जीवन त्यांना कळले हो मराठी निबंध | Jeevan Tyana Kalale Ho Marathi Nibandh

 जीवन त्यांना कळले हो मराठी निबंध | Jeevan Tyana Kalale Ho Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जीवन त्यांना कळले हो मराठी निबंध बघणार आहोत. माणसे जन्माला येतात, मरतात. परंतु खऱ्या अर्थाने ती जीवन जगत नाहीत. जीवन म्हणजे कडू औषधाचा घोट नाही की जो डोळे मिटून गटकन पिऊन टाकावा. 


जीवन म्हणजे चवीचवीने खाण्याची गोष्ट आहे. आंबट, गोड, खारट, तुरट अशी विविध प्रकारची चव जीवनाची आहे. सर्व चवींचा अनुभव आला तरच जीवनाचा खरा अनुभव येईल. कोणाला या जीवनाचा इतका वैताग येतो की, या जीवनापासून मुक्ती मिळविण्यासाठी ते लोक चक्क आत्महत्या करतात. या अमोल जीवनाचा नाश करतात. 


कारण कसे जगावे हेच त्यांना समजलेले नसते. जगण्यात खरी मौज आहे. जीवनात आनंद भरलेला आहे. अगदी साध्या गोष्टीतही आनंद आहे. पण त्या आनंदाचा आस्वाद घेता आला पाहिजे. सूर्योदयाचा रम्य देखावा, फुलांनी बहरून आलेले झाड, धो धो कोसळणारा पाऊस, हिरवीगार सृष्टी वाऱ्यावर डोलणारी, सळसळणारी शेते, कूजन करणारे पक्षी या सगळ्यात आनंद दडून बसला आहे. फक्त तो शोधला पाहिजे.


दिवसभर कष्ट केल्यावर छंद म्हणून गीताचे सूर सतारीवर छेडण्यात, आवडीच्या पुस्तकाचे वाचन करण्यात, भरतकाम, वीणकाम करण्यात किंवा दूरदर्शनवरील एखाद्या मालिकेचा आस्वाद घेण्याने जो जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यालाच जीवन कळले असे म्हणावे लागेल. 


जीवनात कष्ट, व्याप, संताप आहेतच, परंतु याही पसाऱ्यात छंदाद्वारे विरंगुळा शोधता आला पाहिजे. एखाद्या कलेची साधना करणारे कलावंत आपल्या कुंचल्याने जीवनात त-हेत-हेचे रंग भरतात, मधुर संगीत निर्माण करतात. संशोधक शोध लावण्यात इतके तल्लीन होऊन जातात की, त्यांना तहान, भूक, सुख, दुःख यांची जाणीव होत नाही.


दुसऱ्याच्या सुखासाठी धडपडणारी, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारी, त्यांचे दुःख दूर करणारी माणसे खऱ्या अर्थाने जीवन जगतात. स्वत:च्या दुःखातही आनंदी असणारी, स्वत:च्या जीवनाची रडकथा न गाणारी माणसे इतरांनाही सुखी करतात, मी जेव्हा जीवनाचा विचार करते तेव्हा मला 'आनंद' सिनेमाची आठवण येते. 


स्वत: कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने पछाडलेला मनुष्य कसा आनंदाने जीवनाचा आस्वाद घेतो. जीवनाचा निरोप घेतो हे पाहण्यासारखे आहे. 


स्वत:ला मूल नसले तरी दुःखी न होता अनाथ बालकांवर वात्सल्याचा वर्षाव करणारी माता, स्वत:च्या संपत्तीचा काही भाग गरजू व गरीब लोकांसाठी खर्च करणारी माणसे, ध्येयासक्त माणसे, मातृभूमीसाठी हसत हसत फासावर जाणारे हुतात्मे, स्वत: फासावर जातानाही 'भेटेन नऊ महिन्यांनी' असं म्हणून आईचे सांत्वन करणारे, आईला धीर देणारे खरोखरच धन्य होत.


स्वार्थ सगळ्यांनाच कळतो. पण जे स्वत: पोटभर जेवून दुसऱ्यांसाठी आपल्या घासातला घास ठेवतात, दुःखी माणसाचे अश्रू पुसतात, दुसऱ्यासाठी, तत्त्वासाठी, सत्यासाठी हसत हसत प्राण देतात त्यांनाच खरोखर जीवन कळलेले असते. आपल्या मरणाने ते चिरंजीव झालेले असतात ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद