आकाशवाणी बंद पडली तर मराठी निबंध | Aakashvani Band Padli Tar Marathi Nibandh

 आकाशवाणी बंद पडली तर मराठी निबंध | Aakashvani Band Padli Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आकाशवाणी बंद पडली तर मराठी निबंध बघणार आहोत. सकाळी आई उठली की प्रथम रेडिओ चालू करते आणि 'मंगल प्रभात' बरोबरच आईची प्रभात चालू होते. रोज सकाळी मला ती भक्तिगीते ऐकावी लागतात. 


एक दिवस माझ्या मनात आले, रेडिओच बंद पडले तर! पण मग आईचे सारे दैनंदिन व्यवहारच थंडावतील. तिची सारी कामे 'आपली गाणी', 'कामगार सभा', 'भावधारा' अशा कार्यक्रमांच्या तालावर चालू असतात.


खरेच! मी विचार करू लागलो. रेडिओमुळे आज सारे जग खूप जवळ आले आहे. आज विज्ञानाच्या युगात माणूस प्रगतीचे नवेनवे टप्पे गाठू लागला आहे. तर रेडिओवर आपण विविध प्रकारचे कार्यक्रम, सततच्या घडामोडींच्या बातम्या ऐकतो. आजकाल ज्ञानाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. 


माहिती महाजाल, त्यासाठी संगणक या गोष्टी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या नव्हेत. तर आम जनता रेडिओवरच अवलंबून असते. त्यामुळे आकाशवाणी नसेल, रेडिओ नसेल तर खेडोपाडीच्या जनतेला या नवनव्या ज्ञानाचा पुरवठा होणार नाही. 


शिवाय आपल्या देशातील बरेच लोक अजन निरक्षर आहेत. त्यांना वृत्तपत्रातील बातम्या वाचता येत नाहीत. पण चावडीवर जमून रेडिओ ऐकून ते लोक बातम्या जाणून घेऊ शकतात. रेडिओ नसेल, तर त्यांची पंचाईत होईल.


रेडिओ नसेल तर आपल्या एकसुरी जीवनात कलेचे सूर कोण भरणार ? शेतकऱ्यांना 'माझे आवार माझे शिवार' द्वारा शेतीविषयक माहिती कशी मिळणार? 'कामगार सभा'मधून कामगारांच्या उपयोगाची माहिती कशी मिळणार? दिवसभराच्या श्रमानंतर माणसांना रेडिओ नसेल तर मनोरंजनाची झुळूक कशी मिळणार ? 


व्यापारी लोकांना बाजारभाव कसे कळणार? क्रिकेटशौकीनांना मॅचची कॉमेंट्री कशी ऐकायला मिळेल ? अनेक विद्वानांची भाषणे कशी ऐकायला मिळतील? घरबसल्या दूरदूरच्या ठिकाणी होणाऱ्या संगीताच्या मैफिली कशा ऐकता येतील? मुलांना 'गंमत-जंमत', स्त्रियांना 'वनितामंडळ' आजींना 'कीर्तन-प्रवचन' तरुणांना सिनेसंगीत, संगीत प्रेमींना 'शास्त्रीय संगीत' अशा कार्यक्रमांना मुकावे लागेल.


रेडिओ मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे साधन म्हणून वापरला जातो. अनेक प्रकारचे ज्ञान रेडिओवरून दिले जाते. शिवाय विविध भाषिक लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषेत हे ज्ञान मिळू शकते. रेडिओ नसेल तर या त-हेचे ज्ञानग्रहण मानवाला शक्य होणार नाही. 


आज आपले जीवन अधिकाधिक गतिमान होत आहे. या जीवनाबरोबर आपली गती राखायची तर सदैव ज्ञानाचे कण जमा करीत राहायला हवे. यासाठी रेडिओ हा मित्र म्हणून उपयोगी पडतो. रेडिओ नसेल तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला साथ कोण देईल ? 


आपली ज्ञानलालसा कोण पुरवील? मन कोण रिझवील आणि आपला शीण कोण हलका करील? हे सर्व मी लिहिले खरे! पण एक खरे सांगू का? अहो, नसला रेडिओ तर नसेना! माणसाचे काहीसुद्धा अडणार नाही. आजकाल टी.व्ही. असतो ना!! 


परंतु हेही विसरता कामा नये की टी.व्ही.च्या किमती खूप असल्याने गरीब जनतेला ते परवडत नाहीत आणि रेडिओ हे ट्रॅन्झिस्टरच्या स्वरूपात आपण कोठेही नेऊ शकतो. म्हणून आकाशवाणीनेच आपल्या देशातील जनतेसाठी महत्त्वाचे स्थान प्राप्त करून घेतलेले आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद