संतांची थोरवी मराठी निबंध | Santanchi Thorvi essay in marathi

संतांची थोरवी मराठी निबंध | Santanchi Thorvi essay in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संतांची थोरवी मराठी निबंध बघणार आहोत. तेराव्या शतकापासून महाराष्ट्र हा अस्मानी व सुलतानी आघातांनी अधिकाधिक जर्जर होत होता. अशा वेळी संतांनी लोकांना समता, बंधुभाव याची शिकवण दिली. अनिष्ट प्रथांवर प्रहार करून समाजाला मानवतेची शिकवण दिली.


सर्वसामान्य प्रापंचिक माणसांनी साध्या, सोप्या नामस्मरणाच्या मार्गाचा अवलंब करून परमार्थ साधता यावा. यासाठी वारकरी संप्रदाय' स्थापन झाला. भक्तीच्या क्षेत्रात कुल, वर्ण यांना गौण स्थान आहे; तर भक्तिभाव महत्त्वाचा आहे, हे संतांनी सांगितले. तसेच कर्मकांड करून भक्ती करण्याची गरज नाही, 


आपण कोणत्याही दैवताची उपासना करू शकतो, असा दिलासा संतांनी दिला. संत जनाबाईंच्या अंत:करणात दासीपणाचे दुःख होते. ते दुःख त्यांनी आपल्या अभंगांतून मांडले. सामाजिक विषमतेची दाहकता चोखोबांच्या मनात होती. ती त्यांनी आपल्या शब्दांत व्यक्त केली आणि आईच्या वात्सल्याने विठूमाउली सर्वांना जवळ घेते, असा दिलासा दिला.


संतांनी आपल्या सर्वच प्रकारच्या लेखनातून दुर्गुणांवर प्रहार केला आणि सद्गुणांची जोपासना करण्याचा आग्रह केला. समाजजीवन दु:खमय नव्हे; तर आनंदमय व्हावयाचे असेल, तर प्रत्येकाच्या मनात सद्विचारांची स्थापना व्हायला हवी. याचसाठी संतांनी आपल्या वाङ्मयात संतवचने दिली आहेत.


जे का रंजले गांजले। 

त्यांसि म्हणे जो आपुले। 

तोचि साधु ओळखावा। 

देव तेथेचि जाणावा॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरी सज्जना नीववावे। 

अशा प्रकारे अशी संतवचने उद्याच्या पिढीसमोर ठेवणे, हे विचारवंतांचे काम आहे.


“काय वानू मी संतांचे उपकार।

-मज निरंतर जागवीती। 


संत तुकारामांनी सर्वसामान्य माणसाला भक्तिभाव शिकविला. त्यासाठी त्यांनी आसपासच्या जीवनातील प्रसंगचित्रे, खेड्यांतील विविध खेळांचे रूपकात्मक उपयोग करून समाजाला दिलासा दिला.संत तुकारामांनी कर्मठ लोकांवर परखडपणे हल्ला चढविला. समाजातील दोषांवर टीका केली. त्यातून भरकटलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.


संत रामदासस्वामींनी मनाचे श्लोक' लिहिले. 'दासबोधा'तून बोध केला. शरीरयष्टी उत्तम राखण्याचा सल्ला दिला. त्यासाठी बलोपासना सांगितली. अकरा मारुतींची स्थापना केली. नामस्मरण सर्वात सहजपणे करता येण्यासारखी भक्ती आहे, हे पटवून दिले.


चालता-बोलता धंदा करिता। 

खाता जेविता सुखी होता।

नाना उपभोग भोगिता। 

नाम विसरो नये॥ 


संत नामदेवांनी भागवतधर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवली. संत ज्ञानदेवांनी भागवतधर्माच्या मंदिराचा पाया रचला; तर त्यावर कळस चढविला संत तुकारामांनी. संत एकनाथांनी भारूडे, पदे, आरत्या या माध्यमातून सर्वसामान्यांना उपदेश केला.


अशा प्रकारे संतांनी समाजाचे प्रबोधन केले, समाजाला योग्य दिशा दाखविली आणि समाजाचे खऱ्या अर्थाने गुरू बनले. यातच संतांची थोरवी आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद