धर्म आणि राजकारण मराठी निबंध | Dharm aani rajkaran essay in marathi

 धर्म आणि राजकारण मराठी निबंध | Dharm aani rajkaran essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण धर्म आणि राजकारण मराठी निबंध बघणार आहोत. धर्म आणि राजकारण सामाजिक जीवनाचे अनिवार्य घटक आहेत. ते एकमेकांना पूरक आहेत. धर्माच्या अभावी राजकारण विवेकशून्य होते. तर राजकारणाशिवाय धर्माचा विकास होत नाही. 


प्राचीन काळापासूनच धर्म आणि राजकारणात समन्वय होता. परंतु भारताच्या वर्तमान परिस्थितीत धर्म आणि राजकारणात अंतर ठेवणे योग्यच आहे. आपल्या शास्त्रात कर्तव्यालाच धर्म म्हटले आहे. धर्माचा अर्थ आहे धारण करणारा किंवा जे धारण केले जाते. 


धर्मच प्रत्येक वस्तूला तिच्या स्वरूपात धारण करतो आणि धारण केल्यानंतर त्याच्या स्वरूपाचे रक्षण होते व "धर्मी धारयते प्रजा" म्हणजे धर्म प्रजेचे रक्षण करतो. जीवन जगण्याची रीत सांगणाऱ्या श्रेष्ठ सिद्धांतांचा समूह म्हणजे धर्म. सत्याच्या सर्व कार्याला एका सुसंगत अर्थवत्तेत स्पष्ट करण्याचा जिवंत प्रयोग म्हणजे धर्म, धर्माचे क्षेत्र व्यापक आहे.


धर्म हा प्रकृती आणि मानवाचा शाश्वत गुण आहे. ईश्वर जसा एक आहे तसा धर्मही एकच आहे. परंतु आज धर्माचा विकृत अर्थ लावला जात आहे. विशिष्ट प्रकारची पूजाअर्चा म्हणजे धर्म असे समजले जाते. म्हणूनच धर्माचे वेगवेगळे प्रकार उदा. हिंदू, इस्लाम, पारशी आदी दिसून येतात. 


खरे म्हणजे हे धर्म नव्हेत तर मते किंवा समूह आहेत. यांनांच धर्म समजणे ही चूक होईल. Religion या शब्दाला पर्यायी शब्द धर्म वापरल्यामुळे ही चूक होते. जेव्हा एका गुरूची किंवा एखाद्या धर्मग्रंथात सांगितलेली शिस्त जबरदस्तीने एखाद्या मानव समूहावर लादली जाते तेव्हा विशिष्ट मताची उत्पत्ती होते. 


धर्म पालन हा व्यक्तीचा सहज स्वभाव असतो. राजकारण म्हणजे शासन व्यवस्था, ज्याप्रकारे प्रशासन चालते व प्रजेवर राज्य केले जाते त्याला राजकारण म्हणतात. 'नीतिशतकात' भर्तृहरी यास वारांगनेय नपनीतिनेक रूपा" असे म्हणतो. म्हणजेच राजकारण वेश्येप्रमाणे अनेक रूपे धारण करते. 


डॉ. हजारी प्रसाद द्विवेदी या विचारवंताच्या मते, "राजकारण सापापेक्षाही अधिक कुटिल, असिधारेपेक्षाही अधिक दुर्गम आणि विजेपेक्षाही अधिक चंचल असते". "कौटिल्याचे अर्थशास्त्र"राजकारण व प्रशासनावरील प्रामाणिक ग्रंथ आहे. अर्थशास्त्राचा अर्थ ही धर्माप्रमाणेच विकृत करण्यात आला आहे. 


कौटिल्याचे अर्थशास्त्र हा पूर्णपणे राजनैतिक शास्त्रावरील ग्रंथ आहे. त्यात राजापासून सुरवात करून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे प्रजेप्रति असलेले कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकारांची व प्रजेतील वरिष्ठ व्यक्तीचे राजा अर्थात प्रशासनाप्रति कर्तव्य व जबाबदाऱ्या, हक्क यांची विस्तारपूर्वक व्याख्या करण्यात आली आहे.


राजकारणात दोष असण्याची शक्यता असते. त्यास दोषमुक्त करण्यासाठी एका विशिष्ट दर्जाची गरज असते. तो दर्जा म्हणजे धर्म. धर्मरूपी आरशात राजकारण आपल्या सत्कर्माचा व दुष्कर्माचा चेहरा पाहू शकते. धर्म आणि राजकारणाबाबत अनेकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. उदा. 


स्वामी विवेकानंद, आपला धर्म झुगारण्यात सफल होऊन राष्ट्रीय जीवन शक्तीच्या रूपात जर तुम्ही राजकारणाला आपले केंद्र बनविण्यात सफल झालात तर तुम्ही समाप्त व्हाल". म. गांधी, "धर्मापासून वेगळ्या राजकारणाची मी कल्पनाही करू शकत नाही" डॉ. राममनोहर लोहिया, 'अल्पकालीन धर्म म्हणजे राजकारण," दीर्घकालीन धर्म म्हणजे राजकारण" स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा गांधीजींनी गीतेपासून घेतली तर 


लो. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन समाज जागृती केली. राष्ट्रध्वजावर अंकित असलेले अशोकचक्र धर्मपरायण राजकारणाचे उदाहरण. आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धर्म म्हणजे विविध मते मतांतरे असे समजण्यात येऊ लागले. 


पाकिस्तानची निर्मिती धर्म आणि राजकारणाच्या आधारावर झाली. स्वतंत्र भारताने लोकशाही शासनप्रणाली स्वीकारली. जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे तयार करण्यात आलेल्या शासनाला चालविण्याच्या प्रक्रियेला राजकारण म्हणतात. आपल्या घटनेत एकीकडे समान अधिकारांची घोषणा केली आहे. 


तर दुसरीकडे समान आचारसंहितेच्या महत्त्वाची उपेक्षा करण्यात आली आहे. म्हणून आज राजकारणात धर्म म्हणजे मतांचा हस्तक्षेप होत आहे. राजकीय पक्ष धर्म आणि जातीच्या आधारावर तिकिटांचे वाटप करतात. आणि धर्माच्या आधारावर मते मागतात. आजचे राजकारण मतांचे राजकारण बनले आहे.


भारतात धर्माला विवादास्पद, निंदनीय, तिरस्कृत जातीयतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम राजकारणाने केले आहे. शहाबानोच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला संसदेद्वारे रद्द केले जाणे एका दुष्ट राजकारणाचेच एक उदाहरण आहे. आपल्या भारतात हिंदू, शिख, ख्रिश्चन इत्यादींनी एकापेक्षा जास्त विवाह केल्यास शासन केले जाते; तर दुसरीकडे


मुसलमान जातीची कोणीही व्यक्ती इच्छा असल्यास कमीतकमी चार विवाह करू शकते. जास्त विवाह जरी केले तरी त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध लागू होत नाही. अल्पसंख्याकांसाठी आपल्या संविधानात विशेष सवलती आहेत. त्यांना धर्म शिक्षण देणा-या शाळा उघडण्याची आणि आपली ओळख दाखविण्याची परवानगी आहे.


आपल्या देशात मुसलमान जात राजकारणाला 'शरियत'च्या आधारावर चालवू इच्छिते. एखादा राजकीय पक्ष मिझोराममध्ये ख्रिश्चनांचे सरकार बनविण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या नावावर मते मागतो; तर एखादा पक्ष हिंदू राष्ट्राच्या नावावर मते मागतो. अशा प्रकारे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप, देशासाठी हानिकारक सिद्ध होत आहे. 


तरीही त्यांस दूर करण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कारण त्यांना त्यांची सत्ता हिसकावली जाण्याची भीती असते. वास्तविक आपल्या देशात सत्तेचे राजकारण चालते. म्हणजेच कोणत्याही प्रकारे सत्ता मिळविणे आणि त्यावर आपला अधिकार ठेवणे.


धर्माचा, राजकारणाचा वास्तविक अर्थ काहीही असो आज प्रचलित असलेल्या धर्माचे राजकारण आपल्या देशासाठी एक संकट बनले आहे. धर्माच्या राजकारणामुळे आपली अखंडता संकटात पडली आहे. म्हणून राजकारणात धर्माचा हस्तक्षेप न होणेच श्रेयस्कर आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद