आजच्या काळातील स्त्री निबंध | Aajchi Stri In Marathi Nibandh

 आजच्या काळातील स्त्री निबंध | Aajchi Stri In Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजच्या काळातील स्त्री मराठी निबंध बघणार आहोत. 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।' या मनूच्या मतानुसार परावलंबी अशा स्त्रीपासून आजच्या खंबीर स्त्रीपर्यंतचा प्रवास आपण या शतकात पाहिला आहे. चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानणाऱ्या समाजाला स्त्रीने आज आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे.


'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी' ही उक्ती सार्थ करून स्त्री आज संस्कृती-संवर्धनाचे कार्य मोठ्या हिमतीने करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राणी लक्ष्मीबाईसारख्या स्त्रिया स्वातंत्र्यासाठी लढल्या आहेत. त्याशिवाय अनेक स्त्रिया स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या. आज देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. 


आता स्त्रीचे कर्तृत्वक्षेत्र फक्त स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित नाही. आज स्त्री नोकरी करायला, घरासाठी कमवायला बाहेर पडते, पुरुषांना अर्थार्जनात हातभार लावते. मादाम क्युरीसारख्या स्त्रिया विज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करतात. इंदिरा गांधी, मार्गारेट थेचर, अशा स्त्रियांनी पंतप्रधानपद भूषविले होते, अनेक क्षेत्रांमध्ये आज स्त्री कर्तृत्व गाजवीत आहे.


आज अनेक स्त्रिया नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. पण म्हणून स्त्रीची घरातील कामे कमी होत नाहीत. आज सुशिक्षित स्त्रीला नोकरी व्यवसायातील सर्व कामे यशस्वीपणे पार पाडायची असतात, पालक म्हणून मुलांच्या अभ्यासाची जबाबदारीही घ्यायची असते. 


तरीही ती सर्व आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी धडपडत असते. यामुळे आज स्त्री मुक्ती चळवळ फोफावू लागली आहे. परंतु केवळ पुरुषांची बरोबरी करायची या उद्देशाने स्त्रियांनी हव्यास करण्यापेक्षा आपली बलस्थाने ओळखावीत. स्त्री ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असते. 


कुटुंबसूत्र एकत्र बांधणारा स्त्री हा महत्त्वाचा घटक असतो. स्त्रीचे मार्दव, तिचे वात्सल्य ही तिची बलस्थाने आहेत. आपल्याला हवे ते समोरच्या माणसाकडून करवून घेण्याची हातोटी स्त्रीकडे असते. नवी पिढी स्त्रीच्या हातात असते. स्त्रीने जर मुलगा व मुलगी यांना समान वागणूक, समान शिकवण दिली तर पुढील पिढीतील स्त्रीला पुरुषांकडून अधिक प्रमाणात सहकार्य मिळू लागेल. 


संसारासाठी सर्वस्व समर्पण करण्याची वृत्ती हा स्त्रीचा आणखी एक विशेष असतो. कुटुंब व मुले ही तिचे केंद्रस्थान असतात. ही स्त्री नोकरी करते ती कुटुंबासाठीच व मुलांसाठीच ! परंतु मुलांच्या बौद्धिक विकासासाठी व त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी त्यांना आईच्या सहवासाची आवश्यकता असते. 


'टी.व्ही. लावून बसू नको रे' असे मुलांना बजावताना त्यांनी काय करावे, तेही मातेने सांगितले पाहिजे. एखादी सुंदर कविता वाचून दाखवावी, चांगले वाचन, चांगले संस्कार घडवावेत, निसर्गातील सौंदर्य पाहायला शिकवावे. या साऱ्यांचा फायदा मुलांना अधिक होणार आहे.


आजकाल हातात बऱ्यापैकी पैसा खेळत असल्यामुळे खर्चिक वृत्ती वाढीस लागली आहे. आपण सण साजरे करतो, ते फॅशन म्हणून! उत्सवीपणा वाढला आहे, चंगळवाद वाढत आहे, संपत्तीची उधळपट्टी वाढत आहे. पण आपण परंपरेतील सौंदर्याचा आस्वाद घ्यायला विसरत आहोत,


सण साजरे करण्यामागची शास्त्रीय दृष्टी विसरत आहोत. कोजागिरी, संक्रांत. चैत्रगौर हे सारे सण निसर्गातील बदल समजून घ्यावेत म्हणून साजरे करण्याची प्रथा आहे. यायोगे निसर्गाच्या जवळ जावे अशी परंपरा आहे. मंज आठव्या वर्षी करण्याची पद्धत आहे. का? तर तोपर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास होत असतो. 


तोपर्यंत आईवडिलांचा सहवास आवश्यक असतो. त्यानंतर आपण मोठे झालो ही जाणीव मुलाला करून द्यायची असते. म्हणून मुज करून मुलाच शिक्षण चालू करावयाचे ही परपरा होती. हा सारा सुंदर अर्थ आपण विसरून जातो आणि केवळ मोठा समारंभ करण्यासाठी मुंज करतो.


धर्म ही अशीच एक आपल्या जीवनाला घट्ट चिकटलेली गोष्ट असते. आजकाल काहीजण धर्म मानतच नाहीत, धार्मिक कृत्ये त्यांना अवडंबर वाटतात किंवा काहीजण धर्माचा फारच अभिनिवेश बाळगतात. या दोन्ही गोष्टी टाकून आपले जीवन सुसह्य व आनंदी बनविण्यासाठी धर्म उपयुक्त आहे हे ध्यानात घ्यायला हवे. 


एकच उदाहरण घेता येईल. तिन्हीसांजेला दिवा लावणे. हे का करायचे ? तर कातरवेळी मन उदास होते. अशावेळी धूपाने मन प्रसन्न होते, दिवा लावल्याने आत्मिक बळ वाढते, मन चांगल्या कार्यात गुंतून राहते. हे स्त्रीने समजून घ्यायला पाहिजे.


आज माहिती व तंत्रज्ञान विकसित होत आहे. सारे जग जवळ येत आहे. याच्याशी आपला संबंध नाही असे स्त्रीला म्हणता येणार नाही. तिने या साऱ्याची माहिती करून घेतली पाहिजे. स्त्रीने राजकीय जाणिवांमध्येही लक्ष घालणे आवश्यक आहे. म. गांधींनी स्त्रीला राजकारणात आणले. 


पिकेंटिग, मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या साऱ्या ठिकाणी स्त्रियांचा सहभाग होता. तसेच आजही राजकीय घडामोडीत तिने सक्रिय भाग घ्यायला हवा. राजकीय प्रवाह गढूळ बनला आहे तो साफ करण्याची जबाबदारी स्त्रीवरही आहे. 


आज माहितीचे दरवाजे खुले होत आहेत. त्याचा फायदा स्त्रीने घेतलाच पाहिजे. मात्र स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांशी बरोबरी नव्हे. तर स्त्रियांची बलस्थाने व पुरुषांची बलस्थाने एकत्र करून सर्वांची उन्नती साधणे होय. 


भारतीय स्त्रीचे स्थान निश्चितच मोठे आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासातून बदलत्या जाणिवांचा आनंद वृद्धिंगत करणे हे आजच्या स्त्रीचे खरे कार्य आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद