झाडे बोलू लागली तर मराठी निबंध । Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi

 झाडे बोलू लागली तर मराठी निबंध । Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  झाडे बोलू लागली तर मराठी निबंध बघणार आहोत.'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.' असे असताना वृक्षतोड का ? झाडे बोलू लागली. तर नक्कीच आपली मूक व्यथा सांगतील. मग मुक्या जीवांनाही फुटतील शब्दांचे घुमारे, मग त्यांच्या शब्दांतून उमटतील कारुण्याचे स्वर नि ते काय बोलतील, ऐका.


आज मला तुम्हाला काही सांगायचंय. मी जमिनीच्या काळ्याकुट्ट खोल खड्ड्यात बीजावस्थेत होतो. नंतर मला अंकुर फुटले. त्या काळ्या मातीच्या कुशीतून मी बाहेर आलो. प्रकाशाकडे झेपावू लागलो. कधी थंडी, कधी गरमी; तर कधी पावसाची झोड सारे सारे सहन करून, अर्थात जगण्याचा संघर्ष करीत वाढू लागलो. मोठा झालो, तेव्हा तुमच्यासाठी जगू लागलो.

“छाया मनस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे।

फल्यानपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव॥" 


या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे तुमची सेवा करण्यासाठी मी सज्ज झालो. माझे हिरवेगार भरलेले शरीर पाहून थकला-भागला पांथस्थ माझ्या सावलीत शीतलतेचा अनुभव करू लागला. पक्ष्यांनाही आम्ही आश्रय दिला. मला फळे लागली, तेव्हाही अगदी लीन होऊन मी तुमच्या सेवेसाठी उभा राहिलो. 


तुमची तहान-भूक भागवली, तुम्हाला शीतल छाया दिली. आम्ही वृक्ष म्हणजे ह्या धरतीचे हात आहोत. कृपा करून आमचे हात कापू नका. आमचे हात कापून तुम्ही काय मिळवणार? आम्ही आहोत; म्हणून तुम्ही आहात. दोघांचेही जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. आम्ही आहोत; म्हणून तुम्हाला प्राणवायू मिळतो. 


हवा शुद्ध राखण्यासाठी आम्ही कार्बन शोषून घेतो. तुमच्या डोळ्यांना सुख देतो. वेगवेगळ्या प्रकारची फळे देतो. आम्ही एका जागी आमची मुळे घट्ट रोवून उभे राहतो; म्हणून तर ढग अडतात नि पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्याविना तुम्हाला पाणी मिळेल? पाणी नाही मिळाले, तर तुम्ही जगू शकाल? कसं नाही येत लक्षात तुमच्या, की आमच्या विनाशातच तुमचाही विनाश आहे.


अरे माणसा, आम्हाला नष्ट केलेस, तर तुम्हीदेखील तहानेने, भुकेने तडफडाल. स्वत:ला एवढा बुद्धिमान समजतोस ना? मग गेली कुठे तुझी बुद्धी ? आज सर्वत्र प्रदूषणाने थैमान घातले आहे. हवेचे प्रदूषण वाढत आहे. हे सारे कशामुळे? 


आमची जी तोड करता ना, त्यामुळे. दुष्काळासारख्या संकटांना तुम्हालाच सामोरे जायचे आहे. आम्हाला कापलंत ना, तर ही सृष्टी भकास बनेल. आमचे सौंदर्य तुम्ही नाकारूच शकत नाही. ओसाड जमिनी आवडतील तुम्हाला?


झाड तोडायला वेळ लागत नाही; पण ते वाढायला किती वर्षे लागतात? करा विचार. पृथ्वीवरील तापमान अनियमित होत चाललंय. ऋतुचक्र अनियमित होत आहे. या सगळ्याचे कारण एकच. आमचा तुमच्याकडून होणारा विनाश.


माणसा, तुझ्या प्रत्येक सुख-दु:खात आम्ही तुझी साथ करतो. तुझ्या सगळ्या गरजा भागवतो. आमची फळे आम्ही स्वत: कधीच खात नाही. ती सारी तुम्हालाच अर्पण करतो. तरीही तू एवढा कृतघ्न कसा? आमचे परोपकारी जीवन तुला दिसत नाही? थोड्या स्वार्थासाठी तू मात्र स्वत:च्याच पायांवर कु-हाड मारून घेत आहेस. 


जेव्हा तू आमच्यावर कु-हाड चालविण्याचा विचार करतोस ना, तेव्हा माझे अंग शहारते, भीतीने आम्ही कापू लागतो; पण ती भीती माझ्या नष्ट होण्याची नाही; तर तुझ्याच नष्ट होण्याची वाटते. आमचे सगळे आयुष्यच परोपकारासाठी आहे. तेव्हा माणसा, जागा हो. स्वत:च स्वत:ला विनाशापासून वाचव. अगदी असंच बोलतील झाडे. तुम्हाला काय वाटतंय? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद