लोकशाहीतील अधिकार मराठी निबंध | LOKASHITIL ADHIKAR ESSAY IN MARATHI

 लोकशाहीतील अधिकार मराठी निबंध | LOKASHAHITIL ADHIKAR ESSAY IN MARATHI 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकशाहीतील अधिकार मराठी निबंध बघणार आहोत.'लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य.' अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 


२६ जानेवारी १९५० रोजी भारताने लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केला. आपली राज्यघटना तयार करण्यापूर्वी घटना समितीच्या सभासदांनी विविध लोकशाही राज्यांच्या राज्य-पद्धतींचा अभ्यास केला व त्यातून आपली घटना तयार केली.


लोकशाही पद्धत खरे तर आदर्श राज्यपद्धती आहे. आपल्या देशात लोकांचे प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी करतात. प्रश्न असा आहे की, देशात खरी लोकशाही आहे का? काही गोष्टींचा आढावा घेतल्यास याचे उत्तर मिळेल. आपल्या देशातील लोकप्रतिनिधी निवडणुकीतून निवडून आलेला असतो. 


पण प्रश्न असा आहे की, प्रत्येक १८ वर्षांपुढील व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. मतदानाचा हक्क बजावणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे असताना मतदानाचा आकडा बघता लोकांची निवडणुकीबाबतची उदासीनता दिसून येते. 


केवळ ४०% मतदान होऊन निवडून आलेला प्रतिनिधी खरा लोकप्रतिनिधी ठरतो का? ६०% लोकांच्या मताचे काय? याचाच अर्थ ही लोकमतावर चालणारी लोकशाही नाही.लोकशाहीने दिलेला दुसरा अधिकार आहे समानतेचा. यात धर्म, पंथ, लिंग-भेद, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येणार नाही. 


सरकारी नोकरीबाबत कोणासही प्रतिबंध होणार नाही. पण असे असताना आरक्षणामुळे हा हक्क प्रत्येकाला मिळू शकतो का? स्वतंत्रता-अधिकार. प्रत्येकाला भाषण, लेखन, सभा व एकत्र येण्याचा अधिकार आहे. असे असताना भाषणावरून गोंधळ होतात, लेखनाबाबत आक्षेप घेतले जातात. 


सभा उधळून लावणे, संचारबंदी लागू करणे, ही काही लोकशाही आहे का? कोणीही कोणताही व्यापार सचोटीने करू शकतो. हे स्वातंत्र्य लोकशाहीने दिलेले. पण प्रत्यक्षात तसे घडते का? उपोषण, संप ही लोकशाहीची शस्त्रे, तीच हिसकावली जातात.


शोषण होत असेल, तर त्याविरुद्ध न्याय मिळाला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. अजूनही बालमजुरी देशात चालते. धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य आज आपण अनुभवू शकतो का? शिक्षणसंस्था स्थापन करू शकतो; पण त्यावर अंकुश आहे का? ज्याच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त आहे, अशांना सर्व अटी शिथिल, त्यांना नियम वेगळे, असे का?


न्याय मिळावा यासाठी न्यायालयांची व्यवस्था आहे. परंतु आज तेथे न्याय मिळतो का? पुरावे नष्ट करणे, साक्षीदार फोडणे, खोटे साक्षीदार उभे करणे, अशा खोटेपणावर आधारित न्यायव्यवस्था लोकशाहीचे द्योतक आहे का? आज समाजविघातक सर्व गोष्टींना भ्रष्टाचारातून अभय मिळते. 


त्यामुळे परवाना, दारुविक्री, अनधिकृत बांधकामांना लाच घेऊन नियमित करणे, अशा कितीतरी गोष्टी आज सर्रासपणे घडत आहेत. मग जनतेला मिळालेले हक्क त्याला उपभोगता येतात का? सामान्य जनतेला फक्त कर्तव्ये मग हक्क का नाहीत? आज राजकीय लोकशाही आहे पण सामाजिक लोकशाही आहे का? 


उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना हुशार मुलांच्यात स्पर्धा पण ज्यांना आरक्षण आहे त्यांच्याबाबतीत मात्र गुणांबाबत शिथिलता असे का? खूप मेहनत करून उत्तम गुण मिळविणारा ह्या लोकशाही राष्ट्राचाच घटक आहे ना? मग त्याला योग्यता असून का डावलले जाते? 


लोकशाहीत श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेदभाव नसतो ना? एकाला न्याय देताना इतरांवर अन्याय का? असे घडताना पाहिले की वाटते देशात आम्हाला लोकशाही अधिकार मिळतात का? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद