सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज, मराठी निबंध | Sarvajanik Ganeshotsav Kaal Aani Aaj, Marathi Nibandh

 सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज, मराठी निबंध | Sarvajanik Ganeshotsav Kaal Aani Aaj, Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज, मराठी निबंध बघणार आहोत. 


ॐ नमोजी आद्या। 

वेद प्रतिपाद्या॥ 

जय जय स्वसंवेद्या। 

आत्मरूपा॥ 

देवा तूचि गणेशु। 

सकलमतिप्रकाशु॥

म्हणे निवृत्तिदासु। 

अवधारिजो जी॥ 


श्रावण संपता संपता या गणेशस्तुतीच्या ओव्या आठवू लागतात, आणि श्री गजाननाच्या आगमनाची चाहूल लागते. सारे वातावरण चैतन्यमय होऊन जाते. भाद्रपदातील सार्वजनिक गणेशोत्सव हेच यामागचे कारण असते.


१८९३ साली लो. टिळकांनी घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणेशपूजेला सार्वजनिक स्वरूप दिले. 'हिंदू संघटना व राष्ट्रीय वृत्तीची जोपासना' हा सार्वजनिक गणेशोत्सवामागचा मुख्य उद्देश होता. सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम पुण्यात सुरू झाला. पारतंत्र्यातील भारतीय समाजाला जागे करण्यासाठी एकत्र आणण्याची नितांत आवश्यकता होती. 


या कार्यासाठीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. याद्वारे खेळ, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान इ. मार्गांनी अधिकाधिक लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटविणे हा लो. टिळकांची उद्देश होता व तो सफलही झाला. हा उत्सव समाजाच्या राजकीय प्रबोधनाचे एक प्रभावी साधन ठरला.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गणेशोत्सव चालूच राहिला, त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परंतु हळूहळू या उत्सवाचे रूप बदलत गेले, बाजारूपणा येऊ लागला. दमदाटी करून वर्गणी गोळा करण्यात येऊ लागली व केवळ सजावटी स्वरूपात हा उत्सव साजरा होऊ लागला. 


सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून काही विधायक माहितीजन्य कार्य आणि कार्यक्रम राबविण्याकडे दुर्लक्ष होत गेले आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही एक प्रकारे संस्थाने बनू लागली. व्याख्यानमाला, प्रवचने असे बुद्धीला खाद्य पुरविणारे कार्यक्रम मागे पडले, अनेक नामवंतांचे, अभ्यासकांचे विचार ऐकावयास मिळण्याचे दिवस संपले. 


त्याऐवजी करमणूकप्रधान कार्यक्रमांचे प्रमाण वाढले. नाटके, चित्रपट, वाद्यवृंदांचे कार्यक्रम यांनी गणेशोत्सवाचा ताबा घेतला. विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रीडास्पर्धा नाहीशा होऊ लागल्या आणि अधिक सजावट, अधिक रोषणाई, भव्य देखावे, भव्य मूर्ती यांचीच स्पर्धा चालू झाली. 


अशा त-हेने लो. टिळकांच्या 'समाज जागृती' या मूळ उद्देशाशी पूर्णतया विसंगत असे स्वरूप आज सार्वजनिक गणेशोत्सवाला प्राप्त झाले आहे. अत्यंत बाजारू त-हेने भक्ती व शक्ती प्रदर्शन करण्याचे ते एक निव्वळ साधन बनले आहे.


वेगवेगळ्या गणेशमंडळांसमोरील देखावे पाहत फिरणे ही पूर्वी पर्वणी असायची. आता त्या देखाव्यांतील रमणीयता जाऊन तिथे भडकपणा आला आहे. पूर्वीचे देखावे सामाजिक, राजकीय प्रश्नांवर आधारित असायचे. ते पाहणाऱ्याला विचारप्रवृत्त करायचे. 


आता मात्र मनोरंजन हाच देखाव्यांचा स्थायी भाव झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे फक्त डोळे दिपून जातात एवढेच! त्यामुळे आजकाल गणेशोत्सव हा दहा दिवस चालणारा धांगडधिंगा असे वाटू लागले आहे. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहिल्यास लो. टिळकांनाही प्रश्न पडेल की, यासाठीच का आपण सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले!


तेव्हा या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी 'सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ' स्थापन झाले. साऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुसूत्रता आणण्याचे काम हे महामंडळ करीत आहे. गणेशोत्सवाला विधायक वळण लावण्यासाठी काही ठोस कार्य, उपक्रम ही मंडळे हाती घेऊ लागली आहेत. 


जमलेल्या वर्गणीच्या अतिरिक्त निधीतून स्थानिक शाळांसाठी संगणक घेऊन देण्यासारखा उपक्रम चालू होत आहे. त्याचप्रमाणे वर्षभर ही मंडळे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, शैक्षणिक उपक्रम, क्रीडास्पर्धांचे आयोजन असेही कार्यक्रम करणार आहेत. 


सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून ही मंडळे शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी वर्गणीतून जमा झालेला निधी वापरतात. भूकंपग्रस्त, अशांना मदत देणे, मोफत वाचनालय चालविणे, आरोग्य विषयक सल्ला केंद्र चालविणे, लोकशिक्षणासाठी व्याख्यानमाला (एस्.एस्.सी.व्याख्यानमाला) आयोजित करणे, पुस्तकपेढी चालविणे असे अनेक उपक्रम हल्ली या मंडळांनी हाती घेतले आहेत.


तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चांगल्या त-हेने कार्यरत राहावे, त्यांच्यासाठी एक सर्वमान्य आचारसंहिता तयार व्हावी, मंडळाच्या कार्याला एक संघटित वळण लागावे आणि सारी गणेशोत्सव मंडळे विधायक कार्याकडे वळावीत म्हणजे मगच गणेशोत्सवाला पुन: दर्जेदार स्वरूप प्राप्त होईल. ओंकार स्वरूपा। सद्गुरू समर्था । अनाथांच्या नाथा। तुज नमो॥ मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद