वृद्ध कलाकाराचे मनोगत मराठी निबंध | vrudha Kalakarche manogat in marathi nibandh

 वृद्धाच कलाकाराचे मनोगत मराठी निबंध | Vrudh  kalakarche manogat in marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वृद्धाच कलाकाराचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. रसिक मायबापहो, नमस्कार! तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलंत. मला त्या त्या भूमिकेत स्वीकारलंत. मला पसंतीची पावती दिलीत. 


रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानांत घुमतोय. रसिकहो, तुम्ही दाद दिलीत म्हणूनच मी माझी कला तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. धन्यवाद रसिकहो! खूप खूप प्रेम केलंत माझ्यावर तुम्ही ! इतकं दिलंत; इतकं दिलंत तुम्ही मला! खरं सांगतो, कलाकार केलंत तुम्ही मला! रंगमंचावरील प्रत्येक भूमिकेसाठी तुमचं प्रेम सरी झाल्या,


मला शोधीत घरी आल्या! मला प्रत्येक प्रयोग आठवतोय. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल व्हायचा. तुम्ही समोर असलात, की माझ्यातली ती भूमिका जिवंत व्हायची. माझ्या पल्लेदार वाक्यांना हमखास टाळ्या पडायच्या. त्या टाळ्या, ती दाद, हीच आमची शक्ती होती. 


माझ्यातला कलाकार दिवसेंदिवस बाळसेदार बनू लागला. नवीन-नवीन भूमिका स्वीकारताना ह्याच सशक्तपणाने माझ्यातील आत्मविश्वास वाढविला. पूर्वी एखादी भूमिका साकारायची म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागायची. रात्र-रात्र तालमी चालायच्या. 


भूमिकेतील बारकावे आत्मसात करण्यासाठी खूप निरीक्षण, अभ्यास करावा लागायचा. तेव्हा दूरदर्शनवर विविध वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे प्रसिद्धी मिळायला वेळ लागायचा. तेव्हाची नाटकं, तेव्हाचे नाटककार सशक्त असायचे. त्यांनी लिहिलेले संवाद आत्मसात करण्यासाठी वेळ लागायचा. 


नाटकांचे विषय पण जबरदस्त असायचे. नाटकाचे प्रयोगदेखील शंभरी गाठायचे. प्रेक्षकांची वानवा नव्हती. प्रेक्षकही जाणकार असायचे. पुढे-पुढे गल्लेभरू नाटकांचा जमाना आला. रंगमंचाचा सगळा चेहरा-मोहराच बदलू लागला. पैशाभोवती दुनिया फिरू लागली.


दूरदर्शन-मालिका सुरू झाल्या. छोट्या पडद्याचं आकर्षण वाढलं.चटकन प्रसिद्धी मिळू लागली. नाटक मंडळी बदलली. नवनवीन संस्था निर्माण झाल्या, कोणतीच संस्था दीर्घजीवी नाही. अशात काम मिळणं कठीण झालं. दुय्यम भूमिका करून अर्थार्जनही नाही नि समाधानही नाही.


एकेकाळचा सृजनशील, प्रतिभावंत कलाकार मी; पण माझ्या आयुष्यात वैफल्याचे, निराशेचे क्षण अनेक वेळा येऊ लागले. ज्या रंगदेवतेची ईमाने-इतबारे सेवा केली, ती रंगदेवता आता पाठ फिरवू लागली. आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला व्हावा यासाठी प्रयत्न करू लागलो. पण कोणालाही आता त्याची गरज राहिलेली नाही. 


आपण हे सगळं कुणासाठी करत आहोत? कशासाठी करत आहोत ? कुणाला आपल्या कलेची किंमत आहे का? आपल्या नवनिर्मितीची किंमत आहे का? कोण पर्वा करतो कलावंताच्या आयुष्याची? आपल्या प्रतिभेचे सर्वस्व' देणाऱ्या निष्ठावंताला दारिद्र्य भोगायला लागणं, उपेक्षा त्याच्या पदरी येणं, 


ही एक शोकांतिका आहे. "इन द एंड ही बिकेम अ मॅड." प्रतिभावंत भ्रमिष्ट होतो. त्याचं आभाळ निराधार होतं. खरंच वाटू लागलंय की, आयुष्यात आपण नेमकं कशासाठी जगत असतो? जगताना जे काही मिळत असतं, ते आपल्याला हवंच असतं का? काही नवीन घडावं, असं वाटतं का? असल्या आणि तसल्या प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत चाललो आहे.


रसिकहो! ज्या रंगभूमीसाठी मी माझं सर्वस्व दिलं, त्या रंगभूमीने माझ्याकडे पाठ .. फिरवावी? कसं सहन करू? आज माझ्याजवळ त्या काळच्या आठवणींशिवाय काहीच नाही. तेव्हा कलाकार कधीच पैशानं श्रीमंत नव्हता. आज गाठीशी काही नाही. नुसतं अनुभवांचं गाठोडं पाठीशी आहे. पण ते गाठोडं म्हणजे आता नुसतं चिंध्यांनी भरलेलंअडगळीसारखं!


आजवर रसिकांसाठी ही काया झिजविली घाव सोसुनिया मने रिझविली॥ अभिनयाचे सुख मी लुटले तल्लीनतेने डोळे मी मिटले। उडुनिच गेला आयुष्याचा रंग आशाच आता पावल्यात भंग। होय, अशी माझी ही करुण कहाणी. कुणापुढे करू माझी चर्या दीनवाणी? तारुण्याच्या मस्तीत विसरलोच होतो, 


भविष्यात मी वृद्ध होणार आहे. नाट्यसंसार केला घाईघाई अन् आता म्हातारपणाला काही नाही. असो."नवकलाकारांनी माझ्या या सांगण्यातून काही शिकावे एवढीच अपेक्षा."मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद