तहान, भूक नसेल तर मराठी निबंध | THAN BHOOK NASEL TR ESSAY IN MARATHI

तहान, भूक नसेल तर मराठी निबंध | THAN BHOOK NASEL TR ESSAY IN MARATHI


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण तहान, भूक नसेल तर मराठी निबंध बघणार आहोत. पोट भरण्यासाठी माणसाला अनेक खटपटी कराव्या लागतात. मनुष्यच नाही; तर प्राणी, पक्षी म्हणजे सगळी सजीव सृष्टी पोटापाण्यासाठी धडपड करताना दिसते. 


जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तहान-भूक लागतेच. आज खाल्ले, तरी उद्या खावेच लागते. एवढेच काय, तिन्ही त्रिकाळ तहान-भूक लागतेच. ही तहान-भूक भागवण्यासाठी मनुष्य कष्ट करतो. त्यासाठी त्याला हवा असतो रोजगार. बेकारी वाढल्याने रोजगार मिळत नाही. 


रोजगार नाही मिळाला, तरी तहान-भूक ही लागणारच. ती भागविण्यासाठी वाममार्गाचा अवलंब होतो. सर्व वाममार्गांचे, गुन्ह्यांचे मूळ भुकेमध्ये आहे. माणसाची मूलभूत गरजच नाही, भागली तर तो गुन्हा करण्यास प्रवृत्त होणारच ना ! अशा वेळी त्या व्यक्तीला समजून न घेता त्याच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.


कधी-कधी तर कारखाने बंद पडतात. त्यात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटीच हिरावली जाते. घरातील कच्ची-बच्ची खाणार काय? जिवंत राहण्यासाठी खाल्ले तर पाहिजेच. दोन वेळची भाकरी म्हणजे चैन नक्कीच नाही. ती गरज आहे. दुष्काळ पडतो, तेव्हा गावाच्या गावे उद्ध्वस्त होतात आणि भूकबळी पडतात. 


प्राणिमात्रांतदेखील अन्नसाखळी आहे. 'जीवो जीवस्य जीवनम्' या न्यायाप्रमाणे लहान माशाला मोठा मासा खातो. भूक लागली असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे विकृती आणि भूक असतानाही आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती ! म्हणूनच आपल्या संस्कृतीत 'अतिथी देवो भव' असे म्हणतात.


आलेल्या पाहुण्याला घासभर तरी वाढावे, असा संकेत आहे. सर्वांचा जठराग्नी शांत व्हावा, यासाठी अन्नाची आहुती द्यावी लागते.'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।' आपल्या संस्कृतीत दानाला फार महत्त्व आहे. दानात दान अन्नदान हे श्रेष्ठ दानमानतात; कारण तृप्त होऊन येणारी ढेकर समाधानाची पोचपावती असते. तो यजमानाला मिळणारा आशीर्वाद असतो. 


अशी ही भूक, अशी ही तहान जर नसेल तर काय सारेच प्रश्न निकालात निघतील. पोटापाण्यासाठी काही करायलाच नको. मूलभूत गरजच नाहीशी झाली, तर खटपट नको की धडपड नको. घरातील स्वयंपाकघरे नकोत की हॉटेल्स् नकोत. 


पाककलानिपुण महिलाही नकोत. पाककलेवरचे दूरदर्शन कार्यक्रम नकोत की पाककलेवरचे ग्रंथ नकोत. सकाळी उठल्यापासून स्वयंपाक घरातील वास्तव्य नको की खाल्लेले पचवण्यासाठी शतपावली नको की व्यायाम नको.


एवढंच काय, डॉक्टर नकोत. की दवाखाने.“सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः।" कसे शक्य आहे ही गोष्ट? खाऊन-पिऊन मस्त राहू, स्वस्थ राहू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद