माझी मातृभाषा : काल आणि आज मराठी निबंध | Mazi Matrubhasha : Kal Aani Aaj Essay Marathi

 माझी मातृभाषा : काल आणि आज मराठी निबंध | Mazi Matrubhasha : Kal Aani Aaj Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी मातृभाषा : काल आणि आज  मराठी निबंध बघणार आहोत. माझी मातृभाषा मराठी आहे. माझी मराठी एक ऐश्वर्यसंपन्न भाषा आहे.


'माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृताते। पैजा जिंके॥ असे ज्ञानेश्वरांनी मोठ्या अभिमानाने लिहिले आहे. इतिहासकार राजवाडे, सरदेसाई, तात्यासाहेब केळकर, शेजवलकर अशा विद्वानांनी मराठी भाषा घडवली, सजवली. इतिहास लेखनाबरोबरच त्यांनी मराठी भाषेला नवे अलंकार चढवले. 


मराठी भाषा, मराठीचे व्याकरण याबद्दलची दामले, तर्खडकर, प्रियोळकर यांची मराठी भाषा, मराठीचे व्याकरण याबद्दलची ग्रंथसंपदा बहुमोल आहे. याखेरीज चिपळूणकरांची निबंधमाला, लोकहितवादींची 'शतपत्रे', 'आगरकर, म. फुले, सावरकर यांचे साहित्य मराठी वाचकाला विचारधन पुरवीत होते. 


गद्याप्रमाणेच काव्याचा प्रांतही बहारदार होता. आपले संतकवी, पंतकवी यांनी मराठी भाषेच्या खजिन्यात अनमोल भर घातली आहे. त्यानंतर केशवसुत, रविकिरण मंडळ, अनिल आदी कवींची काव्ये मराठी साहित्य समृद्ध करीत होती. 


याशिवाय या काळातील मासिके, पुस्तके, सामाजिक परिवर्तनासाठी प्रबोधनाचे कार्य करीत होती. 'किर्लोस्कर' मासिकाने कितीतरी नवीन विचार समाजात रुजविले. कालबाह्य झालेल्या रूढी, परंपरा यांच्यावर किर्लोस्करांनी खुसखुशीत विवेचन करून समर्पक हल्ला चढविला. 


तसेच एक मासिक म्हणजे न. चिं. केळकरांचे 'सह्याद्री'. इतिहास, राजकारण, समाजकारण, साहित्यशास्त्र, विज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांबद्दल यातून विचारप्रवर्तक लेख येत असत. डॉ. केतकरांचा ज्ञानकोश हे तर मराठी भाषेचे भूषणच आहे.


परंतु आज ही परिस्थिती जरा पालटली आहे. मराठी भाषेतून विज्ञान, तंत्रज्ञान यांचे ग्रंथ कमी प्रमाणात निर्माण होत आहेत. आज जीवनाला विलक्षण वेग आला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती झपाट्याने होत आहे आणि त्याचे पडसाद समाजजीवनात उमटत आहेत. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत उतरावयाचे झाल्यास केवळ मराठीवर अवलंबून राहून चालत नाही. तर इंग्रजीची कास धरावीच लागते. अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान अशी सायन्सची कोणतीही शाखा घेतली तरी त्यातील अद्ययावत व उच्च स्तरावरचे साहित्य इंग्रजीतच उपलब्ध असते. 


त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. याचसाठी नवीन पिढी इंग्रजी माध्यमातून शिकणे पसंत करते. आणि मराठी भाषेला स्थान उरले आहे ते घरगुती संभाषणापुरतेच! पूर्वी मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा होता. म्हणजेच ज्ञानप्राप्ती त्या भाषेत होऊ शकत होती. पण आजची स्थिती तशी राहिलेली नाही. 


नवीन ज्ञानाची निर्मिती, निर्माण झालेल्या ज्ञानाचे वितरण अशा सर्व क्रिया ज्ञानभाषेत झाल्या पाहिजेत. तसे मराठीतून घडत नसल्याने आज मराठी ही ज्ञानभाषा राहिलेली नाही. मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून द्यायचा तर मराठीत ज्ञानलक्षी साहित्य निर्माण झाले पाहिजे. 


आज मराठी राजभाषा आहे. तिच्यात इंग्रजी शब्दांचा समावेश करून घ्यायला हवा, ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये मराठी साहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच मराठीला परत चांगले दिवस येतील. 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल' या उक्तीप्रमाणे तेजस्वी प्राचीन वैभव असलेल्या मराठीला ओजस्वी भविष्यकाळ लाभेल हे निश्चितच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद