निरक्षराची कैफियत मराठी निबंध | NIRAKSHRACHI KAIFIYAT ESSAY IN MARATHI

 निरक्षराची कैफियत मराठी निबंध | NIRAKSHRACHI KAIFIYAT ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निरक्षराची कैफियत मराठी निबंध बघणार आहोत. मी 'काला अक्षर भैंसबराबर' अशी स्थिती असलेला एक माणूस. आमच्या गावातले मास्तर म्हणतात, “तू म्हणजे बिनशिंगाचा पशू आहेस. शेपूट आणि शिंग असतं ना, तर तू पशूच असतास.


” एकदा मी त्यांच्यावर खवळलो. तेव्हा ते म्हणाले, "अरे बाळा, गाई, म्हशी, बकरी, वाघ, सिंह ह्या प्राण्यांची कधी शाळा असते का? ते अभ्यास करतात का? त्यांना लिहिता-वाचता येतं का?" मी म्हटलं, “नाही! मग त्यांनी पुन्हा विचारलं, “मग तू शाळेत गेलास का कधी! तू शिकलास का लिहायला, वाचायला? म्हणजे तू आणि ते पशू एकच ना ! 


तुमच्यात फरक काय, तर पशूना शिंग आहेत नि शेपूट आहे. तुला ते नाही म्हणून तू माणूस."खरंय! गुरुजी अगदी बरोबर बोलले. त्यांनी मला साक्षरता वर्गाला यायची कितीतरी वेळा विनंती केली; पण मला त्याचं महत्त्वच नाही समजलं. लहानपणी आई-बापानं शाळेत नाही घातलं. 


आमच्या मागच्या पिढीतपण कोणीही शिकलेलं नाही. आम्ही कधी शाळेचं तोंडच नाही पाहिलं. मी लहानपणी नुसत्या उनाडक्या करायचो. नदीवर जायचं, फडक्यात मासे पकडायचे, झाडावर चढायचं, फळं तोडायची आणि खायची, गुरांमागे धावायचे, त्यांच्या शेपट्या पिरगाळायच्या, आईनं आणलेलं लोकांकडचं शिळं,


आंबलेलं अन्न खायचं. एकदा तर माझ्या बाच्या मनात काय आलं, तर मला शाळेत घालायचं. मी काही तयार होईना, तेव्हा त्यांनी मला हिरव्या फोकानं बडवलं होतं. मी शाळेत गेलो; पण पहिल्याच दिवशी शाळेतून पळून गेलो, ते पुन्हा काही शाळेत गेलोच नाही.


मोठा झालो. मीदेखील कुणा जमीनदाराच्या शेतावर शेतमजूर म्हणून दिवसभर राब-राब राबतो. बायको आहे, मुलं आहेत. ती गावाकडेच असतात. दर महिन्याला पैसे पाठवतो. त्या पैशात बायको आणि मुलं भागवतात. कधीतरीच सुट्टी मिळते. आज मी जर शिकलो असतो, 


तर आम्ही आमचे सगळे कुटुंबीय एकत्र राहिलो असतो. माझ्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ शकलो असतो. पण आता काय उपयोग? एक दिवस एक मजाच झाली. मी बायकोला पैसे पाठवले. त्याची पोचपावती आली. त्यावर माझ्या बायकोची सही पाहिली आणि मी गोंधळात पडलो. माझा असा समज झाला की, ते पैसे दुसऱ्या कोणीतरीच घेतले आहेत. मा मी पोस्टात गेलो.


पोस्टमास्तरांना मी पावती दाखवून त्यांना माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. पोस्टमास्तरांनी खात्री करून घेतली आणि सांगितलं, “तुमच्याच बायकोने सही करून पैसे घेतले आहेत.” तरीही माझा विश्वास बसेना. मी विचार करू लागलो. माझी बायकोपण माझ्यासारखीच अंगठाबहाद्दर. 


तिला सही करता येत नाही. मागच्या सगळ्या पावत्यांवर तिचा अंगठा आहे आणि आत्ताच कशी काय सही? मी खूप गोंधळात पडलो होतो. मालकाला मी रजा मागितली. मालकाने कारण विचारलं. मी सगळी हकीगत सांगितली. त्यावर मालकानेदेखील मला समजावलं; पण मला काही ते पटेना. 


मी निरक्षर असल्याने मला ते वाचता येत नव्हतं; आणि सगळे मला वाचून दाखवत होते. नाव तर बायकोचं; पण ते कोणीतरी लिहून नक्कीच पैशाचा गफला केलाय, हा समज काही दूर होईना. मी रजा घेऊन गावाकडे गेलो.


घरी गेलो, तेव्हा मुलं अभ्यास करत बसली होती. त्यांना विचारलं, “तुमची आई कुठे गेलीय?" मुलं म्हणाली, “सरपंचाच्या चावडीवर." मला काहीच उलगडा होईना. मुलांना रात्रीचं एकटं सोडून मी सरपंचाच्या चावडीवर गेलो. बघतो तर काय, तिथे प्रौढ साक्षरता वर्ग चाललेला. गावातल्या बाया, पुरुष सगळे लिहीत होते, वाचत होते. 


आता मला सगळा उलगडा झाला. बायकोला आता सही करता यायला लागलीय. पावतीवर सही तिचीच होती आणि पैसे तिलाच मिळाले होते. हा एवढा सगळा घोटाळा कशामुळे झाला? निरक्षरपणामुळे. त्या दिवशी मला माझी लाज वाटली आणि माझ्या बायकोचा अभिमान!  तेव्हापासून मी सगळ्यांना सांगतो, आपल्या मुलांना शाळेत घाला. त्यांना शिकवा. निरक्षरता समाजाचा एक कलंक आहे.


                                                       शिकून अक्षर, होऊया साक्षर! 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद