मी एकादशी करतो मराठी निबंध | ME AKADASHI KARTO ESSAY MARATHI

 मी एकादशी करतो मराठी निबंध | ME AKADASHI KARTO ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी एकादशी करतो मराठी निबंध बघणार आहोत.दर एकादशीला आजी खिचडी, लापशी, थालीपीठ काही तरी करायची व माझ्यासाठी राखून ठेवायची. पण एवढीशी खिचडी खाऊन माझं समाधान व्हायचं नाही. 'मी पण एकादशी करतो.' असा वेडा हट्ट मी करीत असे. आजी म्हणायची, 


'ही एकादशी नको, वाटल्यास मोठी एकादशी कर, आषाढी-कार्तिकी.' एकदा ती कार्तिकी एकादशी आली. उद्या आपल्याला भरपूर पदार्थ खायला मिळणार म्हणून मी खूप आनंदात होतो. बाबांनीही बाजारातून केळी, खजूर, रताळी मुद्दाम आणली. सकाळी उठल्यापासूनच 'माझी आज एकादशी आहे,' असे सर्वांना सांगायला मी सुरुवात केली. 


'आई, झाली खिचडी, आई लवकर थालीपीठ कर.' अशी सकाळी आठपासूनच भुणभुण सुरू केली. शेवटी आईनं घाईघाईनं भगर, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, खिचडी, रताळ्याचे गोड काप एवढे पदार्थ केले. पण ते करेपर्यंत बारा वाजले. तोपर्यंत मला कशी भूक निघणार? 


मी येता जाता भाजलेले शेंगदाणे, गूळ, खजूर इ. तोंडात टाकत होतो. शेवटी बारा वाजता सर्व साग्रसंगीत फराळ केला. चांगलं तुडुंब पोट भरले. दुपारी दोन वाजता आमची क्रिकेटची मॅच होती. मी जाण्याच्या तयारीत होतो.


पण घरातून इडली व सांबाराचा वास येत होता. म्हणन स्वयंपाकघरात जाऊन बघितले तर आईनं खरोखरच इडली, सांबार, चटणी, इ. केलं होतं. बाबांचे मित्र चहाला यायचे होते. परंतु माझी एकादशी असल्यानं मला ते मिळणार नव्हतं. म क्षणभरही न थांबता ग्राउंडचा रस्ता पकडला.


क्रिकेटची मॅच खेळून आल्यावर परत पोटात भूक लागली होती. मग आईनं खायला खिचडी दिली. ती पोटभर खाल्ली तरी पण समाधान झालं नाही. कारण माझ्याच शेजारी टेबलावर बसून 'मिनी' जे काय खात होती त्याकडे सारखं लक्ष जात होतं. ती इडली-सांबार खात होती. शिवाय पाहुण्यांसाठी आणलेल्या बाकरवडीवरही ताव मारत होती. 


तिला बाकरवडी तिखट लागली म्हणून आईनं पाहुण्यांसाठी आणलेला बॉम्बे हलवा व सुतरफेणी दिली होती. बॉम्बे हलवा उपासाला चालतो का? असं मी आईला विचारून पाहिलं. आई व आजी हसू लागली. एवढ्यात इडली व सांबार छान झाल्याचं मिनीनं आईला सांगितलं. 


मला वाटलं ती मुद्दामच मला चिडवत आहे. अस्सा राग आला व मिनीला एक ठोसा ठेवून दिला. तिनंही प्रतिटोला दिला, शेवटी मलाच आईचा फटका खावा लागला. रात्री परत तीच खिचडी व रताळ्याचा कीस खावा लागला. मला रताळ्याचा कीस मुळीच आवडला नाही. पोटात भूक तशीच होती. शेवटी नाईलाजानं झोपायचा प्रयत्न केला पण झोप लागेना. शेवटी आईकडून दोन-चार इडल्या मागून खाल्ल्या.


आजी तिच्या खोलीत तिचं नेहमीचं गाणं म्हणत होतीच मिस्किलपणे माझ्याकडे बघून हसत होती. उपास मज लागला, केळी नि खजूर आणिला। उकडले बटाटे सहा, कीस नुसता केला पहा। हा उपास मज भोवला, घोटसा चहा घेतला। दही भात वरण चापिला, सखे ग उपास मज लागला॥ मी तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याचे सोंग केले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद