एकेकाचे स्वभाव निबंध मराठी | Aikekache Swabhav Nibandh Marathi

 एकेकाचे स्वभाव निबंध मराठी | Aikekache Swabhav Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकेकाचे स्वभाव मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  एकेकाचे स्वभाव  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  “काय कमलताई, झाला का स्वेटर?" "छे! हो, कसला स्वेटर अन् कसलं काय! काल पूर्ण झालेला स्वेटर ह्यांना घालायला दिला. गळ्याला थोडासा घट्ट होत होता. म्हटलं, वरच्या दोन तीन ओळी उसवीन म्हणून ठेवून दिला व बाजारात गेले. 


बाजारातून येऊन पाहते तो ह्यांनी सर्व स्वेटर उसवून ठेवलेला!” कमलाताईंची ही स्वेटरची कहाणी ऐकून मी मनाशी म्हटलं काय बाई स्वभाव! स्वभावावरून मला आमच्या फलटणच्या शेजाऱ्यांची आठवण झाली. रोज जेवताना ठराविक संवाद ऐकू यायचा, 'अगं तूप आधी मला वाढ. नंतर तू घे. उरलं असलं तर मुलांना वाढ. 


मी जगलो तर पैसे मिळवून आणीन, तू जगलीस तर स्वयंपाक करून वाढशील...! लोक आंबे चोरून नेतात म्हणून आमच्या शेजारच्या देशपांडेंनी त्यांचं आंब्याचं झाडच तोडून टाकलं. तर कोणी फुलं चोरून न्यायला नको म्हणून चिवट्यांनी आपल्या बागेत फक्त निवडुंगाचीच झाडं लावली,


तांब्यांचे नाना काहीही होत नसताना रोज डॉक्टरांकडे जाऊन तब्येत तपासून येतात व टॉनिकच्या गोळ्या खात असतात. तर त्यांचे मित्र तात्या डायबेटिस, ब्लडप्रेशरचा त्रास असताना. टोनदा हार्ट अॅटॅक आला असतानाही काही पथ्य करत नाहीत. बिनधास्तपणे सर्व पदार्थांवर ताव मारतात.


रोज सकाळी व्यायाम करून आपले वजन कायम राखणारे व कितीही वजन वाढलं तर अस्सल तुपातलेच पदार्थ खाणारे माझे स्नेही आहेत. जगात असे विविध स्वभावाचे लोक पाहिले, की जगातील वेड्यांचा पसारा पदोपदी जाणवतो. मृत्यूलाही खदाखदा हसणारे देशभक्त, हुतात्मे सर्वांनाच जात आहेत. पण गेली पंधरा वर्षे अंथरुणाला खिळूनही जीवनाबद्दलची आसक्ती न सुटलेले माझे निकटचे स्नेही मी रोज पाहते.


माझ्या काही स्नेह्यांची 'रोती सुरत' मी रोज अनुभवते. तसेच घरी खूप कष्ट, सासुरवास, दारिद्रय, आजारपण असताना सदैव मुक्त हास्याची उधळण करणारी माणसे मी अनुभवलेली आहेत.


‘स्वभावाला औषध नाही,' वगैरे विचार मला मान्य नाहीत. कारण आपल्या शांत स्वभावाने रागीट बायकोचा स्वभाव बदलणारे पुरुष व शांत सहनशील पत्नीला रागीट बनवणारे महाभाग मला माहीत आहेत! तसेच कंजूष अधिकाधिक कंजूष, उधळे अधिकाधिक उधळे, हळवे अधिकाधिक हळवे, तर दुबळे अधिकाधिक दुबळे झालेले मी पाहिले आहेत.


माझ्या एका मित्राचे वडील नुकतेच वारले होते. तरीही आपले दुःख बाजूला ठेवून तो जिवलग मित्राच्या लग्नातील सोहळ्यात सामील झाला होता, तर रत्नागिरीत पाऊस जास्त म्हणून त्याच मित्राची सख्खी बहीण लग्नाला आली नव्हती, एकेकाचे स्वभाव. दुसरं काय म्हणायचं? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

 एकेकाचे स्वभाव निबंध मराठी | Aikekache Swabhav Nibandh Marath


विविधतेची निसर्गात लयलूट असते. दगड, पशू, पक्षी, झाडेझुडपे, फळे फुले... त्यांतही रूप, गंध, रंग यांची किती विविधता... विविधता हा निसर्गाचा आत्माच!... माणसांचंही असंच आहे. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना।" माणसांचे स्वभाव किती वेगवेगळे!!... चांगला आणि वाईट असेच खरे तर विभाजन होईल.


दुसऱ्याचं दु:ख पाहून कष्टी होणारे, सर्वांचं कल्याण चिंतणारे, संत चांगले तर दुसऱ्याचं दु:ख पाहून आनंदी होणारे, दुसऱ्याचं वाईट चिंतणारे, जुलमी, पीडा देणारे वाईट. ... उमदा, कोता, दिलदार, कुजका, दुष्ट, प्रेमळ, रागीट, गोड, लाघवी, बडबड्या, घुमा, उधळ्या, कंजूष, मानी, लुब्रा, वेंधळा, करडा, विसराळू... 


स्वभावाच्या किती परी! मृत्यूलाही ओशाळायला लावणारा संभाजी मानी तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देणारा शिवाजी धोरणी, तलवार गाजवणारा पहिला बाजीराव धाडसी तर जेवणावळी गाजवणारा दसरा बाजीराव आळशी, पळपुटा, ...


 प्रश्नाला उत्तर म्हणून प्रश्नच विचारणारा व. पु. काळ्यांच्या गोष्टीतला जोशी भांडखोर तर पैशाची वरूपाची श्रीमंती असूनही गरीब साध्या इंटशी आणि लेखकाशी मैत्रीचा धागा राखणारा पु. लं. चा नंदा प्रधान वरून कोरडा पण अंतर्यामी हळवा,... करून सवरून 'तो मी नव्हेच' म्हणून सर्वांना टोप्या घालणारा 


अत्र्यांचा लखोबा लोखंडे बेरकी तर स्मरणासाठी उपरण्याला गाठी मारणारा व कुठली गाठ कशाची, ह्याचेच विस्मरण होणारा गडकऱ्यांचा गोकूळ विसरळभोळा... 'दुरितांचे तिमिर जावो' म्हणत जगणारा बाळ कोल्हटकरांचा दिगू-साधा, सरळ, भोळा...' तर श्री. ना. पेंडशांचा 'गारंबीचा बापू' अफाट... जग हे माणसांच्या स्वभावांचं म्युझियमच!


'स्वभावो दुरतिक्रमः।' 'स्वभावाला औषध नाही' असं म्हणतात. जन्मत: आपण तसे असतो का? स्वभावाला वारसा असतो का? कसं शक्य आहे ? मग स्वभावांची घराणी झाली असती! 'सूर्यापोटी शनी' आले नसते. “घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे" 


हेच दिसते. परिस्थिती, संस्काराने स्वभाव घडत वा बिघडत जातात. एकदा का ते पक्के झाले की “वळणाचे पाणी", "कुत्र्याचे शेपूट", "मूळ स्वभाव जाईना" म्हणतात. ... कृती, सवयी, गुण, अवगुण यांची स्वभावाशी सांगड घालतात. मूलतः सारे एका माणसात असतेच. म्हटलंच आहे


“वाईट आणि चांगला। 

स्वभाव असे आपला॥

कधी एक दिसतो। 

दुसरा लपून असतो। 

माणूस इथेच फसतो॥" 


कृती कधी कधी स्वभावाविरुद्ध असते. सवयी अनुकरणप्रियतेने येतात त्या बदलतातही!... स्वभाव हा अनेक गुणावगुणांचा गुच्छ असतो. ज्याचं प्रमाण जास्त तो त्याचा स्वभाव म्हटला जातो. दुष्ट, क्रूर, वाईट दरोडेखोराच्या मुलांना त्यांचा बाप प्रेमळच वाटतो. 


मला तुसड्या वाटणारा तुम्हाला सडेतोड, बाणेदार वाटतो. दिलदार हा बावळट, भोळासांब वाटतो. दिलदार, हौशी, आनंदी, मानी, मिळून उमदा स्वभाव होतो. तसा अनेक गुणांचा समुदाय एका स्वभावाच्या पोटी असतो. परिस्थिती किंवा संस्कार ही एका मर्यादेपर्यंतच त्याला कारणीभूत होतात. मूळ स्वभाव त्या पलीकडचा आहे.


'स्वभावो न उपदेशेन कर्तुम् अन्यथा।

सुतप्तस्य अपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम्॥'


पाणी खूप तापवलं तरी पुन्हा थंड होते. - “असतो एकेकाचा स्वभाव" म्हणून ते आपल्याला स्वीकारावंच लागतं! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद