पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

  पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  पाऊस पडला नाही तर  मराठी निबंध बघणार आहोत. ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले. सूर्य आग ओकू लागला. विहिरी, नदी, तळी सगळी आटली. पाण्यासाठी वणवण सुरू झाली. तहानेने जीव व्याकुळ झाला. 


पक्षी, प्राणी पाण्याच्या शोधात फिरू लागली. झाडे वाळली, जमिनीला भेगा पडल्या. जमिनीवरून चालताना पाय पोळत होते. डोक्यावर सूर्याची किरणे उष्णता ओकत होती. वाऱ्याची झुळूकदेखील नाही. कृत्रिम वारा... तोदेखील उष्ण. उकाड्याने जीव हैराण झालेला. पृथ्वीचा समतोल असा बिघडत का चाललाय, असा प्रश्न पडत होता. 


सर्व जण आकाशाकडे डोळे लावून बसलेले. पर्जन्याची कृपा व्हावी म्हणून मनोमन प्रार्थना सुरू झाली. ___ आता प्रार्थना करून काय उपयोग? पाऊस पडावा असे तर वाटते; पण केव्हा? जेव्हा जीव हैराण होतो, जगणे मुश्किल होते, तेव्हा. 


अहो, पाणी म्हणजेच जीवन. ह्या पाण्यासाठी वणवण करावी लागली, की त्याचे महत्त्व वाटते. मानवाने निसर्गावर मात करण्यासाठी उन्मत्तपणा केला.स्वार्थासाठी निसर्गाचा वाटेल तसा उपयोग केला. वृक्षतोड केली - जळण, बांधकाम, फर्निचर यासाठी. हिरवी माया आपणच कमी केली. 


थंडगार सावली आपणच दूर लोटली. धूप वाढून जमिनीचा कस कमी झाला. जमिनी रेताड बनल्या. डोंगर कापून तेथे घरे बांधली, समुद्र हटवून शहरांची वाढ केली नि सिमेंटच्या जंगलात माणुसकी हरवलेला प्राणी वावरू लागला.


पाऊस येणार कसा? जर आलाच तर तो महाभयंकर तांडव नृत्य करतो. कधी पूर येतो; तर कधी दुष्काळ. कसलाच भरवसा नाही. माणसाप्रमाणेच निसर्गदेखील लहरी बनलाय. आता प्रश्न आहे - पाऊस पडलाच नाही तर....विनाश, फक्त विनाश. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. 


या सर्व गरजा भागण्यासाठी हवे पाणी. पाणी काही कृत्रिमरित्या बनवता येत नाही. पाणीसाठा होतो, तो पावसामुळे. पाऊसच नाही पडला, तर पाणीसाठा होणार कोठून ? पावसाळ्यात धरणे, बंधारे, विहिरी यांच्यात साठलेले पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त असलेले आठ महिने पुरते. 



पण पाऊसच नाही आला, तर पाणी साठणार कोठून? पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी पाणी लागते. हे पाणीच नसेल तर.... तहानेने, भुकेने व्याकुळ होऊन प्राण कंठाशी येणारच ना? जीव वाचला तर, सगळे. घराच्या भिंती, घरातील सोने तेव्हा कुचकामाचे ठरतील. 


घरात खूप संपत्ती आहे; पण पाणीच नसेल तर. शहारलात ना या विचाराने? पाऊस पडला नाही तर...! कल्पनाच नाही ना करवत ? साऱ्या सृष्टीचा विनाश.


"ये रे ये रे पावसा,

तुला देतो पैसा... 

“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" 


अशी छोट्यांची बडबड गीते उगीच नाही लिहिली गेली. अहो, पाऊस नाही आला तर... तहानलेली धरा, तिचे व्याकुळलेले डोळे, तिचे हिरवे भंगलेले स्वप्न पाहावे लागेल. केतकी, सोनचाफा यांचे कांचनवैभव मिळेल पाहायला? इंद्रधनुष्याचे सात रंग मिळतील पाहायला ? श्रावणसरीत चिंब होण्याची मजा येईल लुटता ? 



पंचमीला लटकणारे फांदीवरचे हिंदोळे दिसतील तुम्हाला? अंगणात बहरलेला परिजात, त्याची ती मोत्या-पोवळ्याची दौलत येईल लुटता? आळवला जाणारा तो सप्तस्वरातील मल्हार मिळेल ऐकायला? जलधारांनी सचैल न्हाऊन निघणारी, हिरवा शालू नेसून अन्न ब्रह्माच्या पुजेसाठी सज्ज झालेली धरणीमाता मिळेल पाहायला? 


सप्तरंगांचा पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर मिळेल पाहायला? धरतीच्या कुपीतून घमघमणारा मृदगंध मिळेल अनुभवायला? कातर आभाळमाया ओली होते नि मेघदूताची वेडी आठवण यक्षाच्या मनात जागी होते. तेव्हा जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा हा पाऊस जर आलाच नाही तर...? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद