हसरे घर मराठी निबंध | HASRE GHAR ESSAY MARATHI

 हसरे घर मराठी निबंध | HASRE GHAR ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हसरे घर मराठी निबंध बघणार आहोत. मी दैनंदिन कटकटींना वैतागलो, कामाने शिणलो की, तडक एस्. टी. पकडून माझ्या मित्राच्या घरी जातो. मित्राचं घर एका खेड्यात आहे. लहानसंच घर, मातीच्या भिंती, स्वच्छ सारवलेलं अंगण आणि फक्त दोन खोल्यांचं घर मला फार आकर्षित करते. 


अंगणातलं तुळशीवृंदावन व दारातली सुंदर रांगोळी प्रवासाचा शीण नाहीसा करते. दारात भला बघून 'या दादा', 'मामा', 'भाऊ' असं काहीतरी म्हणून कोणीतरी मनापासून स्वागत करतं. लगेच पाय धुवायला मोठ्या लख्ख तांब्यातून गरम पाणी व प्यायला थंडगार ‘गूळ व पाणी' हजर. 


हळूहळू घरातील सर्व मंडळी आपल्या हातातली कामे ठेवून विचारपूस करायला येतात. व आपापल्या परीनं स्वागत करतात. तोपर्यंत थेंबभर दध घातलेला, कमी साखर घातलेला गरम गरम चहा येऊन पोचतो. पण तोही फार रुचकर लागतो.


या दोन खोल्यातील घरात पाच-सहा लहान मुले व नऊ-दहा मोठी माणसं मोठ्या आनंदाने शिस्तीत राहातात. सर्वांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध. घरात वावरणाऱ्या सास्वा-सुना की लेकी सुना, जावा-जावा की बहिणी-बहिणी असा प्रश्न पडावा अशी आपुलकीची वागणूक. कधी भांडण-तंटा नाही की हेवादावा नाही. 


कामाला सर्वजण पुढे पण उपभोग घ्यायला जो तो मागेमागे. त्यामुळे एकमेकांना प्रेमळ आग्रह करत आनंदाचा उपभोग घ्यायची रीत.


घरातील कामं ही कर्तव्यभावनेतून हसत-खेळत सहकार्यानं पार पाडली जातात. कितीही पाहुणे येवोत; कधी कोणाच्या कपाळावर आठी नाही. फक्त चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. सर्वांचे हात कामात दंग व तोंडानं गप्पा-टप्पा चालू, त्यामुळे पाहुण्यांना परकेपणा वाटत नाही की कंटाळा येत नाही. 


गप्पांतही कोणाच्या चहाड्या नाहीत की उखाळ्यापाखाळ्या नाहीत. निर्भेळ हास्यविनोद, थट्टामस्करी. इकडच्या तिकडच्या गमती-जमती! या गडबडीत पाहुण्यांच्या सुग्रास भोजनाचे बेत कसे गुपचुप आखले जायचे त्याचा पत्ताच लागायचा नाही. भूक लागण्यापूर्वीच सुग्रास जेवण तयार असायचं. 


सर्वांनी एकदम, हसत-खेळत, गप्पा मारत गोल करून जेवणं. कोणी आधी नाही की कोणी नंतर नाही. त्या सहभोजनात जेवणाचा केव्हा चट्टामा व्हायचा कळायचं नाही. परत सर्व हात कामाला लागून झटपट आवराआवर.


कितीही दिवस राहिलात तरी आणखी राहण्याचा आग्रह व निघून जाताना, लाडू, चिवडा, घारगे अशा खाऊनी भरलेली पिशवी हातात यायचीच. तृप्त मनाने-जाताना, हरवलेले गवसले' अशा प्रकारचे समाधान सोबतीला असते. त्यामुळे केव्हाही दैनंदिन कटकटीला वैतागलो, कामाने शिणलो, की मी त्या माझ्या हसऱ्या घराची वाट धरतो!मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद