क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | Kriyevin vachalata vyarth aahe

 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | Kriyevin vachalata vyarth aahe

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे मराठी निबंध बघणार आहोत. 


मददे : 

कृतीनेच कोणताही बदल शक्य

फक्त बोलण्याने काहीही घडत नाही 

बोलके सधारक

निरुपयोगी

वैयक्तिक आयुष्यात किंवा सामाजिक आयुष्यात बदल घडवण्यासाठी स्वतः कृती करणे आवश्यक

जगातील सर्व श्रेष्ठ माणसे कृतिशील

संत रामदास यांचा हाच उपदेश.


सध्या आपल्या समाजात प्रचंड बजबजपुरी माजली आहे. चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, दंगली, सज्जनांचे खन, स्त्रियांवर अत्याचार आणि राजकारण्यांचे हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार असल्या समाजविघातक गोष्टींनी कहर केला आहे या पार्श्वभूमीवर आणखी एका गोष्टीचा कहर माजला आहे. 


तो म्हणजे वाचाळवीरांच्या बडबडीचा. 'हे झाले पाहिजे'ते केले पाहिजे', 'सरकारने अमुक करावे', 'जनतेने तमुक खबरदारी घ्यावी', अशा सूचना-सल्ल्यांचा सपाटा या वाचाळवीरांनी लावला आहे. अशी ही माणसे बडबडीखेरीज काहीही करायला तयार नसतात. 


बहुतेकांची वृत्ती अशीच असते. क्रांतिकारक जन्मला पाहिजे, अशी त्यांची उत्कट इच्छा असते. मात्र, तो शेजारच्या घरात जन्मावा, माझ्या घरात नको, अशी त्यांची भूमिका असते. अशाने समाजात कोणते बदल होतील का?


अशा वाचाळवीरांचा समाजाला काडीचाही उपयोग नसतो. कारण फक्त बोलण्याने काहीही घडत नाही. काही तरी घडावे असे वाटत असेल. तर काही तरी कृती घडली पाहिजे. रामदासस्वामी याच अर्थाने सांगतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ! 


वाचाळवीरांनाच 'बोलके सुधारक' म्हटले जाते. बोलके सुधारक समाजसुधारणेच्या फक्त बाता मारतात. प्रत्यक्षात करीत मात्र काहीच नाही. म्हणून त्यांचा समाजाला काहीही उपयोग नसतो.


कृतीशिवाय आयुष्यात कोणताही बदल होत नसतो. कोणतीही तत्त्वे किंवा मूल्ये ही कृतीतूनच व्यक्त होत असतात. 'मी प्रामाणिक आहे', असे कितीही शाब्दिक सामर्थ्य वापरून मी स्पष्ट करीत राहिलो, तरी त्याने माझा प्रामाणिकपणा व्यक्त होऊ शकत नाही. 


मी प्रामाणिकपणे वागून दाखवले तरच माझ्या प्रामाणिकपणाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. हे फक्त वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर सामाजिक जीवनातही खरे असते. समाजात कसे वागावे, हे भाषणे करून सांगण्यात अर्थ नसतो. कारण कोणावरही त्याचा प्रभाव पडत नाही. 


गांधीजींनी प्रचंड त्याग करून, पराकोटीच्या संयमाने इंग्रज सैनिकांचे अत्याचार सहन केले. त्यांच्या या कृतीमुळे भोवती जमलेल्या हजारो लोकांच्या हृदयात वणवे पेटले. गांधीजींच्या केवळ भाषणाने हे घडू शकले नसते. जगातील सर्व थोर माणसांची चरित्रे वाचा. 


त्यांचे कार्य अभ्यासा. तुम्हांला हेच आढळेल की, ती सर्व थोर माणसे कृतिशील होती. म्हणूनच त्यांनी देश घडवले. संत रामदासांनीच सांगितले आहे की, 'केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।' कृतीच महत्त्वाची असते, हे रामदासस्वामी येथे सांगत आहेत. 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।।' असे तुकाराम महाराज सांगतात तेव्हा त्यांनाही 'कृतिशीलताच महत्त्वाची असते', असे सांगायचे असते. म्हणून 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे !' हा आपण आयुष्याचा मंत्र बनवला पाहिजे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद