आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh

 आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मराठी निबंध बघणार आहोत. महाभारतात विदुर धृतराष्ट्राला सांगतात


सुखार्थिनः कुतो विद्या, नास्ति विद्यार्थिनः सुखम्।

 सुखार्थि वा त्यजेत विद्या, विद्यार्थि वा त्यजेत सुखम्॥


‘सुख हवे असणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ? विद्यार्थ्याला सुख मिळणार नाही. सुख हवं असणाऱ्या विद्येचा नाद सोडावा व विद्यार्थ्याने सुखाचा त्याग करावा,' हे विदुरांचे वचन अगदी बरोबर आहे. कष्टाशिवाय ज्ञान, विद्या मिळत नाही. परंतु आजच्या युगात हे वचन सत्य आहे का?


पूर्वीच्या काळचा विद्यार्थी खरंच सुखी म्हणावा लागेल. कारण एकच. एक चाकोरीबद्ध अभ्यासक्रम. घोकंपट्टी केली, की झालं. विद्यार्थीसंख्या कमी. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष असे. पूर्वीच्या विद्यार्थ्यांचं बरं होतं. घरी अभ्यास, शाळेत अभ्यास. 


शाळेत जाताना खुणावणारी चित्रपटगृहे किंवा चित्रपटांचे फलक नसायचे. रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाच्या किंवा सभोवती लाउडस्पीकरवर चालू असलेल्या 'हिट' गाण्यांच्या तालावर अभ्यास करावा लागत नसे. आज ज्ञानाचा प्रस्फोट झाल्याने विविध क्षेत्रात नवीन ज्ञानाची, माहितीची भर पडली आहे, पडत आहे. 


एकविसाव्या शतकात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला या सर्वाची ओळख हवीच. त्यामुळे बदललेला अभ्यासक्रम, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण, उद्योग, समाज इत्यादी सर्व क्षेत्रांतील घटकांचा अभ्यासक्रमात समावेश. याशिवाय कार्यानुभव, स्काऊट, गाईड, समाजसेवा, खेळ, एन.सी.सी.. एन.डी.ए. इत्यादीसारखे अभ्यासक्रम आहेतच. 


पुस्तके जितकी तितकीच गाईडस् व त्याच्या किमान तिप्पट तरी वया. हे सर्व सांभाळतानाच जीव मेटाकुटीला येतो. अशा अवस्थेत शिकून घरी आलं, की रंगीत टी. व्ही. स्वागताला हजर असतोच. तो बापडा अतिशय लाघवी व घरातील सर्वांचा आवडता. 


मग विद्यार्थ्यांना त्याला कसं दूर लोटता येईल? आता जास्त गुण मिळवायचे असतील तर शिकवण्या किंवा ट्यूशन्सशिवाय चालत नाही. ही ट्यूशन इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लागलेली असते. इयत्ता १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची पाठ तर सुट्टीतही ही टयूशन सोडत नाही. 


बरं एवढा अभ्यास करून इ. १० वी, १२ वीत अपेक्षित गुण मिळतील अशी खात्री नाही. या टक्क्यांच्या शर्यतीत जीव गुदमरून जातो. कोरे पेपर टाकणाऱ्याला नव्वद टक्के गुण मिळतात तर नव्वद गुण मिळवणारा एखाद्या विषयात नापास होतो. या नशिबाच्या खेळातून घोर निराशा पदरात पडते. 


अपेक्षित गुण न मिळाल्याने इच्छित अभ्यासक्रम किंवा विज्ञानशाखा मिळत नाही व उरलेले सर्व जीवन नावडत्या अभ्यासक्रमाचे ओझे घेत पुढे ढकलावे लागते. एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला तर निश्चित नोकरी मिळेल अशी खात्री नाही. तेथेही 'वजन' पाहिजे, वशिला पाहिजे. पदवीधर असन बेकार, इंजिनिअर असन बेकार असलेले कितीतरी लोक आहेत. समोर निश्चित दिशा नाही, सुयोग्य मार्गदर्शक नाहीत. 


समोर निश्चित ध्येये व आदर्श नाहीत. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांचे 'तारू' भरकटले नाही तरच नवल. दूरदर्शनवरील मनोरंजनाचे कार्यक्रम दिवास्वप्नात नेतात. इयत्ता पहिली, दुसरीतील मुलेही 'अ, आ, इ'पेक्षा 'लव्ह', 'प्यार' या गोष्टीच चटकन समजू शकतात. 


बेशिस्त हळूच नकळत वर्तनात प्रवेश करते, मुलींची टिंगल करण्यात मजा वाटू लागते, 'व्यसनांचा' अनुभव घेण्याचा मोह होतो व मग काही वेळा सर्वच जीवनाचा तोल बिघडतो. यासाठी शिक्षणाचा संबंध व्यवसायाशी जोडला गेला पाहिजे. किंवा व्यवसायपूरक किंवा व्यवसायाधिष्ठित अभ्यासक्रम असले पाहिजेत. 


या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नीट मार्गदर्शन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी शाळेतून "परीक्षेचा' बागुलबुवा नाहीसा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत किंवा इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांवर संपूर्ण आयुष्याचे वळण अवलंबून असणं कितपत योग्य आहे याचा गंभीर विचार केला जात आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद