कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध | KAVI SHABDH SUSHTICHE ISHVAR ESSAY MARATHI

 कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध | KAVI SHABDH SUSHTICHE ISHVAR ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. भोज प्रबंधामध्ये कवी बल्लाळ यांनी सुरस कथा वर्णन केली आहे. भोजराजाच्या सभेत कालिदासाला ठठं ठठवं तळतं ठठष्ठंः। हा चवथा चरण दिला निरर्थक अक्षरांचा, परंतु कवी म्हणजे शब्दसृष्टीचे ईश्वर व कालिदास तर कविकुलगुरु! त्याने लगेच सुरुवातीचे तीन चरण रचून समस्या पूर्ण केली.


रामाभिषेके जलम् आहरन्त्याः । 

हस्तात् च्युतः हेमघट: युवत्याः।

 सोपानमार्गेण करोति शद्वं। 

ठठं, ठठष्ठः, ठठठं, ठठष्ठठ॥


रामाला अभिषेक करण्याच्या प्रसंगी पाणी आणणाऱ्या एका युवतीच्या हातून सोन्याचा घडा निसटून पडला. तो पायऱ्यावरून आवाज करीत गेला- ठठं- ठठष्ठंः, ठठठं, ठठष्ठः। "कविता करणे' येरागवाळ्याचे काम नाही. केशवसुत सांगतात 


"कविता म्हणजे आकाशातली वीज आहे. तिला धरू पाहणारे नळ्याणऊजण होरपळून जातात.' शंभरात एखादाच खरा कवी निर्माण होतो. Poets are born, not made! अलौकिक काव्यशक्ती असणारा कवी शब्दसृष्टीची शब्दांनी पूजा बांधणारा भक्त व ईश्वरही. तुकाराम महाराजांनीही म्हटलं आहे. शचि आमुच्या जीवाचे जीवन !


या जगात महाकवी व्यास, कालिदास, वाल्मिकी, वर्डस्वर्थ, टेनिसन, केशवसुत, कुसुमाग्रज, यशवंत, भा. रा. तांबे. असे प्रतिभाशाली कवी नसते तर? हे जीवन किती नीरस, रुक्ष वाटले असते. केशवसुत ठणकावून सांगतातच  आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे. आम्हाला वगळा विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


कवी आपल्या प्रतिभेच्या बलावर आकाशात विहार करतात व दिक्कालाला भेदन त्याच्याही पलीकडच्या गोष्टी पाह शकतात. कवी संवेदनाशील असतात, म्हणून साध्याही गोष्टीत- विषयात त्यांना आशय सापडतो. म्हणून बालकवींसारखे कवी एका उमलत्या कळीला नववधू समजून सूर्यकिरणाबरोबर, तिच्या विवाहाचा रम्य


सोहळा शब्दांनी उभा करतात. बुद्धीला खाद्य व मनाला शांती देतात, कवीचे अंत:करण कोमल असते, हृदय उललेले, फाटलेले विदीर्ण झालेले असते म्हणूनच त्यांच्या हृदयातून spontaneous overflow of feelings उत्स्फूर्त भावनावेग बाहेर पडून करुण, वीर, शृंगार किंवा हास्यरसाचे फवारे रसिकांवर उडू लागतात. 


रसिक त्यात न्हाऊन तृप्त होतात. पोर खाटेवर, क्षणोक्षणी उठे, भेटून नऊ महिन्यांनी किंवा गर्जा जयजयकार, जयोस्तुते श्री महन्मंगले, कोठून हे आले येथे, काल संध्याकाळी नव्हते-' इ. कवितांच्या ओळी रसिकांच्या हृदयात ठाण मांडून बसतात. त्याला आनंद देतात, रंजन करतात, धुंद करून सोडतात.


कवी शून्यातून सुरेल संगीत निर्माण करतात. पावित्र्य, मांगल्य यांचे दर्शन घडवतात. मनातील अर्थ, भाव, नीटनेटक्या शब्दाने मांडतात. बाल्यातील उत्छंखल वृत्ती, तारुण्यातील उंच पहाड, वार्धक्यातली खोल दरी कवीच्या प्रतिभेला अडथळा करू शकत नाही. 


रूपगर्वितेसारखी ती धावत जाते. कवी शदूसृष्टीचे शिल्पकार आहेत. ईश्वर आहेत. भर्तृहरीने नीतिशतकात कवींविषयी काढलेले उद्गार किती सार्थ आहेत.


जयन्ति ते सुकृतिन: रससिद्धाः कवीश्वराः। 

नास्ति येषां यश: काये जरामरणजं भयम्॥


(ज्यांच्या कीर्तिरूपी शरीराला म्हातारपण व मृत्यू यांचे भय नसते, असे हे पुण्यशील [नवरस] रस निर्माण करण्यात सिद्धी मिळालेले श्रेष्ठ कवी जयशाली असतात.) श्रेष्ठ, रसपूर्ण वाङ्मय व ते निर्माण करणारे कवी अजरामर असतात! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2

 कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध | KAVI SHABDH SUSHTICHE ISHVAR ESSAY MARATHI


“आता वंदू कवेश्वर । 

जे शब्दसृष्टीचे ईश्वर । 

नातरी हे परमेश्वर । 

वेदावतारी ॥"

या शब्दात समर्थ रामदास स्वामींनी कवींचा गौरव केला आहे. इतकेच नाही तर दासबोधातील एक संपूर्ण समासच त्यांना बहाल केला आहे. या प्रतिभावंतांचे वर्णन करताना त्यांची काव्यसरिता दुथडी भरुन वाहिल्यास नवल नाही. 'बोलके चिंतामणी', 'कामधेनूचे दुग्ध', 'प्रतिभेचे कल्पतरू', 'सृष्टीचा अलंकार', 'लक्ष्मीचा शृंधार' अशी एकापेक्षा एक सरस बीरुदे ते कविश्रेष्ठांना प्रदान करतात. 'ज्योतीने तेजाची आरती' करावी असा हा अपूर्व योगायोग !


ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता, महर्षी विश्वामित्र प्रतिसृष्टीचे जनक तर कवी शब्दसृष्टीचे शिल्पकार ! शब्द त्यांचे बंदे, हुकुमाचे ताबेदारच ! शब्दांना हवे तसे वाकविण्याचे सामर्थ्य कवीमध्ये असते. शब्द हेच त्यांचे धन, शस्त्र. दैवत सारे काही असते. 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन' या शब्दात संत तुकारामांनी शब्दांचा ऋणनिर्देश केला आहे.


विधात्याच्या इच्छेशिवाय दृश्य सृष्टीतील पानही हलत नाही. शब्द सृष्टीत मात्र कवीच्या इच्छेला, कल्पनेला, विचाराला, भावनेला प्राधान्य असते. कवीच्या मनात जे असेल ते आणि तेच या सृष्टीत घडणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. 'आले कवीच्या मना, तेथे कोणाचे चालेना' असाच अनुभव येतो.


कवीला कशाचेच बंधन नाही. दिशा, काळ इतकंच काय तर कारागृहाच्या भिंतीसुद्धा या प्रतिभावंतांना रोखू शकत नाहीत. लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य', विनोबाजींची ‘गीताप्रवचने', स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'कमला' इत्यादी रचना याची साक्ष देतात. 


प्रतिभेच्या बळावर, भूतकाळाच्या अथांग महासागरात डोकावण्याचे तर भविष्यकाळाच्या क्षितीजाचा वेध घेण्याचे सामर्थ्य कवीजवळ असते. 'दिक्कालातून आरपार अमुची दृष्टी पाहाया शके' या ओळीतून केशवसुतांनी हेच सूचित केलं आहे. 


सहस्त्रचक्षू सूर्यालाही जे दिसणे कठीण ते कवी अंतःचढूंनी पाहू शकतो. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' असं अलौकिक द्रष्टेपण त्याला लाभलं असतं. नियंत्याची सृष्टी म्हणजे सुखदुःखांचे कडुगोड मिश्रण ! 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे' असा प्रत्यय देणारी ! कवीची सष्टी मात्र काही औरच ! 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे'असं गायला लावणारी ! निर्भेळ सुखाची लज्जत चाखायला देणारी ! काव्याची निर्मितीच मुळी ‘सद्यः परनिर्वृत्ती' साठी झाली आहे. 'स्वानंद' हे केवळ कवीचेच नाही तर रसिकांचेही उत्तम पारितोषिक आहे. काव्यानंदाला 'ब्रम्हानंदसहोदर' म्हणतात ते उगीच नाही. 'पाणिस्पर्शच आमुचा शकतसे, वस्तूंप्रती द्यावया सौंदर्यातिशया, अशी वसतसे, जादू करांमाजि या'


हे केशवसुतांनी केलेलं वर्णन अक्षरशः खरं आहे. त्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नाही. कवीच्या हातात अशी काही किमया असते की वर्ण्य विषय कितीही हिणकस असला तरी त्याचं सोनं होऊन जातं. म्हणूनच 'ऐक ते हास्य ते दंत दाढा पहा मरुनि हस्ती जणू भरुन गेली गुहा'हे अभद्र, घृणास्पद अशा ताटिकेचं वर्णनही रसिकाला मोहवितं. वाटतं, श्रीरामांच्या हातून ताटिकेचा उद्धार झालाच पण ग. दि. माडगूळकरांच्या प्रतिभेच्या स्पर्शाने तिला अमरत्व प्रदान केले. स्वप्न सृष्टीप्रमाणे या सृष्टीतही विहार करायला पायपीट करावी लागत नाही की वाहनाचा खर्च नाही. कल्पनेचे पंख लावले की झाले काम ! 


मग 'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' या ओळी वाचता वाचता श्रावण सरीत न्हाऊन निघाल्यासारखे वाटते तर - 'आई म्हणूनि कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी' हे शब्द हृदयाला पीळ पाडतात.


जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा' हे बोल कानावर येताच कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून गंगायमुना वाहू लागतात. नि 'मी तुम्हा दिसे जरी बाळ, परी काळ असे वीरांचा' या वीर अभिमन्यूच्या उद्गागंनी वाचकांचे बाहूही स्फुरण पावू लागतात. साध्यासुध्या विषयात खूप मोटा आशय' गवसणे हा कवीच्या व्यक्तिमत्त्वाचाउल्लेखनीय पैलू. एखादी प्रसन्नवदना गृहिणी अंगणात रांगोळी रेखते आहे हे दृश्य नित्याचे आहे पण एखादा कवी ते पाहतो आणि त्याच्या लेखणीतून झरझर ओळी स्त्रवू लागतात. होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर' या कवींनी आम्हाला काय दिले नाही? आनंदाची लयलूट केलीच. पण त्याबरोबर चिरंतन मूल्यांचे जतनही केले.


जीवनाकडे बघण्याची दृष्टी दिली. संतकवींनी आमच्या अंतःकरणात भगवत्प्रेमाचा अंकुर निर्माण केला. प्रेमळ कांतेप्रमाणे मधुर उपदेश केला. कवींविना शब्दसृष्टीच काय, विश्वनियंत्याची सृष्टीही नीरस होऊन जाईल. 'आम्हाला वगळा, गतप्रभ झणी, होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे' हा केशवसुतांचा अभिमान सार्थच आहे.ईश्वराच्या सृष्टीप्रमाणे कवीची शब्दसृष्टीही विविधतेने नटलेली आहे. असं या जगात काहीच नाही की जे कवींच्या जगात नाही. सृष्टी वषसांनी युक्त तर काव्यात नऊ रस आहेत. रसांची रेलचेलच आहे म्हणा ना ! या रसांची गोडी अवीट आहे. विश्वनिर्मिती करताना निर्मात्याला पंचमहाभूतांचे साहाय्य घ्यावे लागले. शब्दसृष्टीचा पसारा फक्त एकाच तत्त्वातून निर्माण झाला. ते म्हणजे शब्द. कवीच्या सेवेला अष्टौप्रहर हात जोडून उभे असलेले त्याचे सच्चे सेवक ! हे शब्दही कसे तर 'अक्षरांनी युक्त' त्यामुळेच की काय कवीची निर्मिती अक्षर वाङ्मयात मोडते.


ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन शक्ती मिळून विश्वाची प्रचंड उलाढाल चालू आहे. कवींच्या ठायी या तीनही शक्ती एकवटल्या आहेत. पुढील श्लोक पाहा 

'अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः ! 

अभाललोचनः शम्भुः भगवान् बादरायणः ॥'


महर्षी व्यास म्हणजे साक्षात ब्रह्मदेवच आहेत. (फक्त त्यांना चार तोंडे नाहीत) प्रत्यक्ष विष्णूच आहेत (फरक एवढाच की त्यांना दोनच हात आहेत, चार नाहीत) आणि कपाळावर डोळा नसलेले भगवान शंकरच आहेत.व्यास ऋषींना ‘ब्रह्मदेव' का म्हटले ? काव्यनिर्मितीचे (नवनिर्मितीचे) कार्य त्यांनी केले म्हणून. ते विष्णू कसे? तर काव्याद्वारा ते सत्प्रवृत्तींचे संरक्षण करत असतात. त्यामुळे विश्वपालनाचे काम आपोआपच साधले जाते. तर दुष्प्रवृत्तींचा संहार हे शंकराचे कार्यही ते उत्तमरीत्या पार पाडतात. अशा प्रकारे तिन्ही शक्तींचाअपूर्व संगम या कवेश्वरांच्या ठायी दिसून येतो. विश्वावर अनंत उपकार करणाऱ्या या कविश्रेष्ठांचा महिमा वर्णिताना शब्द अपुरे वाटतात, असमर्थ ठरतात. म्हणून श्री समर्थांच्याच 'समर्थ' शब्दांचा आधार घेऊ या. 'आता असो हा विचार जगास आधार कवेश्वर तयांसी माझा नमस्कार साष्टांग भावे ॥ मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 
 निबंध 2

 कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध | KAVI SHABDH SUSHTICHE ISHVAR ESSAY MARATHI


ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या आधारे विश्वाची त्याने रचना केली. दिवसरात्र, चराचर, घनद्रव अशा विरोधाभासाने रंगत आणली. ऋतू, रंग, रस, गंध, सूर यांची मनोहारी सृष्टी त्याने निर्माण केली. म्हणूनच कुणी त्याला 'निर्मिक म्हणतात.


 याच पंचतत्त्वांतून मानव या सृष्टीत आला. आपल्यातली पंचमहाभूते वापरून तो निर्मिक झाला. त्यानंसुद्धा विश्व निर्माण केलं-भावविश्व! सुरांच्या आत्म्याला त्यानं शब्दांचे देह दिले. तो निर्मिक म्हणजेच कवी अन् त्याची शब्दसृष्टी म्हणजे काव्य. 


रवीला नसलेली दृष्टी कवीने वापरली; आणि स्फूर्तीचा अखंड तेजस्वी स्रोत, भावनांचा सागर, मृत्तिकेची वास्तवता, वायूची तरलता, आकाशाची व्यापकता बनली या शब्दसष्टीचा आधार! कवीच्या शब्दांनी भावविश्वात तरंग निर्माण केले, वादळे उठवली, दिशा स्थिर केल्या, विश्व कधी उजळून टाकले कधी अंधारून! जीवनाला रंग आला, गंध आला, नवरस आले आणि जगण्याचा सूर गवसला. सारे घडवले कवीने. म्हणूनच
सरस्वतीचा कवी हा सेवक। 

बंदा नोकर आज्ञाधारक। 

तिचा आज परि होई मालक। 

शब्दसृष्टीचे हे परमेश्वर।

वाग्देवी सेवेला सादर। 

का नच अद्भुत हे?॥


 कालिदासाने मेघाला दूत केले, नलाने हंसाला, कुसुमाग्रज यांनी तर सूर्याला प्रियकर केले आणि पृथ्वीला प्रेयसी, बालकवींनी पुढे जाऊन रविराजाशी फुलराणीचा विवाहच लावला... खरी सृष्टी अशी शब्दांच्या सृष्टीत बद्ध झाली. मनाच्या भधुकराला रसिकतेचे मधुघट मिळाले. कारण

"शब्दामागे उभा अर्थ।
 
अर्थामागे उभे मन।

मनाच्याही पैलपार । 

बोले कुणीसे गहन ॥"


शब्द, नाद, आशय घडवतात कधी ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार! "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" मधील कर्मयोग, “वासांसि जीर्णानि” मधील स्थितप्रज्ञ तत्त्वज्ञान, “गर्जा जयजयकार क्रांतीचा" मधील
युगप्रवर्तकता, "श्रावणमासी हर्ष मानसी" मधील प्रसन्नता, "सागरा प्राण तळमळला" मधील देशप्रेमाची तेजोमयता- यापासून ते थेट "आषाढिचा अंधार मी तू फाल्गुनि मधुशर्वरी" मधील मिष्किलतेपर्यंतचे, बदलत्या मानवी मनाच्या भावविश्वाचे हे आविष्कार याचे दाखले देतात. 


शब्दसृष्टीत हे आविष्कार कवीच घडवतो. शृंगार, वीर, करुण, हास्य, वत्सल, बीभत्स, रौद्र, अद्भुत आणि शांत या नवरसांचे नवग्रह निर्माण केले या शब्दसृष्टीच्या ईश्वराने!.... नवरसांच्या वर्षावाचा वर्षा ऋतू, नवनवोन्मीलित कल्पनांच्या फुलोऱ्याचा वसंत ऋतू, दाहक वास्तवतेचा ग्रीष्म ऋतू,


रसिकतेच्या आल्हाददायक चांदण्याचा शरद ऋतू, भावना गोठवणारा हेमंत ऋतू, वैराग्याच्या पानगळीचा शिशिर ऋतू...  कवीने शब्दसृष्टीत सत्यसृष्टीच्या तोडीस तोड ऋतू निर्माण केले... शब्दांच्या सत्यम्, शिवम्, सुंदरम्च्या रचनेने भावविश्वाला त्रिमित केले.


सत्त्व, रज, तम भावनांनी त्रैलोक्य निर्माण केले.- या साऱ्या निर्मितीने तो त्याच्या ईश्वरपदी शोभून दिसतो. वंदनीय ठरतो. सत्यसृष्टीच्या चैतन्यरूप ईश्वराला त्यातून वगळले तर विश्व कोमेजून जाईल. शब्दसृष्टीच्या कवीश्वराला त्यातून वगळले तर? केशवसुत याचं उत्तर देतात

आम्हाला वगळा हतप्रभ झणी होतील तारांगण

आम्हाला वगळा विकेल कवडी मोलापरी हे जिणें॥" 


आणि हे खरं आहे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद