परदेशगमन मराठी निबंध | PARDESHGAMAN ESSAY IN MARATHI

 परदेशगमन मराठी निबंध | PARDESHGAMAN ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परदेशगमन मराठी निबंध बघणार आहोत. दुसऱ्या महायुध्दाच्या अगोदर भारतीयांना इंग्लंडचं आकर्षण वाटत होतं आणि इंग्लंडची वारी करणे हे भारतीयांना भूषणावह वाटत होतं. दुसऱ्या महायुध्दानंतर सगळं जगच उलटंपालटं झालं. 


अमेरिका महासत्ता बनली व इंग्लंड आपल्या पहिल्या स्थानावरून खाली घसरलं. भारतीयांना पदेशात जाण्याची ओढ अगोदरपासूनच होती. दुसऱ्या महायुध्दानंतर ती बळावली. भारतीय पैशासाठी आखाती देशात आणि पदवीसाठी अमेरिकेत जायला लागले. 


आज परत एकदा परिस्थिती पालटलीय. आखाती देशाचं आकर्षण कमी होऊन अमेरिकेत भारतीयांचे लोंढे जायला लागले आहेत. आणखी एक फरक हल्ली जाणवायला लागलाय. पूर्वी एखादी उच्च पदवी घ्यायची आणि भारतात परतायचं. तिथे मिळविलेल्या पदवीवर इकडे भरपूर पैसा कमवायचा हा प्रामुख्याने हेतू असायचा. 


England Returned या शब्दांना विशेष अर्थ होता, विशेष मान होता. आज Returned हा शब्द गळून पडलाय आणि अमेरिकेत जायचं आणि तिथेच स्थायिक व्हायचं, हा विचार लोक करायला लागले आहेत. त्यामुळे England Returned च्या ऐवजी NRI हा शब्द (Non Resident of India) आपलं जीवन व्यापून राहिला आहे.


असं परदेशात जाणं आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने हिताचं आहे काय ? जरूर आहे. परदेशात जरूर जावं, तिथलं ज्ञान घेऊन आपल्या बौध्दिक कक्षा रुंदाव्यात. ज्ञानाचं क्षेत्र आकाशासारखं विशाल विस्तारित करावं. पण त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या राष्ट्राला झाला पाहिजे. 


नवीन विचारांनी आपण प्रगती, समृध्दी साधावी. पण त्या ज्ञानामध्ये, माहितीमध्ये आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर इतकी भर घालावी, राष्ट्राला इतकं समर्थ करावं, की युरोपीय देशांनी ज्ञानासाठीपदवीसाठी भारतात यावं. परत एका नालंदा, तक्षशीला यांची स्थापना व्हावी. भारत ही जगाची पंढरी, काशी बनावी.


आपल्याला परदेशात जावं लागतंय याबद्दल आम्हाला खंत वाटावी आणि इतर देशाचे नागरिक आपल्याकडे शिक्षणासाठी येताहेत याबद्दल अभिमान वाटावा. उच्च शिक्षणाला आवश्यक असलेल्या या सुविधा आपल्याकडे नाहीत, अशी सर्वसाधारण तक्रार ऐकायला येते. 


सरकारला ही गोष्ट लाजिरवाणी आहे. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर शिक्षणाला आणि शिक्षणसंस्थांना जेवढं महत्त्व द्यायला हवं होतं तेवढं महत्त्व दिलं गेलं नाही. जेवढी त्यांची काळजी घ्यायला हवी होती तेवढी काळजी घेतली नाही. द्यायला हवं तेवढं लक्ष दिलं तर भारतीयांचा परदेशात जाणारा लोंढा थांबेल, अन्यथा नाही. 


प्रत्येक गोष्ट राष्ट्राच्या हितासाठी  प्रगतीसाठी आणि लोकांच्या सुखासमाधानासाठी करायची, असा चंग जर राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी बांधला तर फिरून एकदा ही भूमी सुवर्णभूमी होईल. 'डोक्याला वाव' आणि 'हातांना काम' हेच आपलं ब्रीद असायला हवं. 


आपण जे शिकलो त्याचा उपयोग प्रथम समाज  राष्ट्र यासाठी व्हायला हवा, मग स्वतःसाठी. वीर सावरकरांच्या पंक्ती आठवा. "गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे" ही भावना निर्माण झाली, असे निस्वार्थी समाजधार्जिणे आणि राष्ट्रप्रेमी नागरिक तयार झाले की परदेशगमन ही चिंतेची बाब रहाणार नाही. आज ती चिंतेची बाब झालीय. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद