दहावीतील विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध | DHAVITIL VIDYARTHYANCHE MANOGAT ESSAY MARATHI

दहावीतील विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध | DHAVITIL VIDYARTHYANCHE MANOGAT ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दहावीतील विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मी जर शिक्षणमंत्री झालो, तर शिक्षणातून दहावीचे वर्षच रद्द करीन ! नववीमधून एकदम अकरावीत प्रवेश ! किती सुंदर ! या दहावीचा मला अगदी कंटाळा कंटाळा आलाय. दहावीच्या अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचीच चर्चा जास्त. 


जो येतो तो फक्त उपदेश करतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त दहावीबाबतचा उपदेश भरलेला आहे. जगात सर्वश्रेष्ठ काय असेल, तर ती फक्त दहावीची परीक्षा ! दहावीत नापास झालेलासुद्धा दहावीसंबंधात उपदेश करतो, तेव्हा तर मला मनात हसूच येते.


'समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे ?' असे समर्थ रामदासांनी विचारले आहे. पण मला विचारावेसे वाटते की, दहावीतल्या मुलाकडे परीक्षेचा बाऊ न करता निर्मळ मनाने पाहणारा ' असा सर्व भूमंडळी कोण आहे ?' असा कोणीही नसणार याची मला खात्रीच आहे.


तुम्हांला कल्पना नसेल, पण दहावीची सुरुवात आठवीतच होते. मग टीव्ही बंद. अवांतर वाचन बंद. खेळ बंद. मित्रांबरोबर फिरणे, गप्पा मारणे बंद. दहावीबद्दल कुठेही काही चर्चा चालू असली की, “पाहा, पाहा, नीट ऐक." असे आदश सुटतातच. 


मात्र या चर्चा असतात, त्या जास्तीत जास्त गुण का मिळवायचे यावर. पण 'कसे?' हे मात्र कोणीही सांगत नाही. 'स्पेलिंग पाठच कर' असे सल्ले वारंवार मिळतात. पण स्पेलिंग लक्षात कशी ठेवायची? त्याचे काही नियम आहेत का, हे कोणी सांगत नाही. 


किती गुण मिळाल्यावर कुठे प्रवेश मिळतो? इतके इतके टक्के मिळवणारा विदयार्थी आता अमेरिकेत कसा गेला? त्याला कितीचे पॅकेज मिळाले? ही चर्चा घोळवून घोळवून केली जाते. या सगळ्या वातावरणाचा आम्हां विदयार्थ्यांना किती त्रास होतो, याची कोणालाच कल्पना नाही. 


माझा एक मित्र सचिन हा तर या वातावरणामुळे नैराश्यग्रस्त बनला आहे. समतोल आहार व नियमित व्यायाम या गोष्टी आरोग्य चांगले राखण्यासाठी हव्यात, असे म्हणणे मी समजू शकतो. पण दहावीत चांगले गुण मिळवण्यासाठी या गोष्टी निष्ठेने कराव्यात, असे कोणी सांगितले तर? पण हा त्रासदायक प्रकार सतत चालू असतोच. हे सर्व लोक आमचा दहावीत असण्याचा आनंदच नासवून टाकतात.


तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो. कॅरमच्या खेळात मी रिबाउन्डचा फटका इतका अचूक मारतो की कितीही अडचणीतील सोंगटी मला मिळतेच. एका सोंगटीचा फटका दुसऱ्या सोंगटीला मारून तिसरीच सोंगटी मिळवणे हे कौशल्य आमच्या संपूर्ण शाळेत माझ्याकडेच आहे ! या कौशल्यातून केवढा आनंद मिळतो ! पण याचे कोणालाही कौतुक नसते. सहलीला जावे. 


चांगली दृश्ये पाहावीत. चांगले गाणे मन लावून ऐकायला मिळावे. मित्रांबरोबर थोडेसे नृत्य करायला मिळावे, असे मलाच नव्हे, आम्हां सर्वांना वाटते. पण दहावी ना? सर्व गोष्टी बाद ! मला खरंच प्रश्न पडला आहे दहावीतल्या गुणांवरच सर्व आयुष्य अवलंबून आहे का? 


जगभर कर्तबगारी गाजवणारी माणसे दहावीत शेकड्यांनी गुण मिळवत होती का? आयुष्यात सुंदर, रमणीय, सर्वोच्च सुखाचे म्हणून जे काही असेल, ते फक्त दहावीतल्या गुणांवरच अवलंबून आहे का? आमच्या भावना समजून घेणारा ' असा सर्व भूमंडळी कोण आहे?'  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद