प्राचीन मंदिरातील शिल्पवर्णन मराठी निबंध | Prachin Mandir Shilpvarn Marathi essay.

 प्राचीन मंदिरातील शिल्पवर्णन मराठी निबंध | Prachin Mandir Shilpvarn Marathi essay.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्राचीन मंदिरातील शिल्पवर्णन मराठी निबंध बघणार आहोत. आग्ऱ्याला जाऊन कोणी ताजमहाल पाहिल्याशिवाय येईल का? तसेच कोल्हापरला गेल्यावर महालक्ष्मीच्या मंदिरात न जाणारा महाभाग एखादाच सापडेल. 


दक्षिणेतील काशी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराच्या मध्यभागी महालक्ष्मीचे मंदिर आहे. श्री. ग. ह. खरे यांच्या मते, ही देवी आठव्या शतकापासून सर्वांना ज्ञात आहे, अशी माहिती ऐतिहासिक पुराव्यावरून मिळते. चारी दिशांना प्रवेश दरवाजे असणारे हे मंदिर खरोखर भव्य आहे.


महाद्वार रस्त्यावरील गर्दीतून वाट काढत, दोन्ही बाजूंना असणारी दुकाने व मध्यभागी चणे-फुटाणे किंवा रानमेवे विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना मागे टाकून आपण 'महाद्वाराशी' केव्हा पोचतो ते कळतच नाही. 'महाद्वार' नावाप्रमाणेच खूप मोठे व उंच असून रेखीव कमानींनी व घुमटांनी सजलेले आहे. 


हा मंदिराचा पश्चिम बाजूला असलेला प्रवेश दरवाजा. दरवाजा कसला! लहानसा चौकच आहे. काळ्या दगडांनी बांधलेले प्रवेशद्वार आपल्याला थेट महालक्ष्मीचे दर्शन घडविते. रिकामा वेळ असला तर आत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यावे, नाहीतर येथूनच देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' म्हणून परतावे.


महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हातची काळ्या पत्थरातील नंदीची मूर्ती व डाव्या हातची वराहाची मूर्ती पाहिल्याशिवाय सभामंडपाकडे जाऊ नका. फरसबंदीवरून उंच दीपमाला बघत काही पावले चालून गेल्यावर गरुडाची रेखीव मूर्ती असलेल्या गरूड मंडपात आपण प्रवेश करतो. 


सकाळच्या मालाबघत गल्यावर वेळी देवीची सेवा म्हणून सुरेल आवाजात गाणाऱ्या एखाद्या गायकाच्या किंवा गायिकेच्या स्वरांनी भारून गेलेल्या श्रीगणेशाची मूर्ती असलेल्या गणेश मंडपात आपण केव्हा प्रवेश करतो कळतच नाही.


गणेश-मंडपात प्रवेश केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी भैरव, चामुंडा, हयग्रीव, जैन यक्ष व यक्षी यांच्या सुंदर मूर्ती बघावयास सापडतात, याशिवाय बलरामादि जैन तीर्थंकर व स्कंदादिकांची सहा शिल्पे आपल्याला दिसतात. हे मंदिर दुमजली असून या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची मंदिरे व सभामंडप आहेत. हे सभामंडप वेगवेगळे असले तरी या सर्वांना जोडणारा एक जोडमंडप आहे. 


जोडमंडपाच्या पूर्वेस असणाऱ्या महालक्ष्मीच्या मंडपात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूला “जय-विजय” यांच्या भव्य मूर्ती दिसतील. मंदिराच्या गर्भगृहाचा उंबरठा पितळी पत्र्याने मढविलेला आहे. दहा खांबांच्या मेघडंबरीत महालक्ष्मीची मूर्ती अधिष्ठित झालेली आहे. मूर्ती अतिशय सुंदर आहे. 


मूर्ती काळ्या पाषाणाची असून सुमारे तीन फूट उंच आहे. महालक्ष्मी चतुर्भुज असून तिच्या हातावर महाळुग, गदा, ढाल आणि योनी यांच्या आकृती आहेत. मूर्ती मागील बाजूस वामाकृती व पुढील बाजूस सिंहाकृती आहे. मस्तकावर नागफणा आहे. 


देवीच्या मागील बाजूस चार फूट उंचीची चांदीची प्रभावळ आहे. ही मूर्ती सदैव सुंदर पातळ नेसलेली व अलंकार धारण केलेली असते. अशी तिची लावण्यमयी, सजीवसदृश मूर्ती पाहिल्यावर नकळत ओठांवर शब्द येतात...


नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। 

शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते। 

नमस्ते गरूडारूढे कोलासुर भयंकरि। 

महापाप हरे देवि, महालक्ष्मी नमोऽस्तुते। 


महालक्ष्मीच्या प्रदक्षिणेची जी ओवरी आहे ती स्वस्तिकाकृती आहे. आपल्याला प्रदक्षिणा घालताना सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व जोडमंडपातील खांब चौरसाकृती असून नक्षीकाम केलेले आहेत. 


हे खांब मोजले तर मरण येते' असा प्रवाद निर्माण झालेला आहे. कारण जोडमंडपातील ८० खांब व चारी मंडपांमध्ये साधारण तितकेच असावेत. या सर्व खांबांच्या चक्रव्यूहामध्ये सामान्य माणूस गोंधळून जातो. या मंदिराच्या बांधणीचे वैशिष्ट्य असे, की माघ महिन्यात जेव्हा सूर्य पश्चिमेला मावळतो त्या वेळी सायंकाळी काही वेळ सूर्याचे किरण मूर्तीच्या मुखकमलावर पडतात. हे दृश्य फारच मनोहारी असते. 


एवढ्या विस्तीर्ण प्राकारात व आजुबाजूच्या परिसरात अनेक मंदिरे असताना हा विशिष्ट हेतु साध्य करणे हा अतिकुशल प्रगत स्थापत्यशास्त्राचा चालता-बोलता पुरावा आहे! सोन्याचे तीन कळस असलेले हे विशाल दुमजली मंदिर शिल्पकलेचा खरंच एक अनोखा नमुना आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद