भाव तोंचि देव मराठी निबंध | Bhav Tochi Dev Essay Marathi

 भाव तोंचि देव मराठी निबंध | Bhav Tochi Dev Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाव तोंचि देव मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  भाव तोंचि देव असलेले दोन निबंध बघणार आहोत 



न देवो विद्यते काष्ठे। 

न पाषाणे, न मृण्मये। 

भावे हि विद्यते देवः। 

तस्माद् भावो हि कारणम्॥


देव लाकडात. दगडात किंवा मातीत नसतो. देव हा भक्तिभावातच असतो. श्रीरामचंद्रांनी शबरी भिल्लिणीचा भोळा भक्तिभाव जाणला व तिने दिलेली उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. परंतु मध्ययुगीन काळात कर्मकांडाचे महत्त्व वाढले. खरा भक्तिभाव लोक विसरले. संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग सांगितला. 


परमार्थात जात महत्त्वाची नसते तर भक्ती महत्त्वाची असते. ईश्वराविषयी भक्तिभाव असणे महत्त्वाचे आहे हे त्यांनी दृष्टांतांनी पटवून दिले.

भगवद्गीतेत श्रीकृष्णांनीमां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः। 

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परागतिम्॥


असे अर्जुनाला सांगितले. ज्यांच्या तोंडात- मुखात माझेच नाव आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहतात, ज्यांचे मन सतत माझ्याविषयीच विचार करते, माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, माझी सेवा हेच सर्व अवयवांचे भूषण असते, 


ज्यांची ज्ञानवृत्ती फक्त परमेश्वरालाच जाणते, भगवंताची सेवा करायला मिळाली तरच जीवनाचे सार्थक वाटते नाहीतर जगणे मरणप्राय वाटते, असा भक्त कोणत्याही जातीचा असला तरी श्रेष्ठच.


पाहे पां भक्तिचेनि आथिलेपणे। 

दैत्ये देवां आणिले उणे। 

माझे नृसिंहत्व लेणे।

जेयचिये महिमे। 

ज्ञानेश्वर म्हणतात की, भक्तीच्या संपन्नतेमुळे राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. भक्त प्रल्हादाच्या मोठेपणासाठी प्रत्यक्ष भगवंताला नृसिंह अवतार घ्यावा लागला. तो प्रल्हाद दैत्य कुळातला होता. त्याप्रमाणे दुष्ट जातीत जन्माला आलेले,


श्रुताधीत नसले तरी परमेश्वराला प्रिय असतात. कारण भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा असतो.  ज्याप्रमाणे राजाज्ञेची अक्षरे असलेले कातडे श्रेष्ठ ठरते त्याप्रमाणे ज्याचे मन व बुद्धी परमेश्वराच्या प्रेमाने भरलेली आहे, तो भक्त श्रेष्ठ ठरतो. कस्तुरी बाहेरून दिसायला सुंदर नसते किंवा चंदनाचे झाड मनोहर नसते, 


परीस ओबड-धोबड असतो किंवा तलवारही मौल्यवान धातूची बनलेली नसते पण त्यांचे गुण मौल्यवान असतात. त्यामुळे त्यांना किंमत प्राप्त होते. भक्तांना भक्तीमुळेच श्रेष्ठत्व प्राप्त होते. महाराष्ट्रातील संतांच्या ठिकाणी असाच भक्तिभाव दिसून येतो. 


महाराष्ट्रात प्रत्येक जातीत संत निर्माण झाले. चोखामेळा 'महार' असून किंवा सावतामाळी 'माळी' असून, किंवा गोरा कुंभार 'कुंभार' असूनही भक्तीच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरएकनाथांसारखेच श्रेष्ठ होते. सावतामाळी म्हणतातकांदामुळा भाजी, अवघी विठाबाई माझी: कारण जसा भाव तसा देव ! भाव तोच देव ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

 भाव तोंचि देव मराठी निबंध | Bhav Tochi Dev Essay Marathi 


विश्वनिर्मितीचे गूढ माणसाला अजून उलगडले नाही. मानवी जीवनाचे भरजरी वस्त्र विणणाऱ्या विणकराचे हात अजून कोणी पाहिले नाहीत. जे आस्तिक आहेत ते ‘परमेश्वराची' संकल्पना मानतात, त्याच्या शक्तीला शरण जातात, त्याची पूजा करतात. 


भावना व्यक्त करण्यासाठी व्यक्ती हवी म्हणून मूर्ती करतात. माणसागणिक वेगवेगळ्या मूर्ती, पूजेचे वेगवेगळे प्रकार आले. पंथ निर्माण झाले. धर्म निर्माण झाले. कर्मकांडे आली. ही पाळणे म्हणजेच देवपूजा असे समीकरण सामान्य जनांच्या बौद्धिक कुवतीनुसार दृढ झाले. कर्मठपणा आला. 


त्याच्या बाहेरचे सर्व वर्तन, सर्व कल्पना त्यांनी नामंजूर ठरवल्या. इथेच गफलत होते. संत म्हणतात विश्वाच्या निर्मितीमागे, हा अफाट गाडा चालवण्यामागे अव्यक्त शक्ती म्हणजे ईश्वर ! तो अनादी, अनंत आहे. या परमेश्वराशी तादात्म्य पावण्याची उत्कट इच्छा म्हणजेच भक्ती!' निखळ भक्ती ही देवाला प्रिय. 


'हटातटाने पटा रंगवूनि जटा शिरी धरण्यांत' काहीच मतलब नाही. 'नाहीं निर्मळ मन। काय करील साबण ?'... सामान्यांपेक्षा वरचे लोक ‘भाव तेथे देव' म्हणतात तर अध्यात्मात खूप पुढे गेलेले महात्मे ‘भाव तोचि देव' या उच्च पातळीपर्यंत जातात.


मनाच्या व बुद्धीच्या ज्या पातळीवर तुम्ही देवाची भक्ती कराल त्या त्या पातळीवरच तो तुम्हाला भेटेल!... सगुण व निर्गुण असे भक्तीचे दोन मार्ग. मूर्तिपूजकांची सगुण भक्ती. बहुजन समाजाचा हाच मार्ग, पण संत नामदेवांसारखे यात आले होते.... पण ज्यांच्या बुद्धीला आकलन झालेले आहे की ही चराचर


सृष्टी ज्यानं निर्माण केली तिच्यातच तो भरून राहिला आहे. ईश्वराशी तादात्म्य पावणे म्हणजे या चराचराशी एकरूप होणे, त्यांना सगुण भक्तीची गरज पडत नाही. 'जें जें भेटे भूत। तें तें मानिजे भगवंत ॥' ही मनाची अवस्था ते सहज प्राप्त करू शकतात.


त्यांची भक्ती ही निर्गुण भक्ती. पण ती निर्गुण निराकार असूनही उच्च पातळीची असते. सर्व प्राणिमात्रात त्यांना देव दिसतो. जसा ज्ञानेश्वरांना रेड्यातही देव दिसला. कर्मयोगी संतांना तर त्यांच्या कर्मातच परमेश्वर दिसायचा. संत गाडगेमहाराज, आचार्य विनोबा भावे काम करण्याला देव मानायचे. 


कामामध्ये सदाचार हीच त्यांची पूजा. बहिणाबाई म्हणूनच म्हणतात "ऊठ ऊठ माझ्या जीवा, काम पडलं अमाप।
काम करता करता, देख देवाजीचं रूप॥" तुमचं काम, कर्तव्य पार पाडणं ही सुद्धा देवाचीच उपासना! केवढा उदात्त विचार!


गुरूचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार नाही हे पाहून द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून एकलव्याने अर्जुनाच्या तोडीची धनुर्विद्या संपादन केली, त्याचा मार्ग वेगळा राहिला. परंतु विद्येची किंमत तीच राहिली. शिकणाराचा दर्जाही उच्चच राहिला... 


त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या भक्तीचा मार्ग वेगवेगळा असेल पण त्यामागची उत्कटता, तद्रूपता, प्रामाणिकता जर तीच असेल तर ईश्वराचा साक्षात्कार देखील तितक्याच उत्कटतेनं झाल्याशिवाय राहणार नाही. खरा देव त्यानेच प्रसन्न
होतो.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद