यत्न तो देव जाणावा मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI

 यत्न तो देव जाणावा मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण यत्न तो देव जाणावा मराठी निबंध बघणार आहोत. असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. 'कर्म' हीच खरी मानवाची ओळख होय. तो जे कर्म करतो, जसे करता , तसे त्याचे जीवन बनते . जीवनात संकटे, अडचणी, प्रश्न सारे आहेतच. पण हार न मानता प्रयत्नपूर्वक जीवनपथ चालायचा आहे. 


आपले प्रयत्न हीच आपल्या देवाची उपासना आहे. त्यातूनच आपले ध्येय, आपली महत्वाकांक्षा साकारणार आहे. "प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक वस्तूवर विजय मिळवू शकते.'' असे होमर यांनी म्हटलेच आहे. गतीतून प्रगती हवी असेल तर प्रयत्न हवेत. 


जीवनात जे ध्येय आपण ठरविले आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतांना येणाऱ्या संकटाची,अडचणीची तमा न बाळगता प्रखर अशी झुंज देत जीवनाला सामोरे जाणे सोपे नाही. मानवसेवेचे व्रत घेतलेले डॉ.शरदकुमार दीक्षित स्वतः अपंग आहेत. 


दोनदा त्यांची बायपास सर्जरी झालेली असून कॅन्सरही आहे. या सर्वांवर सिंहाच्या छातीने मात करून त्यांनी दरवर्षी भारतात चार महिने मोफत फ्लास्टीक सर्जरी करून देण्याचे व्रत घेतले आहे. 


स्वआरोग्य प्रश्नचिन्ह बनून समोर ठाकले तरी प्रयत्नाची कास न सोडता मानवसेवेचे ध्येय पूर्ण करणारा हा महामानव! प्रचंड जिद्द आणि चिकाटी यातून प्रयत्नांचा जन्म होत असतो. जीवनात काहीही सहज मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.


“उद्यमेन हि सिध्दयन्ति, कार्याणि न मनोरथैः

न हि सुप्तस्य सिंहस्य, प्रविशन्ति मुखै मृगः" 


कार्ये उद्योगानेच (प्रयत्नानेच) सिध्दीला जातात. मनोरथांनी नव्हे. झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिण येऊन प्रवेश करत नाही. 'प्रयत्नावाचून प्रारब्ध लंगडे' असे म्हणतात. प्रयत्न करायचे नाही आणि दोष प्रारब्धाला देणे योग्य नाही. आपल्या हृदयानं, आपल्या दोन्ही हातानं भरभरून काम करा. योग्य दिशेने वाटचाल करा मग यश निश्चित मिळते.


'प्रयत्ने एक बीज लाववे

फळ पावावे कणसापरी।' 


एक दाणा हजार दाणे घेऊन येतो तो उगाच नाही. प्रयत्नांच्या घामाचे मोती त्या मातीत पडतात म्हणूनच! "प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे." अस विनोबा भावे म्हणतात. “जिथे राबती हात ,तेथे हरी" ही सर्व विधाने एकच सांगतात "काम करा" प्रयत्न करा. आनंद फुलवा. संकटावर मात करा. 


अपयशाने खचू नका. परत प्रयत्न करा.यश नक्की मिळेल. जीवन अमोल आहे वेळ दवडू नका. क्षणाक्षणाचे सोने करा व आनंद लुटा आळस करू नका. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. स्वतः धडपड करा. स्वतःचे जीवन अधिक उदात्त, मंगलमय व परिपूर्ण करा.


"जो अंधाराला भिऊन पळतो,

सूर्य त्यांच्यासाठी नसतो." 


असं कुसुमाग्रजांनी सांगितलंय....दोन घडीच्या या जीवनाच्या डावात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही. मरणाला सामोरे जाऊनही चक्रव्यूहात प्रवेश करणे व चक्रव्यूहातून विजयी परतण्याची धडपड करणे या अभिमन्यूच्या प्रयत्नांनी त्याला अजरामर केले. संत गाडगेबाबा, मदर तेरेसा, बाबा आमटे यांनी जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन सोने झाले.


काय जगावे जगतापाठी नुसते कुजण्यासाठी ..... देव्हारा व्हा, देवमूर्ती व्हा येऊनि जगतापाठी! कलावंत असो, शास्त्रज्ञ असो, संत असो वा समाजसुधारक असो सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे म्हणून ते अमर आहेत. थोर नेते, देशभक्त यांचे जीवन याची साक्ष देतात.


जंगलात हरवलेली व्यक्ती रडत एकाच जागी बसून राहिली, रस्ता शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तर काय होईल? हीच बाब जीवनात पदोपदी प्रत्ययास येते.


जीवनाच्या नभी प्रयत्नांचा चंद्र आला सुखाच्या कोजागिरीत यशाने आकंठ भरला एक रिक्त प्याला.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंध 2


यत्न तो देव जाणावा मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI


 एक साधी इवलीशी काळी मुंगी, तिच्या वजनापेक्षा जड, आकारमानापेक्षा मोठा खाद्यपदार्थ... म्हणजे शेंगदाणा, डाळ किंवा मोठा मुंगळा ओढून नेताना आपण सर्वांनीच पाहिली आहे. ही मुंग्यांची रांग भिंतीवर चढताना मोडून पाहा. ती परत नव्या दमाने भिंतीवर चढायला सुरुवात करते. 


एकदा दोनदा ....शंभरदा... न हारता! एका दिवसाच्या भक्षासाठी कोळी प्रचंड परिश्रमांनी जाळे विणतो. पक्षिणी पावसाळ्याच्या तोंडावर इवल्याशा चोचीनी धागेदोरे, गवतकाड्या आणून पिंजून घरटी बाधतात. सुगरणी आपल्या होणाऱ्या पिलांसाठी उत्तम कारागिरी करून खोपा बनवतात. 


मधमाश्या दिवसाला लाखो फेऱ्या मारून लाखो फुलांमधून कणकण मध आणतात व पोळ्यात मधाचा संचय करतात, न थकता न कंटाळता! निसर्ग हा श्रेष्ठगुरू आहे, तो असा. माणसाला प्रयत्नवादाचा पुरस्कार करण्यास शिकवणारा. उद्युक्त करणारा.

यत्नाचा लोक भाग्याचा। 

यत्नेविण दरिद्रता। 

हे सांगणारा. माणूस तर सर्व प्राणीमात्रांमध्ये वेगळा; हात व बुद्धी असलेला प्राणी. पोटाच्या भकेबरोबर मुल्यांची आस बाळगणारा, नवनवी आव्हानं, प्रयत्नांच्या जोरावर पेलणारा. अशक्यप्राय गोष्टी कष्टसाध्य करून दाखवणारा. त्याला नक्की माहीत आहे की,

माणूस बसता भाग्य झोपते ।
 
चालता पुढेच घेई झेप ते।


इतिहासात, पुराणात, विज्ञानातही प्रयत्नवादाची आदर्श उदाहरणे व जिवंत दाखले कितीतरी आहेत. रोहिडेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्यानंतर शिवबाने मूठभर मावळ्यांच्या मदतीनं स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेसाठी बाजीप्रभू, तानाजी, शेलारमामा, मुरारजी हे खंदे लढवय्ये साथीला घेऊन किल्ल्यांवर विजय मिळवले. कधी गनिमाशी थेट भेट घेऊन विजय मिळवला, तर कधी गनिमी काव्यानं शत्रूशी झुंज दिली. 



प्रयत्नांची शिकस्त करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्यातून सैन्य नेऊन पेशव्यांनी दिल्लीवर भगवा फडकवला. कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्वरित करणं, त्यात सातत्य टिकवणं व संतुलित गतीनं ध्येयपूर्तीसाठी झटणं, ह्यालाच यशस्वी प्रयत्नवाद म्हणतात. 


मोठमोठ्या नद्यांवर धरणे बांधणं, पाणी अडवणं, भिंती उभारणं, वीज प्रकल्प सुरू करणं ह्यात कित्येक अभियंते, कामगार, आर्किटेक्टस् (स्थापत्य शास्त्रज्ञ) ह्यांचे प्रयत्न पणाला लागतात. रस्ते बांधणी, घाटातील मार्ग, नद्यांवरचे पूल, बोगदे ह्यामागेही यत्नांची मोठी मालिकाच असते. 


तर मोठमोठ्या रुग्णालयांत कित्येक मरणासन्न रोगी उपचारांच्या वा ऑपरेशनच्या प्रयत्नांनी पुनर्जिवित होतात. ह्यांमागे डॉक्टरांचे प्रयत्न! पेनिसिलीन औषधाचा जनक अॅलेक्झांडर, वाफेचा शोध लावणारा जेम्स वॅट, लसींच्या निर्मितीसाठी स्वत:वर प्रयोग करून स्वत:चे आयुष्य व आरोग्य पणाला लावणारा लुई पाश्चर, अनेक अयशस्वी चाचण्यांनंतर अग्नी क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण घडवून आणणारे डॉ. अब्दुल कलाम, अंतराळ कन्या सुनिता विल्यम्स... आमचे आदर्श आहेत. 'असाध्य ते साध्य करिता सायास' म्हणणारे दीपस्तंभ आहेत. 


कारगिलचे 'ऑपरेशन विजय' ही भारतीय सैन्याच्या पराक्रमाची, प्रयत्नांचीच व यशोगाथेची स्मृतीस्थळं आहेत. 'जैसे सरिताएँ विघ्न बाधाएँ तोडकर जाएँ लक्ष्यको पाएँ, वैसे तू अविचल राह अपनी चल'...असं हरक्षणी सांगणारी.
प्रयत्नांचे दुसरे नाव कर्मदेव. कर्मदेवाला प्रसन्न केल्याशिवाय प्रगती होत नाही हे नक्की. कर्मदेवाला लागतात प्रयत्नांची फुले नी कष्टाचा नैवेद्य!


'आता व्हावा कष्टिक, बलवान सुपुत्र भारताचा' अशी आस मनी बाळगणारे तुकडोजी महाराज म्हणतात 'नुसतेच उच्च शिक्षण नको जोडीला यत्नांची कास धरा.' 'नसत्या' तून ‘असते' कसे निर्माण होते, हे प्रयत्न शिकवते. कष्टणारा शेतकरी शिकवतो. मातीतून, अंधाऱ्या गुहेतून मोती निर्माण करण्याचे कसब प्रयत्नांती सिद्ध करून दाखवतो. 


मग हे मोती आधी असतात कुठे? मातीच्या कुशीत, बीच्या मुशीत लपलेले अदृश्य, सुप्त! शेतकरी किमया करतो त्यांना दृश्य करण्याची, त्याचप्रमाणे हातभर कापडातून शिंपी सुंदर पोशाख, मातीच्या ओल्या गोळ्यातून कुंभार सुबक मडके, काळ्या दगडातून शिल्पकार सुंदर शिल्प तर संस्कारांच्या घडणीतून शिक्षक सुजाण विद्यार्थी, उद्याचा जागरूक नागरिक घडवतो. 



अगदी प्रयत्नपूर्वक. कालवैशिष्ट्याकडे पाहन, चोहीकडे लक्ष देऊन, सावधानतेने. त्याने घडविलेला... कधी गुणवत्ता यादीत येणारा विद्यार्थी असेल तर कधी सानिया मिझा, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, रुपाली रेपाळे आदिंच्या रुपातला क्रीडाक्षेत्रातला चमकणारा हिरा. 


प्रयत्नांनी पैलू पाडलेला संगीतातले दादामुनी पं. भीमसेन जोशी तर बालवयातच घरातून निघून गेले होते. संगीत शिकण्यासाठी गुरुगृही त्यांनी घरकामही केले. संगीताची उग्र साधना केली व पंडितजी' पदवीला पोहोचले.



प्रयत्नांच्या जोरावर अंधव्यक्तींची एक टीम एव्हरेस्ट सर करून आली, 'मूकं करोति वाचालम्, पंगू लंघते गिरीम्' आशियाई खेळात उत्तम यश संपादन करणारी अश्विनी नाचप्पाच्या श्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वश्रुत आहे.
‘प्रयत्नांति परमेश्वर' प्रयत्न म्हणजे आत्मविश्वास नि आळस म्हणजे दैववाद. 


लंकेपर्यंतचा सेतू बांधणाऱ्या वानरांचे परिश्रम हेच नाही का सांगत? म्हणूनच एखादे सत्कर्म वा सत्कार्य मनात येताच तत्क्षणी हाती घ्यावे, तडीस न्यावे. कल करे सो आज करे, आज करे सो अब पल में परलै होयगी, बहरि करैगो कब? वेळ निघून गेल्यावर केवळ हात चोळत बसण्याव्यतिरिक्त काही हातात राहात नाही. 


आम्हालाही खरंतर परीक्षांची आठवण करून दिली, तर खूप राग येतो पण नंतर लक्षात येतं... अभ्यास करायला हवा. प्रयत्न केला तर 'ड' गटातली गणितं येतात. अंतर्मनातली इच्छाशक्ती, चेतनाशक्ती जागृत करावी लागते जी सुप्तावस्थेत पडून असते. प्रसंगी अग्नी चेतवावाच लागतो.

वन्ही तो चेतवावा रे। 

चेतवताचि चेततो।

केल्याने होत आहे रे ।

आधि केलेचि पाहिजे।।


तळहातावरच्या रेघोट्यांवर न विश्वासता मनगटाच्या जोरावर सारं काही साध्य होते हेच खरे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद