प्लास्टिक शाप किंवा वरदान मराठी निबंध | Plastic Curse or Blessing Marathi Essay

प्लास्टिक शाप किंवा वरदान मराठी निबंध | Plastic Curse or Blessing Marathi Essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्लास्टिक शाप किंवा वरदान मराठी निबंध बघणार आहोत. प्लॅस्टिक, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक! मानवी जीवनाशी निगडित अशी वस्तू. आधुनिक युग म्हणजे प्लॅस्टिक युग. म्हणजेच आज प्लॅस्टिकशिवाय आमचे पान हलत नाही. 


दिवसाची सुरुवातच होते मुळी प्लॅस्टिकपासून. सकाळी-सकाळी दारात दूध येते, ते प्लॅस्टिकच्या पिशवीतून. पूर्वी पातेले, कडीचा डबा, बाटल्या यातून दूध आणायचो. आता तेल बरणीतून नाही, बाटलीतून नाही, तर मिळते प्लॅस्टिकच्या पिशवीतून. संध्याकाळी भाजी आणायला पूर्वी कापडी पिशवी न्यावी लागायची. 


पण आता भाजीबरोबर प्लॅस्टिकची पिशवी अगदी मोफत ! बाजारातून कोणतीही वस्तू आणायची असेल, तर पिशवीची गरजच नाही. सगळे म्हणजे सगळे काही मिळतेय प्लस्टिकच्या पिशवीतून. त्यामुळे जाल, तिथे प्लॅस्टिक. काही घ्यायचे, तरी प्लॅस्टिक आणि काही टाकायचे असेल, तर त्यासाठीही प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचा वापर अतिसुलभ!उरलेले अन्न रस्त्यावर टाकले जाते, ते प्लॅस्टिकच्या पिशवीतून. 


जनावरे ते अन्न खातात, ते प्लॅस्टिकसकट. मध्ये एकदा वर्तमानपत्रातून बातमी झळकली. गाईच्या पोटात पिशव्या सापडल्या. अशा पिशव्या पोटात गेल्याने जनावरांचे मृत्यू होऊ लागले. कोठेही सार्वजनिक ठिकाणी जा, प्लॅस्टिकच्या पिशव्याच पिशव्या पडलेल्या दिसतील. 


कचराकुंड्यातून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढीग दिसू लागला. प्लॅस्टिकच्या नव्या संकटाचे पडघम वाजू लागले. नद्या-नाल्यांतून, गटारांतून प्लॅस्टिकमुळे पाणी तुंबू लागले. पावसाळ्यात पुराचे संकट येतेच; पण त्याला निमित्त झाले प्लॅस्टिकचे. साफसफाई, स्वच्छता हे शब्द सार्वजनिक जीवनातून हद्दपारच झालेत. 


लोकांना कचरा करणे, हा आपला जन्मसिद्ध हक्कच वाटू लागलाय. ही सारी संकटे ओढवताहेत, ती आपल्याच मूर्खपणामुळे हेच सगळे विसरू लागले आहेत. ह्या विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे करायचे तरी काय? आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचा हास करायचा जणू विडाच उचललाय. 


समस्त मानवजातीला आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे की नाही? पर्यावरण-तज्ज्ञांनी प्लॅस्टिकच्या वापराने होणारे महाभयंकर दुष्परिणाम सांगितले आहेत. शहरात साठणाऱ्या कचऱ्याच्या ढिगात ३०% कचरा प्लॅस्टिकचा असतो. या प्लॅस्टिकमुळे बेन्झिन, क्लोराइड यासारखे वायू निर्माण होतात. 


या वायूंमुळे कर्करोग होण्याचा संभव असतो. हेच प्लॅस्टिक जाळून नष्ट करायचे झाल्यास हायड्रोकार्बन व डायॉक्झिन हे विषारी वायू निर्माण होतात. यातील डायॉक्झिन हे डी.डी.टी या कीटकनाशकापेक्षा ७०% विषारी असते. पाण्यात प्लॅस्टिकचे विघटन होत नाही; उलट पाणी तुंबते आणि पूरसदृश समस्या उद्भवतात.


माणसाने स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी प्लॅस्टिकचा शोध लावून त्याचा वापर सुरू केला. प्लॅस्टिकमुळे फायदा होतोय असे, वाटले खरे; पण प्लॅस्टिकचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत, असे लक्षात आल्यावर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आली. 


शासनाने २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कायद्याचा बडगा आणि दंड या भीतीमुळे का होईना; पण दुकानदारांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या देणे बंद केले आहे. सुजाण नागरिक पर्यायी व्यवस्था करतात. पण सर्वच जण कायदा पाळतात का?


'मला काय त्याचे?' हा संकुचित विचार सोडून प्लॅस्टिकविरोधी कायद्याला सर्वांनीच साथ द्यायला हवी. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदी, कापडी पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिकमुळे वाढणारे प्रदूषण रोखून पर्यावरण स्वच्छ राखण्याचा निश्चय करू या. कारण आज सिद्ध झाले आहे. प्लॅस्टिकच्या वापरामुळे फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद