माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

 माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माणसाची स्मृती नष्ट झाली तर  मराठी निबंध बघणार आहोत. “स्मृतीशिवाय नाही गती अन् गतीशिवाय नाही प्रगती....." अशी ही स्मृती माणसाला सोडून गेली तर? क्षणापूर्वीचे किंवा कालचे वा भूतकाळातले काहीच माणसाला आठवले नाही तर....? अचानक एकदा असा विचार मनात डोकवला.


छे ऽ छे! काय भलताच विचार! असा विचार येण्यामागेही एक पार्श्वभूमीही होतीच.आम्ही नवीन जागी रहायला आलो होतो. एकदा सकाळीच दारावरची बेल वाजली.शेजारचे काका दारात उभे होते.मी दार उघडताच त्यांनी विचारले “ए, तू मला सांगशील का? की मी कोण आहे? माझं घर कोठे आहे? मला काहीच आठवत नाही' '


स्मृतिभ्रंश' झालेल्या त्या काकांची अवस्था पाहून मनाने मला विचारले, 'माणसाची स्मृती नष्ट झाली तर काय होईल?''सुरुवातीला वाटले वा! छानच! मग कोणी रागावलेले,मारलेले लक्षात राहणार नाही.दुःखी प्रसंग आठवणार नाहीत. वर्तमानातला एक एक क्षण नव्याने जगता येईल. 


भूतकाळाचा कोणताही परिणाम त्यावर नसणार. कोणाची ओळख नाही, कोणाचा संबंध नाही, काय झाले होत माहीत नाही.फक्त आपणच आपले मालक.आनंदी आनंद "झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे , जीवनगाणे गातच राहावे....."


दुसऱ्याच क्षणी माझ्या मनाने पवित्रा बदलला.छे, भलतंच विपरित घडेल हो! सावध हो! “स्मृती' हे मनुष्याला लाभलेलं वरदान आहे. ज्यायोगे इतर प्राणिमांत्रापेक्षा मानव अधिक प्रगत आहे.भूत , वर्तमान व भवितष्य या तीन काळांना जोडण्याचे सामर्थ्य केवळ स्मृती मुळे माणसाच्या अंगी आलेले आहे. 


विश्वाचा कण न कण या स्मृतीमुळेच जोडला गेलेला आहे. बाळ व आई यांच नातं या स्मृतीमुळेच अमर झाले आहे. नाते' मग ते कोणतेही असो या स्मृतीमुळेच जपले गेले आहे. भोगलेले सुखी क्षण, त्यांची माधुरी आयुष्यभर स्मृतीत रेंगाळत राहते.मनुष्य जगतो तोच मुळी स्मृतीमुळे ! 


तो कुणाचा, कोणीतरी आहे म्हणून तो धडपडतो, काम करतो व जागतो ही. त्याला जगण्याचे पाश आहेत. बाल्य, तारूण्य , वार्धक्य या तिन्ही अवस्था तो अनुभवतो. शिक्षण, ज्ञान, कौशल्य व सर्वांगीण प्रगती यासाठीही स्मृतीचंच बळ लागतं. 


नाहीतर पुस्तके, ज्ञान, शोध , नवीन उपकरणे या साऱ्यांचा विसर पडून फक्त खाणे व झोपणे या दोनच क्रिया उरल्या असत्या. शत्रू की मित्र? योग्य की अयोग्य? आपला की परका? न्याय की अन्याय? ही सारी प्रश्ने निरूत्तर होऊन दवाखाने , न्यायालये, शाळा , कार्यालये, बँका, बाजार सारेच ठप्प! अहो खून कोणाचा झाला? कोणी केला? वकील कोण? सारेच विस्मरण अवस्थेतले मग खटला कोण चालविणार व कसा? 


पेशंटला काय झाले हे सांगता येणार नाही व डॉक्टरांचे नाव लक्षात राहणार नाही तर इलाज कसा होईल? एखाद्याला गावी जायचे पण कोणत्या गावी? माहीत नाही तर प्रवास कसा होईल?


स्वतःची ओळख नाही तर तर तो दुसऱ्यास ओळखणे शक्यच नाही. सारां वेड्यांचा बाजार ठरेल. माणुसकी , संस्कृती, गती व प्रगती याच काय पण साध्या शब्दांनाही अर्थच उरणार नाही. मानवाने ज्ञान संपादन केलेले असूनही विस्मृतीमुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही.


सारी सुखोपयोगी साधने , यंत्रे तशीच वाया जातील. अहो फक्त शरीर खाणार , पिणार डोके बिचारे तर हरवलेले."दोन हात, दोन पाय, एक तोंड माझे सांगेल का कुणी मला नाव काय माझे?" शिक्षणक्षेत्र , कलाक्षेत्र , व्यवसायक्षेत्र , सरकारी क्षेत्र सारे ओस पडतील.रेडिओची गाणी, टि.व्ही.वरचे कार्यक्रम , स्नेहसंमेलने , समारंभ , संगणकाची करामत या साऱ्यातला आनंद लोप पावेल.


आजवरचा ‘आदिमानव ते आजचा उत्क्रांत व प्रगत मानव' हा सारा प्रवास निरर्थक ठरेल.चंद्र, सूर्य, तारे , ग्रह यांचा अभ्यास कोणी करणार नाही. सारी पृथ्वी एका गर्द काळोखात गुरफटली जाईल-विस्मृतीच्या ! मग त्यातून सुटका नाही.पैसा, सौंदर्य, प्रसिद्धी , किर्ती सारे मातिमोल होईल.


मला वाटतं मग परमेश्वराला दुसरंच विश्व निर्माण कराव लागेल, जिथे ‘स्मृती' नांदेल.परत माणूस 'माणूस' म्हणून ओळखला जाईल.त्या नव्या विश्वातला मानव मग म्हणेल


"माणूस माझे नाव,

 माणूस माझे गाव, 

दहा दिशांच्या रिंगणात, 

या पुढे माझी धाव!"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद