मला देव भेटला तर मराठी निबंध | Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh

 मला देव भेटला तर मराठी निबंध | Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला देव भेटला तर मराठी निबंध बघणार आहोत. मला देव भेटला तर... खरंच, कल्पना खूप छान आहे. कोणत्याही गोष्टीतील यश, कोणतेही मागणे आपण मागतो, ते देवाकडेच ना? देव! बापरे केवढा तेजस्वी. त्याच्याकडे बघून डोळेच दिपले. 


देव म्हणाला, "बोल, काय हवंय तुला? तुला माझी आठवण आली म्हणजे नक्कीच तुला काहीतरी हवं असणार ना? तुम्हा माणसांना जेव्हा सगळं छान असतं, तेव्हा देव नाही आठवत."“देवा, आम्ही मुलं म्हणजे तुझ्या घरची फुलं ना? मग आमच्यावर वडीलधारी मंडळी अन्याय का करतात? 


आम्हाला खूप खेळायचं असतं; खूप बागडायचं असतं. पण ह्या मोठ्या माणसांनी आमच्यावर खूपच बंधनं घातली आहेत. साधं उदाहरण घ्या. पाऊस! त्या पावसात मस्त भिजायचं असतं. पण आई ओरडते, पावसात भिजलास, तर


आजारी पडशील. तू सांग ना आईला. ती झाडं, पाखरं, बेडूक, प्राणी सगळे भिजतात पावसात; मग ते पडतात का आजारी? मग आम्ही भिजलो ना, तरी आम्ही आजारी पडणार नाही, असा वर दे. आम्हाला खेळायला मुळीच अंगण नाही. केवढी रे छोटीछोटी घरं! आमची घरं खूप मोठी कर नि समोर मोठं अंगण.


“तसंच, ती शाळा आनंददायी बनव. दप्तरांचं ओझ नको की परीक्षेची भीती नको. गणित तर शाळेतून हद्दपारच कर. ती इतिहासातली सनावळ आणि भूगोलातली भरमसाठ माहिती, विज्ञानातील संज्ञा, सूत्रं, व्याख्या सगळ्या गायब करून टाक. आमच्या शेजारी वाडीत राहणारी मुलं ना खूप गरीब आहेत. 


बिचारी इतकी लहान असूनही काम करतात. शाळेत शिकायला वेळही नसतो त्यांना आणि पुस्तकांचा खर्चही परवडत नाही त्यांना. एवढे कष्ट करतात ना, तरी त्यांना पिझ्झा, पाव-भाजी, आइस्क्रीम, काहीसुद्धा खायला मिळत नाही. तेव्हा देवा, अशी गरीब-श्रीमंत विषमता का? लहानपण हरवत आहे. ते आम्हाला आनंदाने घालवता येईल, असा वर दे.


"काही लोक अनाचारी आहेत. ते लाचलुचपत करतात, खोटेपणा करतात आणि दुसऱ्यांना फसवून त्यांची पिळवणूक करतात. त्यांना चांगली अद्दल घडव आणि त्यांना यापुढे देशसेवा करण्याची बुद्धी दे. खूप लोक अज्ञानी आहेत. त्यामुळे ते अंधश्रद्धाळू आहेत. 


भोंदू लोक तुझ्या नावावर त्यांना फसवतात; लबाडी करतात. त्यांनादेखील चांगली बुद्धी दे आणि या अंधश्रद्धेच्या भोवऱ्यातून बाहेर काढ. "आमच्या शेजारच्या देवळात सारखा लाउडस्पीकर लावलेला असतो. भजनाच्या आवाजाने डोकं दुखतं आमचं. अभ्यास होत नाही.


तेव्हा तुझ्या त्या भक्तांना आवर घातलास, तर ध्वनिप्रदूषण टळेल. देवा, ज्या-ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या सगळ्यांवर जादूची कांडी फिरव नि सगळीकडे कसं छान छान होईल. पण अरे हो, कल्पनाविलासात रमून काय उपयोग? हे सारे केव्हा शक्य होईल? 'मला देव भेटला तर!'मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद