एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

 एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  एका क्रांतिकारकाचे मनोगत  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  नवरात्राचे दिवस होते. रात्रीच्या वेळी एक रिक्शा दाराशी थांबली. रिक्शातून एक गृहस्थ घरात आले. म्हणाले, 'मी, मोहन रानडे.' ते नाव ऐकताच मी तीनताड उडालेच. 


त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी त्यांना आडिवरे' येथे जायचे होते. रात्री त्यांना आमच्याच घरी पत्नीसह आग्रहाने ठेवून घेतले. त्यांची जीवनकथा त्यांच्याच तोंडून ऐकली. स्वदेश-प्रेमाची शिकवण मला बालपणीच मिळाली होती. माझे वडील राष्ट्रीय शाळेत शिक्षक व स्वदेशीचे जाज्वल्य पुरस्कर्ते होते. 


स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा हे माझे 'मानस-गुरु' होते पारतंत्र्याच्या काळात मी व माझे सतंगडी कृष्णेच्या वाळवंटात जोषानं पारतंत्र्य नष्ट करण्याचे पोवाडे म्हणत असू. पोवाडे ऐकत बसलेले एक गृहस्थ म्हणाले, 'मुलांनो, तुम्ही पोवाडे चांगले म्हणता, पण पुढे तुम्हाला फक्त शाहीर व्हायचे आहे का शाहीराला विषय व्हायचे आहे?'शाहीर' की शाहिराला विषय'? 'शाहिराला विषय' व्हायचं मी पक्क केलं.


"भारत स्वतंत्र झाला तरी दीव, दमण, गोवा येथील पोर्तुगीज साम्राज्य कायम होते. या वसाहतींचे भारतात विलिनीकरण घडवून आणण्यासाठी आझाद गोमंतक दलात सामील झालो. प्रथम दादरा-नगरहवेली मुक्त केली. मग इतरत्र हल्ल्यांना सुरुवात केली. अस्नोडे ते हळदोणे एका पाठोपाठ एक हल्ले चढवत गेलो. 


खाणींवर हल्ले केले. बेतीच्या चौकीवर हल्ला करण्याची माझ्या सहकाऱ्यांसह योजना आखली. बेतीच्या चौकीवर सहकाऱ्यांसह येऊन प्रथम ओसरीवर बसलेल्या पाच शिपायांना झोपवले. हेड कांस्टेबलला लाथेनं खाली पाडून चौकीच्या आत प्रवेश केला, पण एवढ्यात मगाशी माझी लाथ खाल्लेच्या हेड कॉन्स्टेबलने माझ्यावर बंदुक रोखली.


 तो दाराआडून माझ्यावर आणि मी व माझे सहकारी त्याच्यावर व इतरांवर गोळ्या झाडत होतो. शेवटी शस्त्रे हातात पडली. आमचा 'बेती'चा बेत यशस्वी झाला. पण हातातून व पोटातून रक्ताची धार वाहात होती. थोड्याच वेळात मी कोसळलो परंतु मला न वाचवता आपले ध्येय गाठण्यास मी त्यांना भाग पाडले.


नंतर शुद्ध आली तेव्हा मी पणजीच्या रुग्णालयात होतो. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. मी जखमी होऊन खाली कोसळलो होतो तरीही डाव्या खांद्यात पोलिसांनी त्यांचे शस्त्र खुपसण्याचं निघृण कृत्य केलं होतं! पुढे खटला उभा राहिला. मला २६ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 


एके दिवशी मला पोर्तुगालमधील लिस्बन येथे नेले गेले. कारावास भोगण्यासाठी त्यातील ६ वर्षे एकांतवास भोगावा लागला. तुरुंगातील अनन्वित छळाचे किंवा शरीरावरील जखमांचे दुःख वाटले नाही. परंतु गोव्याची भूमी स्वतंत्र झाली तरी आम्ही पारतंत्र्यात होतो. गोवा स्वतंत्र झाला तरी माझी सुटका व्हावी म्हणून भारत सरकारने प्रयत्न केले नाहीत. या प्रसंगांची आठवण बेचैन करते.


माझ्या सुटकेसाठी श्री. सुधीर फडके, मेक्सिकन वकिलातीतील अधिकारी वर्ग, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना, असंख्य पोर्तुगीज बंधुभगिनींना प्रयत्न केले. माझी आई व मावशी यांच्या प्रयत्नांना तुलनाच नाही. आपला देश स्वतंत्र झाला असतानाही' आणखी कोणा भारतीयावर 'विजनवास' कंठण्याची पाळी येऊ नये. 


म्हणून मी सतीचे वाण' व 'Struggle Unfinished' अशी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. आडिवऱ्याची महाकाली हे आमचं कलदैवत. माझी सुटका होण्यासाठी माझ्या भोळ्याभाबड्या आईने नवस बोलला होता. मी ते गाव किंवा देवी बघितली नाही. परंतु आमच्या सौभाग्यवतींच्या आग्रहामुळे आज आडिवऱ्याला निघालो आहे. पण रात्री पुढे जायला गाडी नसल्याने तुम्हाला त्रास द्यावा लागला!"


एवढे बोलून ते थांबले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर फक्त ह्यांनाच स्वातंत्र्यवीर' ही पदवी दिली गेली, हेही त्यांच्या पत्नीकडून समजले. शूर, धाडसी, निगर्वी, निर्लोभी, शांत, सुस्वभावी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला एक क्रांतिकारक माझ्या घरी आला, म्हणून मी स्वत:ला धन्य' समजले. (सत्य घटना) मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद निबंध 2

एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

पनवेलजवळील 'शिरढोण' गावी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक पाहण्यासाठी शाळेतल्या मुलांची सहल आली होती. स्मारकाला वंदन करून स्मारकाजवळ मुलांना बसवून शिक्षक स्मारकासंबंधी व वासुदेव बळवंतासंबंधी माहिती सांगत होते. 

तितक्यात स्मारकाच्या खोलीतून एक वयोवृद्ध गृहस्थ पुढे आले. त्यांच्या हातात काठी नव्हती. ते पाठीत फार वाकलेही नव्हते, पण त्यांचे कापसासारखे पिकलेले केस व चेहऱ्यावरच्या असंख्य सुरकुत्या त्यांचे वय सांगत होत्या. ते बोलू लागले.

"माझे नाव भाऊसाहेब पाटणकर. बाळांनो, तुमच्यापैकी एका मुलाचा प्रश्न मी ऐकला आणि मला तुमच्या पुढे यावेसे वाटले. तुम्हांला क्रांतिकारक पाहायचा होता ना ! वासुदेव बळवंताच्या एवढा मोठा किंवा भगतसिंग, सुखदेवाच्या इतका श्रेष्ठ मी नाही, पण मला अभिमान आहे की मी त्यांच्याच वंशातला आहे."


"त्यांच्याच वंशातला ?" आमच्यातला प्रदीप भिडे नावाचा मुलगा म्हणाला, “या साऱ्यांचे वंश एकच कसे असतील ?'“एकच बाळा !” भाऊसाहेब पुढे बोलू लागले. मुलांनो लक्षात ठेवा, खऱ्या क्रांतिकारकाला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. वासुदेव बळवंतपासून मदनलाल धिंग्रांपर्यंत सर्वाची जात एकच. ज्वलज्ज्हाल क्रांतिकारकाची.


वासुदेव बळवंताच्या आधी इ.स. १८५७ मध्ये भारतात मोठे स्वातंत्र्यसमर झाले ते तुम्ही वाचले असेल. त्याचप्रमाणे वासुदेव बळवंतांच्या नंतर मोठे क्रांतिकारक निर्माण झाले ते स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेमुळे. 

मी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. आपल्या स्वतःच्या सुखाची, शिक्षणाची, मानमरातबाची, आम्हांला कधीच पर्वा नव्हती. त्याचप्रमाणे आमच्या घरादाराची किंवा आमच्या कुटुंबकल्याणाची काळजी आम्ही कधीच केली नाही. पत्नीचे प्रेम किंवा दोस्तांची दोस्ती यांचा मोह आम्हाला कधी पडला नाही.


सेनापती बापटांबरोबर मी प्रथम सशस्त्र क्रांतीत भाग घेतला. त्याचप्रमाणे गुप्त मार्गाने निरनिराळ्या पुढाऱ्यांना शस्त्रे पोचविण्याचे काम केले. बापटांच्या मार्गदर्शनानुसार पुढे १९४२ साली 'चले जाव' चळवळीत मी भाग घेतला आणि मला तुरुंगातच जावे लागले. 


त्यावेळी मी येरवडा जेलमध्ये होतो. माझ्याबरोबर अनेक मोठमोठे पुढारी त्या तुरुंगात होते. त्यावेळी तुरुंगातच आम्ही गुप्त पत्रके काढायचो. बाहेरच्या बातम्या मिळवून तुरुंगातल्या पुढाऱ्यांना सांगायच्या व तुरुंगातल्या हालचाली जेवण घेऊन येणाऱ्या माणसाबरोबर गुप्त रीतीने बाहेर कळवायच्या हे माझे काम होते.


या कार्यात मी घरदार, शेतीवाडी, शिक्षण व चांगली नोकरी यावर पाणी सोडले. हे सारे अर्थातच आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ! पण माझ्याखेरीज इतर काही जण तुरुंगातच हाल होऊन मरण पावले. त्यांनी आत्मबलिदान केले.


खंत एवढीच वाटते की आम्ही त्या काळी जो त्याग केला त्यामुळे हे भारतीय स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव फारच थोड्यांना आहे. सध्याच्या पुढाऱ्यांना सत्यापेक्षा सत्ता मोठी वाटते. - त्यागाचे नाव नाही. उलट हे पुढारी लाचलुचपत, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि चोरटा व्यापार व्यवहार यात आकंठ रुतलेले आहेत. 


सुमारे १२५ वर्षे झगडून, असंख्य क्रांतिवीरांच्या बलिदानांतून स्वातंत्र्य मिळालेला हा देश आता जागतिक बँकेकडे गहाण पडणार की काय अशी भीती वाटतेय. बाळांनो, तुम्ही लहान व निष्पाप आहात. तुम्ही तरी आपल्या देशाला या संभावित व संधिसाधू तस्करांच्या हातून सोडवा. आपल्या देशाची शान सांभाळा. भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा राखा.


थोडा वेळ का होईना, पण माझं हृदय तुमच्या जवळ उघडं करण्याची संधी तुम्ही मला दिलीत याबद्दल धन्यवाद." असे म्हणून भाऊसाहेब पाटणकर जरासुद्धा न थांबता स्मारकाबाहेर पडून रस्त्याला लागले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.