बेशिस्त मराठी निबंध | BESHISTA ESSAY MARATHI

  बेशिस्त मराठी निबंध | BESHISTA ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेशिस्त मराठी निबंध बघणार आहोत. नियमपालनाचा अभाव ही एक विश्वव्यापी समस्या आहे. ती सतत वाढत आहे. त्यामुळे रोज नवी उद्विग्नता निर्माण होत आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र असे नाही जिथे नियमपालन होत असेल. 


विद्यार्थी असो वा शिक्षक, आई वडील त्यांची मुले, पुढारी असो वा व्यापारी इतकेच नव्हे तर लोकसभा असो की विधानसभा सगळीकडे शिस्तीचा अभाव दिसतो. हा एक विश्वव्यापी शाप आहे जो नष्ट झाला पाहिजे.


नियमांचे पालन, चालीरीतींचे पालन म्हणजे शिस्त ज्याचे उल्लंघन म्हणजे शिस्तीचा अभाव. हा आपल्यासाठी चिंतेचा व लाजेचा विषय आहे. शिस्त नसल्यामुळे व्यवस्था राहत नाही. शांती राहत नाही. नियम व कायदे भंग झाला तर अराजकता पसरते. शिस्तीच्या अभावाचा हा रोग निरनिराळ्या रूपांत दिसतो. आपण यास उच्छृखलता, समाजाविरुद्धचे वर्तन, नियमांचे उल्लंघन असेही म्हणू शकतो.


भारतात या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. हरताळ, हिंसा, तोडफोड, भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, दुर्घटना, भेसळ, काळा बाजार, चोरी इत्यादी शिस्तीच्या अभावाचेच परिणाम आहेत. शिस्त पालनामुळे शांतता राहते. प्रगती होते, सामाजिक विकास होतो, व्यक्ती व राष्ट्र समृद्ध होते. 


याउलट शिस्तीच्या अभावामुळे. अशांती, वैमनस्य, हिंसा, अधोगती, पतनाचा मार्ग प्रशस्त, विस्तृत होता. एखादी व्यक्ती नियमांचे पालन करून आपली मानसिक शारीरिक व आर्थिक प्रगती करून घेऊ शकते. व्यक्ती, समाज, संस्था, देश सर्वांसाठी शिस्त आवश्यक आहे.


आपण शिस्तीत राहिले पाहिजे. नियमांची उपेक्षा करू नये अधिकाऱ्यांबरोबर व्यवस्थित काम करून शांतता ठेवण्यात त्यांना सहकार्य करावे. आपल्या असामान्य महत्त्वाकांक्षा, भोगवाद आणि स्वार्थ ही या समस्येची काही मूळ कारणे आहेत. आपण आपला प्राचीन आदर्श "साधी राहणी उच्च विचारसरणी" विसरून गेलो आहोत. 


लोभ लालचीपणा, स्वार्थ यांच्या मोहात पडून आपणही भोगाच्या शर्यतीत सामील झालो आहोत. या शर्यतीला अंत नाही. यामुळे विषमता, दुराचार, अनाचार आणि विवेकहीनतेचा जन्म झाला आहे. त्याचे भयंकर परिणाम आपल्यासमोर आहेत. साध्या साध्या गोष्टीवरून संप, हरताळ, हिंसा, जातिवाद, दंगली, मोर्चे निघतात. 


कर्तव्यबोध आणि कर्त्तव्यपालनाचे तर कुठे नावही नाही. राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी काहीही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, ते भोळी जनता, विद्यार्थ्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतात. जे आपले रक्षक आहेत तेच आज आपले भक्षक बनले आहेत. सगळीकडे भ्रष्टाचार आणि लाचखोरीची चलती आहे. 


धर्म आणि अल्पसंख्याकांच्या नावावर भांडणे आणि दंगे ही आपल्या जीवनातील सामान्य गोष्ट झाली आहे. सगळे लोक यामुळे वैतागले आहेत. तरीही आपण विवेकशून्य होऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहतो.


आज पुढारी, शिक्षक धार्मिक नेते समाजसुधारक, सरकार इत्यादी नी मिळून या प्र श्नाचा विचार करून हा प्रश्न सोडविला पाहिजे. त्यांनी आपले आचरण सुधारून लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. म्हणजे तरुण पिढी त्यांचे अनुकरण करेल. आज आपणास गांधी, सुभाष, नेहरू, टिळकांसारख्या नेत्यांची गरज आहे. त्यांच्या अभावामुळे ही पोकळी निर्माण झाली ती जीवघेणी आहे.


भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाहीचा आधार शिस्त हा असतो. समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे यांच्या पायातील दगड आहे. परंतु शिस्त नसलेल्या या वातावरणात ही मानवी मूल्ये टिकू शकत नाहीत. आज लोकशाहीच्या नावाखाली जे काही होत आहे ते सर्वांना माहीतच आहे. 


राजकारण आणि समाजातील उच्छृखलता अमानवी आहे. आपले लोकप्रतिनिधी, पुढारी अनंत घोटाळे आणि भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. शिस्तीच्या अभावाची नवनवी उदाहरणे ते रोज आपल्यासमोर उभी करतात. आज शिस्तीचा अभाव हा भारतासमोर असणारा सर्वात मोठा धोका आहे.


शिस्तीच्या अभावामुळे पशुपेक्षाही वाईट अवस्थेला आपण येऊन पोहोचलो आहोत. जर वेळ गेली नसूनही योग्य उपाय आपण योजले नाहीत तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आपण शिस्तीचे धडे पुन्हा गिरविले पाहिजेत. जीवनात त्याचा अवलंब केला पाहिजे. 


हे धडे घर आणि शाळेपासून सुरू करून शासनाच्या उच्च पातळीपर्यंत गेले पाहिजेत. जीवनाच्या प्रत्येक पातळीवर पुन्हा शिस्त आणली पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद