परोपकारी आजी मराठी निबंध | Paropkari Aaji Essay In Marathi

  परोपकारी आजी मराठी निबंध | Paropkari Aaji Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  परोपकारी आजी मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या सोसायटीचे नाव एकता सोसायटी'. नावाप्रमाणेच आमच्या सोसायटीत एकता हे सूत्र आहे आणि त्यात आम्ही सारे बद्ध आहोत. सुरुवातीला मात्र कोणी कोणाच्यात मिसळत नसे. प्रत्येकाची दारे बंद असत. आपल्या शेजारी कोण राहते, हेही कित्येकांना माहीत नव्हते.


एक दिवस आमच्या सोसायटीत चोर शिरला. वेळ रात्रीची होती. प्रत्येक जण आपापल्या घरात बंदिस्त ! आरडाओरडा ऐकून प्रत्येकाने खिडक्यांची दारे किलकिली केली. एक आजी काठी घेऊन त्या चोराच्या मागे धावत होत्या आणि अगदी पार दरवाज्याच्या बाहेरपर्यंत त्यांनी त्याला नेऊन थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. आता मात्र प्रत्येकजण “काय झाले ? काय झाले ?” विचारत बाहेर आला.


नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, चेहऱ्यावर सुरकुत्या, तरीही करारीपणा, कमरेवर हात ठेवून बोलण्याची लकब, हातवारे व हावभाव केल्याशिवाय त्यांना बोलताच यायचे नाही. बोलण्यातही ठसका होता. आता या आजी प्रकाशझोतात आल्या. त्यांनी ओळख करून दिली. 


“मी गोदाआजी. बी-1 मध्ये राहते. अरे, आपण इथे राहायला आलोय त्याला सहा महिने झाले, कोणालाही कोणाशी ओळख करून घ्यावीशी नाही वाटली? अहो, आपण इथे वसतीगृहात का राहतोय? आज चोर आला; उद्या एखादा अतिरेकी येईल. आपल्यात एकजूट नको?" आजींनी तर त्या दिवशी सर्वांचा चांगलाच समाचार घेतला.


आजी आता सगळ्यांच्याच आजी झाल्या आहेत. त्यांना औषधांची खूप माहिती आहे. त्यांच्याजवळ आजीबाईचा बटवाच आहे. कोणाला काही दुखले-खुपले, की आजी औषध घेऊन हजर. नवीन लग्न झालेल्या मुलीला सुखी संसाराचा कानमंत्र देणार, 


नवनवीन पदार्थ शिकवणार; आणि कोणालाही कसलीही अडचण आली, की आजी हजर. आमच्या सोसायटीत तर त्यांनी एवढी झाडे लावली आहेत की बस ! त्यामुळे आज आमच्या सोसायटीचा परिसर अगदी वनश्रीने नटला आहे. अगदी प्रदूषणमुक्त सोसायटी! हरित सोसायटी!


लहान मुलांसाठी त्या संस्कार वर्ग घेतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम बसवतात. मुलांच्या स्पर्धा, अथर्वशीर्षपठन सगळे कसे नियोजनबद्ध. त्यांचा उत्साह तरुणालाही लाजवेल असाच आहे. कोजागिरी पौर्णिमा, आवळीभोजन, तुळशीचे लग्न, दिवाळी पहाट असे कितीतरी कार्यक्रम आज आमच्या सोसायटीत होतात. 


सर्व कुटुंबे आता एकच असल्यासारखी झालेली आहेत, त्याचे श्रेय गोदाआर्जीनाच द्यावे लागेल. गोदाआजी आता एकट्या नाहीत. साऱ्या सोसायटीतील सदस्यांचे त्यांच्याशी नाते जुळले आहे.


कोणाकडे कोणताही प्रसंग असो आनंदाचा की दु:खाचा-गोदाआजी मदतीला धावून येणारच. त्यांची निरपेक्षता पाहून खूप कौतुक वाटते. अशी परोपकाराची भावना त्या कोणत्या विश्वविद्यालयात शिकल्या? 


परोपकार करूनही त्याची जाणीव त्या कधीच करून देत नाहीत. 'परोपकार' हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. अशा या आभाळमाया असणाऱ्या गोदाआजी शतायुषी होवोत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद