खरा मित्र मराठी निबंध | Khara Mitra Marathi Essay

 खरा मित्र मराठी निबंध | Khara Mitra Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खरा मित्र मराठी निबंध बघणार आहोत. धोंडोपंत टायफॉइडने महिनाभर आजारी होते. तेव्हा त्यांची तब्येत पहायला म्हणून रोज ऑफिसमधली, शेजारपाजारची मंडळी येत होती. रोज सर्वांचे चहापाणी करता-करता धोंडोपंतांच्या पत्नी कंटाळल्या. 


तर आपल्या आजाराचा तोच तोच पाढा वाचून धोंडोपंत कंटाळले. आजार बरा, परंतु मित्र आवर!' असं म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली. परंतु गुंडोपंतांनी एके दिवशी त्यांच्या हातात पुण्याची तिकिटे दिली व हवापालटासाठी त्यांची सपत्नीक रवानगी पुण्याला केली आणि त्यांच्या दोन लहान मुलांची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. 


मला वाटले, खरा मित्र असाच असतो. आपल्याला जीवनात किती लोक भेटतात, परंतु ते सर्व आपले मित्र बनत नाहीत. एक पंधरा वर्षाचा कॉलेजकुमार व त्याचे सत्तर वर्षाचे आजोबा एकमेकांचे मित्र होते. एका घरात सासवा-सुना एकमेकींच्या चक्क मैत्रिणी होत्या!


समान उद्योगधंदा करणारे एकमेकांचे मित्र असतात, असेही नाही. शिक्षक-डॉक्टर, मालकीणबाई व मोलकरीण, राजकारणी व समाजसुधारक अशा भिन्न लोकांची मैत्री असते. गरिबी व श्रीमंती मैत्रीच्या आड कधीच येत नाही.


सर्वसाधारणपणे जे मित्र असतात ते नाईलाजाने किंवा स्वार्थापोटी झालेले असतात. स्वार्थ संपला की, त्यांची मैत्री कापराप्रमाणे उडून जाते. खरा मित्र नेहमी आपल्याशी हितगुज करतो. आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो. तुमच्या मनातील गोष्टी नकळत समजू शकतो. 


अडचणीच्या वेळी मदतीला धावून येईलच परंतु कौतुक करताना हात आखडता घेणार नाही. चूक असेल तर ती दाखवून देईलच व सत्याच्या मार्गावरून जात असताना तुमची साथ कधीच सोडणार नाही. भागीदारीत धंदा करून आपल्या मित्राचा केसाने गळा कापणारे मित्र असंख्य आहेत. 


परंतु एक बेकार मित्र आपल्या आश्रयास आला असताना आपल्याला मिळालेली एकुलती एक शिकवणी त्या मित्रास देणारा एखादा असाही खरा मित्र असतो. पुण्याच्या कॉलेजमधील मित्रद्वयांची जोडी फार प्रसिद्ध होती. एक श्रीमंत मित्र होता, तर एक गरीब. श्रीमंत मित्र मरीब मित्राच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करत होता. 


गरीब मित्र हशार होता तर श्रीमंत मित्र अभ्यासात कच्चा होता. परीक्षेत गरीब मित्र पास झाला. श्रीमंत नापास झाला, परंतु आपला मित्र पास झाल्याने श्रीमंत मित्राने पेढे वाटले. तो नुसता श्रीमंत मित्र नव्हता तर खरा मित्र होता! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंध 2

खरा मित्र मराठी निबंध | Khara Mitra Marathi Essay

उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे प्राणसंकटे।

राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ।। 


खरा मित्र कुणाला म्हणावे ? जिवाचा सखा कुणाला समजावे ? वर दिलेले संस्कृत सुभाषित सांगते - आपल्या आनंदात आणि आपत्तीत, आपल्यावर उपासमारीची वेळ आली असता किंवा आपल्या मानसन्मानाच्या वेळी आणि आपल्या अंतकालीदेखील जो आपली साथ - कायम ठेवतो त्यालाच खरा मित्र मानावे, बांधव समजावे.


इंग्रजीतदेखील म्हण आहे A friend in need is a friend indeed, गरजेच्या वेळी. उपयोगी पडतो तो खरा मित्र....इथे गरज कोणती समजायची ? परीक्षेत उत्तर येत नाही, अभ्यास केलेला नाही, तेव्हा जो तयार उत्तरे पुरवतो तो गरज पुरविणारा खरा मित्र मानायचा का ? 


आपले पैसे आपण एखाद्या खेळात किंवा व्यसनात घालविले, अशा वेळी आपल्याला वेळोवेळी पैसे पुरविणारा आपला असली दोस्त समजायचा का ?...नाही ! नाही ! नाही ! असे मित्र हे खरे मित्रच नव्हेत ! आपले एक प्रकारचे शत्रूच ते ! कारण ते आपल्याला उन्नतीऐवजी अधोगतीकडे नेतात.


तुम्ही विचाराल...खरा मित्र, खरा मित्र, ही तबकडी काय लावलीय सुरुवातीपासून ? मित्र खोटा असू शकतो का ?...होय मित्रांनो, खोटा मित्र असू शकतो, एवढेच नव्हे तर असेच मित्र आपल्या अवती भोवती जास्त असतात. आपली खोटी स्तुती करणारे, 


आपल्याला बहकवणारे, आपल्याला भलत्याच गैरमार्गाने नेणारे, व्यसने, पैसे लावून खेळायचे खेळ, सोरट, लकी ड्रॉ, ह्यामार्गाने महागडी बेहोशी मिळवून देणारे, आपल्या जिवावर किंवा आपल्याला पुढे करून स्वतः नामानिराळे राहणारे, रानात समोरून अस्वल येताच स्वतः एकटे झाडावर चढणारे ! 


हे खरे मित्र कधीच नसतात बरं ! ते असतात आपले साथीसोबती, सहकारी, सवंगडी ! यातले सगळेच वाईट असतात असे नाही. काही साधेसुधे असतात पण स्नेही म्हणून स्नेह राखणे, मित्र म्हणून जवळीक ठेवणे आणि त्या जवळिकीतून रुळावरून घसरणाऱ्या मित्राला अप्रिय पण पथ्यकारक असे हिताचे चार शब्द मित्राच्या अधिकारात ठणकावून सांगण्याचे धैर्य या साथीसोबतीगणात नसते. म्हणूनच खरा मित्र दुर्मिळ असतो. अशी मैत्रीदेखील देवदुर्लभ असते.


खऱ्या मैत्रीसाठी जात, धर्म, शिक्षण, मानसन्मान, प्रतिष्ठा, काहीही आड येत नाही. म्हणूनच कृष्ण व सुदामा खरे मित्र होते. एक विश्वंभर दुसरा दिगंबर ! एक द्वारकेचा राणा दुसरा बामण बापुडवाणा. भारताचे एकेकाळचे श्रेष्ठ अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांची व पनवेल येथील टिल्लू हेडमास्तरांची मैत्री होती. 


कोणत्याही कामासाठी ते पनवेलच्या बाजूला आले की टिल्लू मास्तरांच्या घरी यायचे. काही काळ तिथे थांबून मग आपल्या कामाला लागायचे. राष्ट्रपती गिरी देखील मुंबईला आल्यावर आपल्या मुंबईकर मित्राला भेटून जायचे. अर्थात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही मैत्री निरपेक्ष होती. 


आपल्याला काही मिळावे, आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळाव्यात, धंदा व्यवसायात बढती मिळावी यासाठी यांनी आपल्या ज्येष्ठ मित्रांवर दडपण आणण्याचा मनातसुद्धा कधी विचार केला नाही. सुदाम्यालादेखील सुवर्णसदन नको होते. 


खरी मैत्री निरपेक्षच असते. याला दुसरा अर्थ आहे. मित्राकडे काही मागावे लागत नाही. अपेक्षा करावी लागत नाही. मित्र खरा असेल तर तो मित्राची अडचण स्वतःच ओळखतो आणि त्यानुसार व आपल्या विचारानुसार काम करतो पण खरोखरच खरा मित्र आवश्यक असतो का ? होय, असा मित्र असावा, आई, वडील, भाऊ, बहीण (अगदी पत्नीसुद्धा) यांनादेखील काही गोष्टी आपल्या अंतरीच्या काही काही


व्यथा आपण सांगू शकत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जिवलग मित्राला सांगू शकतो, आपले मन मोकळे करू शकतो. कठीण प्रसंगात आपण एकटे नाही. आपल्याजवळ, आपल्या पाठीशी कुणीतरी आहे हा दिलासा, हा आनंद खरा मित्रच देऊ शकतो. म्हणूनच खरे मित्र एकमेकांना ग्वाही देतात  'यह दोस्ती, हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर...तेरा साथ ना छोडेंगे।' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद