मी मुख्यमंत्री झालो तर निबंध मराठी | Mi Mukhyamantri Zalo tar Essay in Marathi ·

 मी मुख्यमंत्री झालो तर निबंध मराठी | Mi Mukhyamantri Zalo tar Essay in Marathi · 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. 'काय साध्या स्वराज्यसभेचा मंत्री! पण ऐट मात्र 'मुख्य-मंत्री' असल्यासारखी!' 'अरे, स्वराज्यसभेच्या मुख्यमंत्र्याची नाही, तर 'महाराष्ट्राचा' मुख्यमंत्री असावी अशी' असं सर्वजण अमोलला चिडवत होते. 


अमोलमध्ये नेतृत्वाचे गुण होते. परंतु शिस्तप्रियतेमुळे तो शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय होत असे. सर्वांनी चिडवल्यामुळे खट्ट होऊन तो वर्गात गप्प बसून होता. त्याचे मन विचार करू लागले- खरंच मी मोठेपणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन का? होय, या महाराष्ट्राला माझ्यासारखाच मंत्री हवा. 


मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्टाचा डतका विकास करीन, की विचारू नका. मी प्रथम माझ्या राज्यातील सर्वांच्या अन्न-वस्त्र-निवारा ह्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भीक मागणाऱ्या लोकांसाठी एक गृह किंवा 'घर' तयार करीन. त्यामध्ये अन्न, वस्त्र व आरोग्य यांची काळजी शासनामार्फत घेतली जाईल. झोपडपट्टीतील लोकांनाही जास्त सोयी देण्याचा प्रयत्न करीन.


उन्हाळ्यात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त बोअरवेल काढीन. नद्यांना बांध घालून घ्यायला सांगीन व शक्य असेल तेथे पाझर तलाव काढीन, कालवे काढीन व धरणे बांधीन. तसेच बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कारखाने, नवीन प्रकल्प हाती घेऊन अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देईन.


कोकणचा 'कॅलिफोर्निया' करण्यासाठी, वनीकरणाच्या, फलोद्यान निर्मितीच्या योजना तज्ज्ञांच्या मदतीनं आखून ‘फूड प्रॉडक्टस्' निर्माण करणारे लहान-मोठे उद्योग निर्माण करीन. ज्याच्यामुळे कोकणचा कर्ता पुरुष मुंबईत धावण्याची प्रथा नाहीशी होईल.


मी मुख्यमंत्री झालो तर भ्रष्टाचार, गुन्हेगारी या गोष्टींचं पूर्णपणे निर्मूलन करीन. सर्वसामान्य माणसाची गळचेपी थांबवीन. त्याला निर्भयतेनं जगता यावं अशी सामाजिक व्यवस्था व परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. नाहीतर रोजचेच खून, बलात्कार, लाचलुचपत, फसवणूक यांनी गांजलेला समाज सुखी कसा होईल?


हे सर्व काम करताना मी सतत केंद्राशी संपर्क ठेवून असेन. नवीन नवीन उद्योगांसाठी केंद्राकडून मंजुरी व आर्थिक साहाय्य मिळवीन. भारताच्या पंतप्रधानांचे मार्गदर्शन व सल्ला घेईन. सर्व राज्यांमध्ये वारंवार दौरे काढीन.


खेड्यातील परिस्थिती स्वत: डोळ्यानं पाहीन. मात्र परदेशी दौरा मात्र काढणार नाही. राज्यात एवढे महत्त्वाचे प्रश्न असताना परदेशी दौऱ्यांमध्ये पैसा खर्च करणार नाही. राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा विकास करण्यास प्रोत्साहन देईन. ग्रामीण कलांना उत्तेजन देईन. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न करीन.


असा विचार करण्यात अमोल गढून गेला होता. “अरे शिंदे, तुझं लक्ष कुठे आहे? कसला विचार करतोस?" असे बाईंनी विचारल्यावर अमोलची विचारशृंखला तुटली. त्याने बाईंच्या शिकवण्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद