मी चांदोबा बोलतोय मराठी निबंध | ME CHANDOBA BOLTOY ESSAY IN MARATHI

 मी चांदोबा बोलतोय मराठी निबंध | ME CHANDOBA BOLTOY ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मी चांदोबा बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा, तूपरोटी खाऊन जा...... अशी विनवणी कधी काळी तुम्ही सर्वांनीच मला केली होती. ओळखलंत ना मला? हो, 


अगदी बरोबर. तोच मी तुमचा मामा; तुमचा चांदोबा. तुमच्याशी बोलण्याची माझी खूप इच्छा होती. आज योग आलाय, मी म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक. आठवा तुमचं बालपण! रोज संध्याकाळी तुम्ही मला बघत-बघत जेवायचा. 


माझ्याशिवाय तुमची एकही संध्याकाळ गेली नसेल ना? माझ्याशी तर तुम्ही 'मामाचं नातंच जोडलंत. म्हणूनच मी तुमच्या मनाचा कारक. तुमच्या मनाशी माझाच संबंध. अशीच माझी धारणा आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारीपण माझी. माझं तेज पाहन, रूप पाहन


कवींच्या मनात खूप कल्पना जाग्या झाल्या. कुणी सुंदर स्त्रीच्या मुखाला माझी उपमा दिली. 'चंद्रमुखी', 'चंद्रवदना' म्हणून तिचं कौतुक केलंत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हती अशा अनेक अलंकारांची निर्मिती करण्यात माझा फार मोठा वाटा आहे. काय, मान्य आहे ना तुम्हाला? 


सर्व सारस्वतांचा मी लाडका बनलो. माझ्याशिवाय त्यांचं पानदेखील हलत नसतं. माझी वर्णनं ऐकून मी खूप खूश व्हायचो. माझा अभिमान उफाळून यायचा. एका कवीने एका कवितेत म्हटलं.


“चंद्राच्या गालावरी।

 देव लावी गालबोट ।" 


दृष्ट लागू नये म्हणून आईने लावलेलं गालबोट चंद्र अभिमानाने गालावर घेऊन आकाशात मिरवतो. हे वाचल्यावर मला धन्यता वाटली.माझी शीतलता तुम्ही मान्य केलीत. म्हणून चंद्रासारखे शीतल, चंद्राहूनि शीतल, अशी उपमा दिलीत, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो.


नहे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल।

नहे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ॥ 


शरदीचा चंद्र हो, माझी त्या पौर्णिमेची शान काही औरच असते. अहो, मराठी महिन्यातील पंधरावा दिवस हा पौर्णिमेचा. प्रतिपदेपासून मी कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण गोल आकाशात दिसतो. तेव्हा माझा प्रकाशही भरपूर असतो. 


आकाशाला सौंदर्य प्राप्त होतं. हे तर प्रत्येक पौर्णिमेलाच होतं; पण अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला माझं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. मग काय, तुम्ही रसिक मंडळी माझ्या साक्षीने भरपूर आनंद लुटता. तेव्हा मला खूप आनंद होतो. या पौर्णिमेला कौमुदी पौर्णिमा' म्हणतात. आस्वाद कसा घ्यावा, हेच तर मी शिकवतो. तुमच्या आयुष्यात मी नेहमीच उत्सव नि उत्साह निर्माण करतो आणि कवींना स्फूर्ती देतो.


जसे तुम्ही स्तुती केल्यावर खुश होता, तसा मीदेखील खुश होतो. पण कधी कधी माझी निंदादेखील होते. तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटतं. माझ्यावरचा डाग पाहून तुम्ही खूप काहीबाही बोलता. एका कवीने तर नलराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना काय म्हटलं, माहीत आहे तुम्हाला? सांगतोच. कवी म्हणतो,


जो अंबरी उफळता खुर लागलाहे।

तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे। 


वाऽऽ! म्हणे नलराजाच्या घोड्याच्या उधळल्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग म्हणजेच माझ्यावरचा डाग ! आहे की नाही ही अतिशयोक्ती? असाच एक नवकवी काय म्हणतो,'चंद्र म्हणजे आकाशात टांगलेली पितळी घंटा' पटतंय का तुम्हाला? मुळात माझा रंग पिवळा नसून स्वच्छ पांढरा, रुपेरी आहे. आणि मी त्याला पितळी घंटा वाटते. पटतयं का हे?


दुसरं माझं दु:ख म्हणजे मला लागणारं ग्रहण. मला ग्रहण लागतं म्हणजे नेमकं काय घडतं, हे जाणून न घेता तुम्ही त्याचा भलताच अर्थ लावून जी काही कृती करता ना, तेव्हा मला मनापासून वाईट वाटतं. तुम्ही माणसं ना फार अंधश्रद्धाळू आहात. विज्ञान शिकता, भूगोल शिकता, ज्ञान मिळवता, तरीही अंधश्रद्धा सोडत नाही, 


तेव्हा मला दु:ख होतं. मी लांबून तुमच्याशी बोलायचो ना, तेच ठीक होतं. अति परिचयात अवज्ञा होते हेच खरं. त्यामुळेच मानवाने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नील आर्मस्ट्रग हा पहिला माझ्यावर पाऊल टाकणारा मानव. त्याच्यामुळेच मानवाला पहिल्यांदा जवळून बघण्याचा योग आला. 


हा योग पुढे येणार नाही, याची खात्री पटली आहे. माझ्यावर मानव राहू शकणार नाही, हे सत्य जगासमोर आलं आहे. नाहीतर आजपर्यंत मानवाने माझ्यावर कब्जा करून मोठी वसाहत निर्माण केली असती. मोठ-मोठ्या पर्यटन संस्थांनी 'चला चंद्रावर ...' म्हणून सहली आयोजित केल्या असत्या. मानवा, तू बुद्धिमान आहेस खरा; 


पण त्यापेक्षा स्वार्थी खूप आहेस. पण लक्षात ठेव. आमच्यापुढे तू खूप थिटा आहेस. माझ्या दर्शनाची लालसा तू कधीच शमवू शकणार नाहीस. तुला माझं गुणगान करावंच लागेल. माझ्या कलानेच तुला वागावं लागेल.अरे मानवा, तू माझ्या अंगरख्याची चिंता करू नकोस. माझ्यातील बदल तुला आनंददायी ठरोत, हीच इच्छा !मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद