स्वातंत्र्याची पन्नास वर्षे मराठी निबंध | Essay on Independence Fifty Year Essay Marathi

 स्वातंत्र्याची पन्नास वर्षे मराठी निबंध | Essay on Independence Fifty Year In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्याची पन्नास वर्षे मराठी निबंध बघणार आहोत. 


जगी घुमवारे दुमदुमवारे भारतगौरवगान। 

या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान।

उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल अमुचा देश महान॥ 


प्रत्येक भारतीयाने गौरवोद्गार काढावेत अशी ही आमची मायभूमी आहे. आपल्या भारताला अतिशय प्राचीन अशी थोर परंपरा आहे. ही भारतमाता दुर्गा बनून शत्रूचे निर्दालन करणारी व्हावी, लक्ष्मी बनून कुबेराचे वैभव आणणारी व्हावी आणि सरस्वती बनून ज्ञानगंगेचा प्रवाह देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणारी व्हावी, 


असे उदात्त स्वप्न अनेकांनी पाहिले आणि देशाची सार्वत्रिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न झाले. आज देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पुरी झाली आहेत. स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे सुराज्य व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. देशाच्या इतिहासात ५० वर्षे म्हणजे फार मोठा काळ नाही. 


तरीही या निमित्ताने ५० वर्षांतील प्रगतीचा, कामगिरीचा आढावा घेणे योग्य ठरेल. आपण एकेका क्षेत्रातील प्रगती पाहात जाऊया. मनुष्यबळ विकासासाठी नवनव्या योजना राबवल्या जात आहेत. साक्षरतेत वाढ होत आहे. शिक्षणाचा प्रसार खेडोपाडीही झाला आहे. 


मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्त्रियांनाही साक्षर बनवण्यासाठी खास प्रयत्न चालू आहेत. मुलींना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विनामूल्य देण्याची तरतूद आहे. तसेच आरोग्यविषयक सुखसोयींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. प्लेग, देवी


अशा रोगांचे उच्चाटन झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फार मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे महत्त्वाचे काम आज हाती घेतलेले आहे. यातून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास यांसंबंधी अनेक योजना राबविल्या जात आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. 


युवकांसमोरील बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योगसंस्था, शिक्षणसंस्था, विज्ञान-तंत्रज्ञान यांचे सहाय्य घेतले जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पं. नेहरूंनी 'आधुनिक भारताची नवी मंदिरे' उभारायला सुरुवात केली.


अवजड यंत्रे बनविण्याचे कारखाने, आगगाडीचे डबे, इंजिने, लोखंड व पोलाद, रासायनिक खते, लाकडी साहित्य, जहाजबांधणी इ. सर्व प्रकारचे कारखाने आज भारतात सुरू झाले आहेत. भाक्रानांगल सारखे प्रचंड प्रकल्प, जवळजवळ प्रत्येक विषयाला वाहून घेतलेल्या प्रयोगशाळा, अणुऊर्जा प्रकल्प हे सारे गेल्या ५० वर्षांत उभे राहिले आहे. 


आज आपण अणुबाँबचा स्फोट सर्वस्वी स्वत:च्या हिमतीवर केला आहे, क्षेपणास्त्रे बनवली आहेत. आमचे उपग्रह अवकाशात कार्यरत आहेत. संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये भारत आघाडीवर आहे. तेव्हा आधुनिक भारताच्या मंदिरांमधला देव बऱ्यापैकी पावला आहे, असे म्हणायला हरकत नाही.


भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ७० टक्के लोक खेड्यात राहतात. म्हणून शेतीतूनच देशाचा विकास होईल यात शंका नाही. गेल्या ४-५ दशकांत कृषितंत्रात झालेली प्रगती, पाणीपुरवठ्याच्या योजना, खते व बी-बियाणे यांचा पुरवठा, कृषिविद्यापीठांची स्थापना, यांसारख्या मार्गाने भारताने कृषिक्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे.


लागवडक्षेत्र वाढले असून अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. फलोत्पादनाच्या बाबतीतही भारताने मोठा पल्ला गाठला आहे. याचबरोबर रेशीम उत्पादन, फळप्रक्रिया, शेळीपालन, कोळंबी संवर्धन, दुग्धव्यवसाय अशा शेतीशी संबंधित व्यवसायांचाही विकास होत आहे.


संरक्षणाबाबतही भारतात दूरगामी विचार चालू आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी सीमांवर कडेकोट बंदोबस्त, प्रभावी गुप्तहेर यंत्रणा, कार्यक्षम व जागरूक सुरक्षादले यांची चोख व्यवस्था आहे. बाह्य आक्रमणापासून देशाचा बचाव करण्यासाठी सेनादलांचे सामर्थ्य वाढविणे, त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविणे, नवी शस्त्रे देशातच विकसित करणे आदी बाबतीत ठोस पावले उचलली जात आहेत. 


भारताजवळ यांत्रिक पायदळाची एक तुकडी आहे, एक विमानवाहू नौका आहे. सध्या पाकिस्तान व चीनने एकत्रितपणे भारतावर आक्रमण केले तरी ते परतवून लावण्याची सिद्धता भारताजवळ आहे. पोखरण येथे अणुस्फोट करून भारताने आपल्या आण्विक सामर्थ्याचे परिपूर्ण प्रदर्शन जगाला घडविले आहे, देशाच्या मस्तकी मानाचा तुरा चढविला आहे.


असे असूनही जे साध्य केले त्याहीपेक्षा अधिक अनेक गोष्टी साध्य करावयाच्या आहेत. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवावयाचे आहे. शिक्षणप्रसाराचे कार्य अधिक जोमाने करावयाचे आहे. स्त्रियांवरील अत्याचार, हुंडाबळी यांचे, तसेच जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद, धर्मभेद यांचे उच्चाटन करावयाचे आहे. 


दारिद्रयाशी झुंज द्यावयाची आहे. भ्रष्टाचाराला आळा घालावयाचा आहे. ही सर्व आव्हाने पेलण्याचे काम जबाबदार तरुण पिढीनेच करावयाचे आहे. जपानप्रमाणे शिस्तीने व कष्टाने काम करावयाचे व्रत आम्ही घेतल्यास स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आम्ही अधिक आनंदात साजरा करू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद