वृक्ष नष्ट झाले तर मराठी निबंध | Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh

वृक्ष नष्ट झाले तर  मराठी निबंध | Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष नष्ट झाले तर  मराठी निबंध बघणार आहोत. “वृक्ष नष्ट झाले तर ...। कोसळणार नाही मुसळधार पाऊस..... ऐकू येणार नाही सागराची गाज...... गाणार नाही राती सळसळणारे पान..... मोहविणार नाही पलाशफुलांची लाली..... सुखविणार नाही उडत्या पाखरांची शीळ .. आटून जाईल धावत्या निर्झराची खळखळ.....


हरवून जाईल सुंदर कुसुमांचा परिमल दिसणार नाही हरित-श्यामल सृष्टीचं देखणं रूप.असहय होईल जगणे अन्नपाण्याविना........." वृक्ष नष्ट झाले तर! नुसत्या कल्पनेनेच पोटात भीतीचा गोळा उठतो. 


जणू श्वासांचे स्पंदन तुटण्याची वेळ! आज वृक्ष आहे म्हणूनच पृथ्वीतलावर मनुष्य , पशु, पक्षी, फुले यांचं जीवन शक्य आहे ! उजाड जीवन धरतीच्या हिरव्यागार कुशीत समृद्ध होते.वृक्षच नष्ट झाले तर अन्नधान्य , फुले, फळे, पिके यांच्याविना सारी धरती उजाड माळरान बनेल. 


निसर्गाचे चक्र सुरळित फिरण्यासाठी वृक्षांची नितांत गरज आहे. झाडे नसतील तर पाऊसही पडणार नाही.एकंदरित सर्वांचे जीवन धोक्यात सापडेल.प्रदूषणामुळे आधीच पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल बिघडला आहे. 


ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईडचे हवेतील प्रमाण वाढले आहे. बेकायदेशीरपणे जंगलतोड होत असल्याने पर्यावरण रूसले आहे.पाऊस पुरेसा नसल्याने धरती उजाड होत आहे.वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण, 'झाडे जगवा' यातून प्रयत्न होत आहेत. 


पण प्रत्येक व्यक्तीने वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धानाकडेही लक्ष पुरविले पाहिजे. वृक्ष लावण्याइतकेच ते जगवणे आवश्यक आहे.पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.वृक्षांची झुळुक, सावली हा त्यावरचा दिलासा आहे. जास्तीत जास्त झाडे लावलीत तर पर्यावरण सुधारेल. 


प्रदूषण कमी होईल. एकंदरित आहेत त्यापेक्षा अधिकाधिक झाडे लावण्याचे दिवस असतांना वृक्ष नष्ट झाले तर.... बापरे! कसली अभद्र कल्पना! खलील जिब्रान म्हणतात“वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भूर्जपत्रावर लिहिलेली काव्ये होत." असं सुंदर काव्यच लुप्त झाले तर जीवन नीरस बनेल.पांथस्थांना विसावा


घ्यायला वृक्षांची सावली मिळणार नाही. फुलांचा सुगंध व मधुर फळांचा आस्वाद ही फक्त स्वप्ने ठरतील.पाऊस व अन्नधान्य नाही तर जीवनच नाही. वराहपुराण सांगते

"यावत् भूमंडलं धत्ते

सशैलवंन काननम् ।

 तावत तिष्ठन्ति मेदिन्याम

संततिः पुत्र पौतृकी!” 

मानवी अस्तित्व हे निसर्गाच्या समतोलावर - वृक्षांवर अवलंबून आहे.५ जून 'जागतिक पर्यावरणदिन' आणि २२ एप्रिल 'वसुंधरा दिन' म्हणून नुसते साजरे करून काम होणार नाही. तर 'झाडे लावा- झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे प्रत्येक घरात निर्माण झाले तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे दिवस साकारतील.


एकूण भू-पृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८% एवढेच आहे. कर्नाटकची विरप्पन चंदन तस्करी सर्वांना माहीत आहे. 'हरितश्यामल वसुधा-निर्मल वसुधा' हे प्रत्येकाचे स्वप्न हवे. निसर्गासारखा पाठिराखा नाही.समाजशिक्षण व समाजप्रबोधन याद्वारे वसुधेचं खरं संरक्षण शक्य आहे. नियोजन व प्रयत्न यांची जरूरी आहे.


वृक्ष हे परोपकारी जीवन जगतात.त्यांना नष्ट करून आपल्याच पायावर कु-हाड मारून घेण्याचा मूर्खपणा नको.कारण वसुंधरा म्हणते"माझ्या संरक्षणात तुमचं ही संरक्षण आहे. माझं हिरवगार मोहक रूप बघून यायची सवय पावसाला झालीय. 


वृक्षांच्या लांब बाहूंनी मी त्याला कवेत घेते म्हणून...... जंगलतोडीत तुम्ही माझे वृक्षांचे हातच कापलेत तर...... बिघडलेल्या पर्यावरणात भोगत बसावा लागेल तुम्हाला मग अठ्ठावीस वर्षांचा वनवास , चक्रवाढ व्याजाच्या दरानं!" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद