एका वस्तुसंग्रहालयाचे आत्मवृत्त | museum autobiography essay in marathi

 एका वस्तुसंग्रहालयाचे आत्मवृत्त | museum autobiography essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपणएका वस्तुसंग्रहालयाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. मुलांनो! काल तुम्ही मला भेट देण्यासाठी आला होता. तुम्ही माझी सर्व दालने फिरलात खरे; पण नुसतेच फिरलात. फारच थोड्या मुलांनी जिज्ञासा दाखवली. काही मुले तर नुसतीच गप्पा मारत होती; 


एकमेकांना ढकलत होती. खरे तर मला खूप वाईट वाटले. अरे, वस्तुसंग्रहालय म्हणजे बाजार नाही बरे! या वस्तू म्हणजे केवळ निर्जीव नाहीत; तर प्रत्येक वस्तूत इतिहास दडलाय. या संग्रहालयाचा हेतू ज्ञान देणे; ते पण मनोरंजक अनुभवातून ! शिवाय दुर्मिळ वस्तू एकत्रित बघण्याची एक उत्तम संधी असते.


आता बघा ना, माझ्यात अनेक दालने आहेत. या प्रत्येक दालनात भिन्न भिन्न प्रकारच्या वस्तू आकर्षक पद्धतीने मांडलेल्या आहेत. उगीच कुठल्यातरी टाकाऊ वस्तू उचलून आणलेल्या नाहीत. यावरून पूर्वीची पद्धत कशी होती, कोणत्या प्रकारची वस्तू कशासाठी वापरली जायची, 


त्यांच्या निर्मितीसाठी कोणकोणते धातू वापरले आहेत, त्यावर कशा प्रकारची कलाकुसर केली आहे. त्याचे विविध आकार कसे आहेत. त्यात विविधता किती आहे, काळानुरूप त्यात कसकसे बदल झालेत, आजच्या वस्तू आणि पूर्वीच्या वस्तू यांत फरक कोणता, असा अभ्यास करता यावा यासाठी या वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केलेली असते.


माझ्या निर्मितीसाठी संग्रही वत्ती लागते. स्वत:ला यासाठी झोकून द्यावे लागते. खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्याचा अभ्यास करून त्याची माहिती संकलित करावी लागते. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे संक्षिप्त पण आकर्षक असे लेखन करावे लागते. त्याचे उत्तम फलक तयार करावे लागतात. 


माझी निर्मिती म्हणजे एक प्रकारची तपश्चर्याच असते. हे काम म्हणजे काही येरा-बाळ्याचे काम नव्हे. संस्कृतीचे जतन करण्याचे हे काम वाटते तितके सोपे नसते.


आता मीच तुम्हाला माझ्या प्रत्येक दालनाची ओळख करून देणार आहे. त्यानंतर मात्र तुम्ही नवी दृष्टी घेऊन पुन्हा मला भेट द्यायची. आहे कबूल? दालने फिरताना बरोबर एक वही, पेन आणायला विसरायचे नाही. महत्त्वाच्या गोष्टींची त्यात नोंद नक्की करायची. 


मग बघा, तुम्हाला माझी महती कळेल. शिवाय, तुमच्या ज्ञानात, तुमच्या आनंदात भर पडेल. आहात तयार? नीट लक्षपूर्वक ऐका. माझा पहिला विभाग आहे शिल्पकला विभाग. या विभागात दगडात कोरलेल्या विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. त्यात शेषशायी विष्णू आणि ध्यानमग्न भगवान बुद्ध यांच्या मूर्ती आहेत. 


ह्या दगडात कोरलेल्या असल्या, तरी त्यांत जिवंतपणा जाणवतो. बुद्धाचे ते अर्धोन्मीलित डोळे, त्यांच्या चेहऱ्यावरील शांत भाव, आशीर्वाद देण्यासाठीचा हात, हे सारेच विलोभनीय आहे. त्यातील कलाकुसर बघा. किती बारकावे टिपले आहेत मूर्तिकाराने! ही तांडव नृत्य करणाऱ्या शंकरांची मूर्ती बघा. अप्रतिम मूर्ती! याचा मूर्तिकार कोण असेल?


यासाठी कोणता दगड वापरला आहे? मूर्तिकला वाटते तितकी सोपी नाही. खूप एकाग्रतेने, कौशल्याने त्या दगडातील अनावश्यक भाग छिन्नी-हातोडीने दूर करणे म्हणजे शिल्पकला.


चला आता दुसऱ्या विभागात. एक नजर फिरवा. झालात ना चकित? अहो चकित होण्यासारख्याच वस्तू आहेत. ह्या सर्व वस्तू म्हणजे युद्धांची आयुधे. काळानुसार युद्धाची शस्त्रे कशी बदलत गेलीत, ते बघा. तीर-कमठा, ढाल-तलवार, तोफा, बंदुका. तेव्हाचे लढवय्ये चिलखत घालत, ते कसे आहे बघा. पलीकडेच शिरस्त्राणे आहेत, कवच आहेत.


या शस्त्रांकडे पाहिल्यावर माणसाचा विकास कसा होत गेला, तेव्हाची युद्धनीती कशी होती, हे नक्कीच समजेल आणि पराक्रमी राजे डोळ्यांपुढे नक्कीच साकारतील.


आता आपण जातोय तिसऱ्या दालनात. यात आहेत विविध प्रकारची, विविध धातूंपासून बनविलेली भांडी. भांड्यांचे आकार बघा किती भिन्न आहेत ते! शेजारी बघा, विविध प्राणी दिसतील. प्राण्यांच्या मृत शरीरात भुस्सा भरून अशा त-हेने ठेवलेत, की ते सजीवच वाटतात. 


अगदी छोट्या पक्ष्यापासून, वाघ-सिंहापर्यंत सारे प्राणी किती कलात्मक रीतीने ठेवलेत, ते बघा. आजूबाजूला काही नकाशे लावलेले आहेत. या नकाशांवरून भारताच्या उज्ज्वल प्रगतीचा आढावा घेता येतो. पण त्यासाठी जिज्ञासा मात्र हवी.आता शेवटचे दालन आहे वस्त्र-प्रावरणे. भारतीय वेशभूषा किती सुंदर आहे ! त्याच दालनात भारतीय आभूषणेही पाहायला मिळतील. भिन्न धातूंपासून बनविलेले दागिने पाहून खूप मजा वाटते.याशिवाय जुनी नाणी, चित्रकला ! विभाग याचे वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्षच बघा ना. डोळ्यांना नक्कीच सुख वाटेल आणि तुमच्या ज्ञानातही भर पडेल.मित्रांनो, यापुढे कधीही मला बघायला याल तेव्हा लक्षात ठेवायचे. देखो, मगर प्यारसे, ध्यानसे, मनसे!मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद