फेरीवाल्याचे मनोगत मराठी निबंध | phereevalyache manogat Marathi Nibandh

 फेरीवाल्याचे मनोगत मराठी निबंध | phereevalyache manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  फेरीवाल्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. 'मी' म्हणजे नेमके माझे नाव सांगून ओळख करून देऊ की, मी जे काम करतो, त्या कामाने? नावात काय असते म्हणा! मी काही कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही की, समाजात मोठे स्थान मिळविलेला माणूसही नाही. 


फक्त एक प्रामाणिक, कष्ट करणारा फेरीवाला आहे. मी अधून-मधून तुमच्या चाळीत गृहोपयोगी वस्तूंची विक्री करण्यासाठी येत असतो. आता पटली का ओळख? माझे स्वत:चे असे दुकान नाही. आणि हो, दुकान घेण्याची माझी ऐपतदेखील नाही. 


अगदी सामान्य कुटुंबात जन्म झालेला मी एक गरीब माणूस. आला दिवस पार पडला, की झाले. उद्याची चिंता करून तरी काय उपयोग? तोच कर्ता करविता. शिक्षण जेमतेम एस. एस. सी पर्यंत. पुढे शिकविण्याची पालकांची ऐपत नाही आणि उच्च शिक्षण मला झेपत नाही. 


नोकरी मिळण्याची शक्यता नाही. कुठेतरी तुटपुंज्या पगारात दिवसदिवस राबायचे, नि बांधिलकी ....! म्हणून मी विचार केला, छोट्या-छोट्या वस्तू आणून दारोदार जाऊन विकायच्या. त्यामुळे मला खऱ्या समाजाचे दर्शन होते.


मला आठवतेय, मी शाळेत असताना आमच्या शाळेत स्वावलंबन योजना होती. दिवाळीत उटणे, तेल, साबण, मेणबत्त्या, पणत्या, फटाके यांची विक्री करायची. जेवढी विक्री होईल, त्याप्रमाणे फायदा मिळे. स्वत:चे भांडवल न घालता सुटीच्या काळात काम करण्याची संधी मी कधीच सोडत नसे. तो अनुभव चांगला होता. 


मुळात मी बोलबच्चन आहे. मी कधीच कोणाशी फटकून वागत नाही. कोणी रागावले, तरी मी ते मुकाट्याने सहन करतो. माझ्यापाशी धीर धरण्याची वृत्ती आहे. आता माझेच मी आत्मपरीक्षण करतो. एकंदर आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतो. वाटले, पोटासाठी काहीतरी करावे. ते गरजेचे आहे. 


मग मी छोट्या-मोठ्या वस्तू दारोदार विकण्याचा व्यवसाय सुरू केला. घरातून भांडवल मिळणार नाही. कारण, कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची. ठीक आहे. आजकाल प्रत्येक घरातील स्त्रिया नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना घरबसल्या खरेदी करायला आवडते. ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन मी फेरीवाला व्हायचे ठरविले.


मी वयाच्या १६व्या वर्षापासूनच या व्यवसायाला सुरुवात केली. प्रथम मी मसाले, पापड, कुरड्या, शेवया असे पदार्थ विकायचो. पण वर्षभर हा व्यवसाय करता येत नाही. मग आहे त्या वस्तू विकायच्या. ह्यातून माझ्यावरचा लोकांचा विश्वास वाढला. एक प्रकारचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. 


असेच एक दिवस एका गृहस्थाने मला गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीचा सल्ला दिला. ते गृहस्थ म्हणाले, “हे बघ, तुझ्यापाशी उत्तम विक्री करण्याची हातोटी आहे. शिवाय, तुझ्यावर लोकांचा विश्वासदेखील आहे. तेव्हा तू हा व्यवसाय सुरू कर. भांडवलाचा प्रश्न मी सोडवतो.


मी तुला माझ्याच कारखान्यात बनणाऱ्या वस्तू देईन. त्यासाठी तू तारण वगैरे काहीही देऊ नकोस. तुझ्यावरचा माझा विश्वास आणि माझ्यावरचा तुझा विश्वास, हेच भांडवल. हेच तारण. तुला चांगला फायदा मिळेल." आणि माझ्या आयुष्यातील माझ्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला.


मी तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल २० वर्षे फेरीवाला म्हणून काम करत आहे. वाईट अनुभवही येतात. काही काही घरातील लोक तोंडावर दार बंद करतात. काही जण भिकाऱ्याला हाकलून दिल्यासारखे हाकलून देतात. काय आणलेय, ते बघतसुद्धा नाहीत, तर समजून घेणे दूरच ! असो, पण त्याउलट खूप चांगली माणसेसुद्धा भेटतात. 


काही घरांशी चांगले संबंध, चांगली ओळख झाली आहे. काहीजण छोटीशी का होईना, वस्तू केवळ मी रिकाम्या हाताने परत जाऊ नये म्हणून देखील घेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच ना? कोणताही व्यवसाय करताना आपल्याला समाजाकडूनच मदतीचा हात मिळावा लागतो. 


दोघांनाही गरज असते. तरीही विक्रेत्याला जास्त गरज असते. कारण, त्याला चार पैसे मिळाले, तरच त्याचा चरितार्थ चालणार असतो. तेव्हा मला तरी माझे ग्राहक हेच माझे परमेश्वर वाटतात. त्यांच्या रूपातच मला परमेश्वर भेटतो. कारण भगवंतांनी आश्वासन दिले आहे


                                                  “योगक्षेमम् वहाम्यहम्।”

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद