विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh

 विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञानाची प्रगती मराठी निबंध बघणार आहोत. आजचे युग विज्ञानयुग मानले जाते. विविध शोध लागत आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने एक प्रकारची क्रांती केलेली आहे. विज्ञानाची घोडदौड सुरूच आहे.


विजेचा शोध हा सगळ्यात महत्त्वपूर्ण शोध आहे. हा शोध म्हणजे विज्ञानाची मोठी देणगी आहे. आज स्वयंपाकघरातील उपकरणांपासून ते मोठमोठ्या कारखान्यांतील सर्व यंत्रे विजेच्या साहाय्याने चालतात. 


विजेचा शोध म्हणजे आजच्या युगातील कल्पवृक्षच बनला आहे. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपल्यावरसुद्धा विद्युत्-सेवा चालूच असते.दळणवळणाची साधने शोधून काढून विज्ञानाने जग एकदम छोटे बनवून टाकले. रेल्वे, मोटार, हवाई जहाज, जलयान या साधनांच्या योगे आज आपण शेकडो मैलांची यात्रा बघता-बघता पूर्ण करू शकतो. 


जगातील कोठेही घडलेली कोणतीही घटना वैज्ञानिक शोधांमुळे काही सेकंदांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते. संदेशवहनासंबंधीची प्रभावी प्रचार-प्रसारमाध्यमे खरोखरीच आश्चर्यकारक आहेत. तारेच्या साहाय्याने, टेलिफोन, टेलिफॅक्स, वायरलेस यांच्या माध्यमातून कोणत्याही कोपऱ्यातील देशात आपण समाचार पाठवू शकतो. 


भ्रमणध्वनीमुळे आज जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो.मनोरंजनाचे क्षेत्र घ्या. याही क्षेत्रातील विज्ञानाची घोडदौड सुरूच आहे. रेडिओपासून दूरदर्शन संचापर्यंत अनेक साधने बाजारात मानवाच्या करमणुकीसाठी हजर आहेत. 


सिनेमा हीदेखील विज्ञानाची अद्भुत देणगी आहे. संगणक म्हणजे आज बहुउपयोगी बनला आहे. आज संगणकाशिवाय आमचे पानही हलत नाही. स्मृतींचा खजिना असल्याने संगणक सामान्य व्यक्तींच्या जीवनात वरदान ठरला आहे. 


आज संगणक घरा-घरांत पोहोचला आहे.वैद्यकीय क्षेत्रातही संगणक उपयुक्त ठरत आहे. सोनोग्राफी, एक्स-रे यांच्या साहाय्याने शरीरातील अंतर्भागाची तपासणी शक्य झाली आहे. विज्ञानामुळे अनेक असाध्य रोगांवर मात करता येऊ लागली आहे. 


विज्ञानाने मानवी जीवनात क्रांती घडविली आहे. कृषिक्षेत्रातही नवे-नवे प्रयोग होत आहेत. नांगर, ट्रॅक्टर, कटाई यंत्र, धान्य कणसांतून काढून पोती भरणे, हे सर्व यंत्रांच्या साहाय्याने घडते. 'घंटों का काम मिनिटों में ही किमया घडविणारे विज्ञान वेगाने घोडदौड करीत आहे. रोज नवे यंत्र तयार होत आहे. 


धरतीची उत्पादनक्षमता वाढवून हरितक्रांती साधली आहे. ज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी अत्याधुनिक छपाई यंत्रे निर्माण झाली आहेत. वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी सज्ज होतात. _विज्ञानाने भूमीप्रमाणेच सागर व अवकाश यांवरही विजय मिळविला आहे. 


तो चंद्रावर पाऊल ठेवून गप्प बसलेला नाही; तर अन्य ग्रहांवरही पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी वांझ असलेल्या जमिनीवर आज फुलबागा फुलत आहेत. क्लोनच्या प्रयोगातून मनुष्य विश्वनिर्मितीलाच आव्हान देत आहे. विज्ञानाने मानवी सुखासाठी केलेली घोडदौड प्रगतीसाठी नक्कीच लाभदायक आहे.


पण त्याचबरोबर मानवाने संहारक अस्त्रेदेखील बनविली आहेत. परमाणु-बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, तर बनवले आहेतच;मनुष्यमात्राला नामशेष करणारा विषारी गॅसही शोधून काढला आहे. त्यामुळे आमची संस्कृती, मानवजात, आमची सभ्यता यांना वाढता धोका निर्माण झाला आहे.


विज्ञानाची घोडदौड वरदान जशी आहे, तशीच ती मानवजातीसाठी शाप-देखील ठरू शकते. तेव्हा प्रश्न असा आहे की, विज्ञानाचा म्हणजेच परमाणू शक्तीचा उपयोग मनुष्याच्या हितासाठी करायचा की विनाशासाठी? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद