने शहरांकडे धाव घेऊ लागली. 


आजचे चित्र काय दिसते? खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरे वेडीवाकडी फुगत चालली आहेत. त्यामुळे शहरे-देखील बकाल होत चालली आहेत. जागेचा प्रश्न, पाण्याची टंचाई, प्रदूषण, वाढती अपघातांची संख्या, सतत चिंता, असे असतानाही लोकांना शहराकडे का यावेसे वाटते, याचा विचारही महत्त्वाचा ठरतो. उत्तर एकच


‘पोटासाठी'.शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. पूर्वी बलुतेदार पद्धत होती; त्यामुळे खेड्यातील साऱ्या गरजा खेड्यातच भागत असत. एकमेकां साह्य करू' याप्रमाणे सगळे एकमेकांना साहाय्य करत असत. आज कष्ट करून एखादे पीक काढले, तरी त्याला योग्य भाव मिळेलच, याची खात्री नाही. 


दलालांची मक्तेदारी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने ह्या दलालांनाच माल विकावा लागतो. मग मालाची किंमत शेतकरी नाही; दलाल ठरवणार. शेतासाठी मिळणाऱ्या सवलती, सुरू केलेले प्रकल्प, योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. 


त्यामुळे कर्जबाजारीपणा, दारिद्र्य त्यांच्या पाचवीलाच पुजलेले राहते. या व्यतिरिक्त अनेक समस्यांना शेतकऱ्यांना, पर्यायाने ग्रामीण भागातील लोकांना सामोरे जावे लागते. खेड्यामध्ये विद्युत् भारनियमन बारा-बारा तासांचे, त्यामुळे विजेवर चालणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा त्यांना लाभ होत नाही. 


वाहतूक-व्यवस्था नाही. पाण्याची टंचाई आहेच. नद्या, विहिरी उन्हाळ्यात आटतात. शाळा, महाविद्यालये नाहीत. केवळ शिक्षणासाठी शहरात जाणे-येणे अथवा तेथे राहणे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडत नाही. वैद्यकीय सुविधा नाहीत. 


रुग्णालये तर सोडाच; पण एखादा डॉक्टरही उपलब्ध नसतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही सुविधा खेड्यात नसल्याने, खेड्यात राहून विकास साधणे शक्य होत नाही. जीवनात पुढे जाण्याची संधीच नसल्याने खेड्यात राहणे अडचणीचे ठरते. अशा साऱ्या असुविधांमुळे आज खेड्यांची भीषण दुरवस्था होत आहे.


ग्रामीण भागातील लोक अडाणीच राहतात. शिक्षणाचा अभाव असल्याने अंधश्रद्धाळूपणा वाढतो. गरीब जनता असल्याने त्यांची फसवणूक, अडवणूक होतेच. गावातील कारभार हा एक वेगळाच मुद्दा आहे. आपल्या तालावर गावकऱ्यांना नाचविणे, स्वत:च्या मर्जीप्रमाणे साऱ्या गोष्टी करावयास लावणे, या सगळ्याचा ग्रामीण लोकांवर, त्यांच्या संपूर्ण जीवनावर विपरीत परिणाम होतो. 


त्याला कायम लाचार, हीन-दीन अवस्थेत, स्वाभिमानशून्य जीवन कंठावे लागते. अजूनही खेड्यात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते; त्यामुळे निखळ आयुष्य जगणे अशक्य होते. मनुष्याला करमणूक हवी असते, विरंगुळ्याचे चार क्षण हवे असतात; 


पण ते ग्रामीण भागात कोठून मिळणार? तरुण पिढीला याचे आकर्षण असतेच. त्यामुळे तरुण पिढीचा ओढा शहरांकडे असणारच ना? आता खेड्यांच्या दुरवस्थेची कारणे शोधून त्यावर जर उपाय-योजना झाली, तरच लोक खेड्यात राहणे पसंत करतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद