माणसे मुकी असती तर मराठी निबंध | MANSE MUKKI ASTIL TAR ESSAY IN MARATHI

माणसे मुकी असती तर मराठी निबंध | MANSE MUKKI ASTIL TAR ESSAY IN MARATHI


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माणसे मुकी असती तर  मराठी निबंध बघणार आहोत. माणसाला परमेश्वराने वाचा, म्हणजेच वाणीचे वरदान दिले आहे. वाणी म्हणजे अभिव्यक्तीचे साधन. आपण आपले विचार, भाव-भावना व्यक्त करतो, ते वाणीच्या साहाय्याने.त्यासाठी आपण संभाषण करतो. 


कधी-कधी वाद होतो. तर कधी कधी संवाद घडतो. वाद वाढला - की, त्याचे भांडणात रूपांतर होते. भांडणामुळे वैरभावना वाढते. भांडणे, मारामाऱ्या असे गुन्हे घडतात. गुन्हे घडले की शिक्षा. त्याउलट सुसंवादातून इतरांची मने जिंकता येतात. शब्दांचे सामर्थ्य फार मोठे असते. 


सर्वांच्याच जीवनात शब्दांचे फार महत्त्व आहे. जीवनात अडी-अडचणीच्या वेळी शब्दच आपले सहप्रवासी बनतात. शब्दांना शस्त्राची उपमा देतात. शब्दाला शस्त्राची धार आहे. कटू शब्द मने दुखावतात, माणसे एकमेकांपासून दुरावतात. याउलट मधुर शब्द मैत्री घडवतात. संत तुकाराम म्हणतात, 

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। 

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।

 शब्दचि अमुच्या जीवनाचे जीवन। 

शब्द वाटू धन जनलोकां । 


असे सामर्थ्य असणारे शब्द बोलताच आले नाहीत तर... माणसे मुकी असती तर.... सर्वत्र भीषण शांतता पसरेल. बाजारात, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, स्टेशन, बाजार या ठिकाणी कानठळ्या बसेल, एवढा गोंधळ असतो. माणसे मुकी असल्याने हा गोंगाट नाही. 


नीरव शांतता. शाळेत प्रचंड गोंगाट असतो. मुलांना शांत बसवता बसवता शिक्षकांच्या नाकी नऊ येतात. सर्वच मुके असल्याने फक्त खाणाखुणा. किती शिक्षक खुश! माणसे मुकी असल्याचा एक फायदा म्हणजे बोलण्यामुळे, आरडा-ओरडा केल्यामुळे माणसाची खूप शक्ती खर्ची पडते. 


ही सगळी शक्ती वाचेल. तोंड बंद असल्याने न बोलता खूप काही काम होईल. रिकामटेकड्या गप्पा, उखाळ्या-पाखाळ्या, निंदा, टिंगल, टोमणे, नालस्ती ह्या सगळ्या गोष्टी मुकेपणामुळे टळतील. जसे बाल्यावस्थेत म्हणजे अगदी शैशवावस्थेत माणसाला कुठे बोलता येते? 


तेव्हा त्याचा चेहरा किती निरागस असतो! तसाच निरागस चेहरा प्रत्येकाचा दिसेल. रागावर एकदम नियंत्रण! वक्ते नाहीत, गायक नाहीत, विक्रेते नाहीत, प्रचारक नाहीत. बघा, किती शांत शांत वाटेल ते. प्रत्येक जण अभिनयकुशल बनेल. 


प्रत्येक जण देहबोलीतून बोलेल. 'मौनम् सर्वार्थ साधनम्' या उक्तीची प्रचीती येईल. मौनात फार मोठी ताकद असते, ती आजमावण्याची संधी मिळेल. मौनामुळे चित्तशुद्धी, चित्ताची एकाग्रता, चित्ताची शांतता साध्य होईल. पण हे सारे केव्हा? माणसे मुकी असती तर...! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद