पडक्या देवळाचे मनोगत मराठी निबंध | Padakya Devalayache Manogat Marathi Essay

पडक्या देवळाचे मनोगत मराठी निबंध |  Padakya Devalache Manogat Marathi Essay

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पडक्या देवळाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. प्रभू रामचंद्राचे वनवासकालात त्यांच्या संचाराने पुनीत झालेला असा हा नगर प्रांत. जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी गोदावरी म्हणजेच दक्षिण गंगा व त्याप्रमाणे अमृतवाहिनी प्रवरा या दोन्ही नद्यांच्या तीरावर असलेले मी एक देऊळ. 


या दोन्ही नद्यांच्या तीरावरच रामचंद्रांचे वास्तव्य होते. रामायणकाळी नगर जिल्ह्याचा सर्व भाग दंडकारण्यामध्ये मोडत होता. गोदावरी व प्रवरा या दोन्ही नद्यांच्या तीरावरच अनेक ऋषि-मुनी आपले आश्रम थाटून तपश्चर्या करीत असत. 


हे आश्रम म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणेस पसरलेल्या आर्यांच्या वसाहतीच होत्या. या वसाहतींना राक्षसांपासून त्रास होत असे. हा त्रास प्रभू रामचंद्रांनी त्यांचे निर्दालन करून नाहीसा केला. रामायणकाळात घडलेली पट्टा किल्ल्यावरील जटायूची हकीगत, गोदाकाठच्या सीताहरणातील सुवर्णमृगाचा पाठलाग व वध, असे प्रसंग ज्या प्रांतात ज्या ठिकाणी घडले, तेथेच माझे वास्तव्य होते.


माझी स्थापना त्याच शतकात अशा पावनभूमीत झाली. माझ्या वास्तव्यामुळे अनेक जण माझ्या वास्तूत येऊन देवीचे दर्शन घेत. माझी ही भूमी म्हणजे अद्भुत स्थलमाहात्म्य जतन करून ठेवलेली भूमी.पूर्वीचा हा भाग म्हणजे दंडकारण्य. या भागाला रामक्षेत्र हे नाव पडले.


मी एका सत्यव्रती ब्राह्मणाने बांधलेले देऊळ. मी स्वत:ला खूप धन्य समजत असे; कारण एवढ्या पुण्यभूमीत वास्तव्य करण्याचे माझे भाग्य ! माझ्या आजूबाजूचा परिसरदेखील अशाच घटनांनी पावन झालेला. 


म्हणतात की, देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निघालेले 'अमृत' दानवांच्या हातात पडू नये म्हणून भगवान विष्णूला अर्धनारी नटेश्वराचे म्हणजे महालयाचे' रूप धारण करावे लागले. दानवांतील राह हा चोरून देवपंचायतीत बसून अमृत पिऊ लागला. हे भगवान विष्णूंच्या लक्षात आले. त्यांनी सुदर्शन चक्र सोडले व राहूचे शिर उडविले. तीच ‘राहुरी' होय.


अशा घटनांचा साक्षीदार मी. माझ्या गाभाऱ्यात अखंड सप्तशतीपाठ होत असे. यज्ञ-याग ह्यांच्या धुराने सगळ्या वाईट शक्ती नष्ट होत असत. अखंड पारायणे, भजन, कीर्तने यांच्या ध्वनीने माझ्या कानांची तृप्ती होत असे. सतत चैतन्याने भरलेले वातावरण मंगलमय बनत असे. माझ्या प्रत्येक चिरेत पावित्र्य भिनलेले आहे. 


त्यामुळे मी म्हणजे संस्कारसंपन्न पवित्र वास्तू ! मंदिर गावापासून दूर; त्यामुळे दररोज येथे वर्दळ नसे. पण नवरात्रात मात्र धामधूम. अखंड नंदादीप, तोरण या सगळ्यांनी धार्मिक वातावरण अधिकच जागरूक बनायचे. आमच्या मूळ मालकानंतर तीन पिढ्यांनी माझी मनोभावे पूजा केली. सर्व प्रथा सांभाळल्यानंतर मात्र वंश खुंटला. 


देवळाबाबत वाद निर्माण झाले. कोणी वाली राहिला नाही. पुरातन असल्याने डागडुगी करणे आवश्यक होते. पण करणार कोण? यातच माझी हळूहळू दुर्दशा होऊ लागली. आता उरलेत केवळ माझे अवशेष! भग्न अवस्था!


रामायणकाळातल्या घटना पाहण्याचे भाग्य लाभलेले माझे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले. पारब्यांनी, घुबडांनी मला आपले वस्तीस्थान बनवले. हळूहळू जळमटे चढू लागली. धुळीचे थरच्या थर साचू लागले. हळूहळू माझ्या अस्तित्वाच्या खुणा नाहीशा व्हायला लागल्या. 


कालांतराने लोकांना माझा विसर पडला. त्या भागात कोणतीही सुधारणा न झाल्याने मुळातच वस्ती कमी असलेल्या भागात माझ्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली. माझी पुण्याई फळाला येईल का?


मला आशा आहे, कधीतरी कोणीतरी माझा जीर्णोद्वार करेल. पुन्हा उद्धार होऊन मी पूर्वीसारखाच दिमाखात उभा राहीन. पुन्हा मांगल्याचा, वेदमंत्रांचा उच्चार ऐकण्याची मला संधी मिळेल. मी अशी प्रार्थना करतो की, कोणातरी महात्म्याला सद्बुद्धी द्या आणि माझी वाट दाखवा.


                                                 "जो जो वांछील तो ते लाहो, 

प्राणिजात" या उक्तीप्रमाणे माझी ही जीर्णोद्धाराची इच्छा पूर्ण होवो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद