गरिबी एक शाप मराठी निबंध | Garibi Ek Shaap Marathi Nibandh

 गरिबी एक शाप मराठी निबंध | Garibi Ek Shaap Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  गरिबी एक शाप मराठी निबंध बघणार आहोत. असे म्हणतात की, 'दुर्बलता शाप असेल तर गरीब असणे पाप आहे' स्वत:चेच रक्त पिऊन स्वत:साठीच रडणे आहे. कोणत्याही विकसनशील राष्ट्रासाठी गरीब असणे हा शाप आहे. 


आधुनिक भारत आज याच शापाला तोंड देत आहे. भारताच्या नवानिर्मिती प्रक्रियेमध्ये गरिबीमुळे बाधा उत्पन्न होते. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या साधनांच्या अभावी मनुष्य पाप करण्यास प्रवृत्त होतो. हा साधनांचा अभाव गरिबीमुळे निर्माण होतो. 


गरिबी म्हणजे अशी आर्थिक स्थिती ज्यात व्यक्ती जगण्यासाठी मूलभूत साधने मिळविण्यात असमर्थ ठरते. अर्थशास्त्रज्ञांनी गरिबीचे मोजमाप करण्यासाठी अनेक प्रकारचे मापदंड तयार केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दरडोई उत्पन्न. 


एखाद्या वर्षातील संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाला त्याच वर्षाच्या एकूण लोकसंख्येने भागून जे उत्तर येते ते दरडोई उत्पन्न. सध्याची महागाई पाहिल्यास दरडोई उत्पन्न कमी असल्याचे दिसून येते. यात श्रीमंतांच्या उत्पन्नाचाही समावेश आहे.


यावरून आपण असे अनुमान लावू शकतो की फारच कमी उत्पन्नात व्यक्तीला कोणत्या गरजा पुया करता येतात आणि त्याच्या उपभोगाचा स्तर काय असेल? दरडोई उत्पन्नावरून हे कळते की खूप मोठ्या लोकसंख्येला गरिबीत जीवन कंठावे लागते. ज्या व्यक्तीला दररोज २४०० कॅलरीपेक्षा कमी अन्न मिळते ती व्यक्ती गरीब समजली जाईल.


भूक ही मानवाची सर्वात मोठी दुर्बलता आहे. गरिबी माणसाला अज्ञानी बनविते. त्याला खऱ्याखोट्यातील अंतर कळत नाही आणि मग तो पापाच्या मार्गावर चालू लागतो. आपल्या जिवाचे रक्षण करणे एवढे एकच ध्येय गरिबापुढे असते. ज्याप्रमाणे विश्वामित्र ऋषींनी दुष्काळात आपली भूक भागविण्यासाठी चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाल्ले होते. आर्य चाणक्याच्या मते.


अपुत्रस्य गृहं शून्यं दिशः शून्यास्त्वबान्धवाः।

मूर्खस्य-हृदयंशून्यं सर्वशून्य दरिद्रता॥" 


अर्थात्, पुत्रहीनाचे घर सुने होते. ज्याला भाऊ नसतात त्याच्यासाठी दिशा सुन्या होतात. मूर्खाचे हृदय सुने असते. म्हणजेच गरिबासाठी घर, दिशा हृदय सारे जगच सुने होते. चाणक्याला गरिबीपेक्षा वनवास चांगला वाटत असे. त्यांचे असे मत होते की, व्यक्ती भयंकर वाघ, सिंह, हत्ती असणाऱ्या वनात गेला आणि तिथे एखाद्या झाडाखाली गवतावर झोपला. 


रानटी फळे खाल्ली, तिथलेच पाणी प्याला, वल्कले नेसला तरी ठीक पण आपल्या समाजात भाऊबंदांमध्ये गरिबीत जगणे चांगले नाही. निर्धन माणसाचा आदर कुटुंब किंवा समाज कुणीच करीत नाही.


भारतात राजकीय कारणामुळे गरिबी आहे. आपल्या २०० वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी भारताचे शोषण केले. त्यांच्या नीतीमुळे भारतीय उद्योगधंदे नष्ट झाले. शेती विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी भारतातील संपत्ती लुटून इंग्लंडला नेली व जाताना आपल्या हातात गरिबीची झोळी दिली. 


गरिबीचे दुसरे प्रमुख कारण सामाजिक आहे. यात जातिप्रथा आणि एकत्र कुटुंबपद्धती उल्लेखनीय आहे. जातिव्यवस्था श्रम विभाजनावर आधारलेली होती. जी नंतर एक सामाजिक दोष बनली. कनिष्ठ वर्गाचे शोषण दिवसेंदिवस वाढतच गेले. 


एकत्र कुटुंब-व्यवस्था आर्थिक प्रगती अडथळा ठरली. कारण यात व्यक्तिगत साहसाची भावना दुर्बल होते, याखेरीज अशिक्षितपणा, रुढीप्रियता, अंधविश्वास, सामाजिक रीतिरिवाज, अज्ञान, दैववादी वृत्ती इत्यादी मुळे भारतीय गरीब होत आहे. 


धार्मिक विचारांमुळेही लोक अल्पसंतुष्ट राहून आयुष्य धालवू इच्छितात. “साधी राहणी उच्च विचारसरणी" ची भावना विकासात अडथळा बनते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याजवळ त्याचा व त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होऊ शकेल एवढी जमीन नाही. 


शेतीकाम पण वर्षभर चालू नसते. परिणामी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्याला सहा महिने तरी बेकार राहावे लागते. शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्याच दुर्बल असतो. असे नसून तो आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यातही असमर्थ असतो. 


अशा व्यक्तींना सामाजिक न्यायही मिळत नाही. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारतात गरीब निर्माण झाले. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे बेरोजगारी वाढली. शेतीवर लोकसंख्येचा जास्त भार पडला. त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी झाले.


भारतात दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे लोकांची बचतशक्ती कमी आहे. म्हणून देशात भांडवलाचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे औद्योगिक विकास व शेतीच्या विकासाची गती मंद झाली. उत्पादन व उत्पन्नाचा स्तर खालावतो. यामुळे भांडवलाचा अभाव गरिबी वाढवितो. 


भारतातील गरिबीचे आणखी एक कारण आहे. उत्पन्नाचे असमान वितरण. देशातील एकूण उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा मूठभर भांडवलदारांच्या हातात केंद्रित झाला आहे. तर बहुतांश लोक गरिबीत जीवन जगत आहेत. प्राचीन काळापासून चालत आलेली वेठबिगारीची पद्धत अजूनही चालूच आहे. 


याची कल्पना आपणास प्रसार माध्यमांवरून येते. वेठबिगार कामगाराची स्थिती जनावरासारखीच असते. मालक त्यांचे रक्तशोषण करतात. त्यांच्याकडून खूप काम करवून घेतात. जर ता मेला तर त्याची बायकामुले मालकाची गुलामी करतात. हीच प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे.


मागील काही वर्षांत सरकारने वेठबिगारी कामगारांना मुक्त केले आहे पण त्यांच्यासाठी रोजगाराची काहीच व्यवस्था केलेली नसल्यामुळे ते गरिबीची शिकार होतात.एखादा गरीब माणूस जेव्हा रोजगार मिळवू शकत नाही तेव्हा त्याला नाइलाजाने भिकारी व्हावे लागते.


"टीचभर पोट भरण्यासाठी मूठभर अन्नालाही महाग असलेला भिकारी आपली फाटकी झोळी पुढे करून भीक मागतो तेव्हा मानवतेच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात।" गरिबी दूर करण्यासाठी सरकारने पंचवार्षिक योजना सुरू केल्या. मागासलेल्या वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने आर्थिक मदत केली. 


त्यामुळे ते आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील. शिकलेल्या तरुणांना बँकेद्वारे कमी व्याजावर कर्ज दिले जाईल व त्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त केले जाईल. भारत सरकारने ग्रामीण भूमिहीनांसाठी नोकरी' ची घोषण केली. ज्याच्या अंतर्गत भूमिहीन कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल. 


याच योजनेद्वारे शेतीच्या सिंचनासाठी कालवे, रस्ते, वृक्षारोपण, पडीक जमिनीचा विकास कार्यांत उपयोग ही कार्ये केली जातील. गरिबीतून सुटका करण्यासाठी सर्वप्रथम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविणे, भांडवलवृद्धी, उत्पन्नाचे समान वितरण आर्थिक योजनांद्वारे आर्थिक विकास होईल. 


आपले राष्ट्रीय उद्दिष्ट "प्रत्येकाला अन्न आणि प्रत्येकाच्या हातांना काम" पाहिजे हे साकार होईल. जर आपण या योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर एक दिवस आपण सगळे संपन्न बनू, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला दारियरेषेच्या वर आणून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद